मुले पालकांची खेळणी किंवा वस्तू नाहीत; बालकांच्या ताब्याबाबत सर्वोच्च न्यायालयाचे निरीक्षण

Story by  आवाज़ मराठी | Published by  Mrudgandha Dixit • 21 m ago
प्रातिनिधिक इमेज
प्रातिनिधिक इमेज

 

नवी दिल्ली 

पालक नियुक्त करताना अल्पवयीन मुलाचे कल्याण हाच न्यायालयासाठी सर्वोच्च निकष असतो, असे सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी स्पष्ट केले. मुले पालकांची केवळ "मालमत्ता" किंवा खेळणी नाहीत, असे महत्त्वपूर्ण निरीक्षण न्यायालयाने नोंदवले. घटस्फोटित पालकांच्या दोन अल्पवयीन मुलांच्या ताब्यासंबंधीच्या याचिकेवर सुनावणी करताना, मुलांना आईपासून वेगळे करू नये असे न्यायालयाने सांगितले. अनेक वर्षांत मुलांचे आईशी घट्ट भावनिक नाते तयार झाले आहे.

अस्थिर वैवाहिक नात्यात अडकलेल्या मुलांना वडिलांचा सहवासही मिळायला हवा, असे निरीक्षण न्यायमूर्ती विक्रम नाथ आणि न्यायमूर्ती अपरेश कुमार सिंह यांच्या खंडपीठाने नोंदवले. प्रत्येक महिन्याच्या दुसऱ्या शनिवारी आणि रविवारी सकाळी १० ते दुपारी २ या वेळेत वडिलांना मुलांना भेटण्याची परवानगी मिळेल, असे खंडपीठाने सांगितले.

मानवी पैलू आणि मुलांचे नाते

पालकांच्या परस्परविरोधी मागण्या समोर आल्यावर न्यायालयाने केवळ कायदेशीर दृष्टिकोनातून पाहू नये, असे खंडपीठाने नमूद केले. "अशा प्रकरणांत निर्णय घेताना मानवी पैलूही महत्त्वाचे ठरतात. मुले केवळ वस्तू किंवा पालकांची खेळणी नाहीत, असे नेहमी म्हटले जाते," असे खंडपीठाने स्पष्ट केले.

सध्या १६ आणि १४ वर्षांची असलेल्या दोन मुलांच्या आईने दाखल केलेल्या अपीलावर न्यायालय सुनावणी घेत होते. मुलांचा ताबा वडिलांना देण्याचा कौटुंबिक न्यायालयाचा आदेश मद्रास उच्च न्यायालयाने ऑक्टोबर २०२४ मध्ये कायम ठेवला होता. या आदेशाला महिलेने आव्हान दिले होते. मे २०१४ पासून आईसोबत राहत असलेल्या मुलांचा ताबा नैसर्गिक पालक असलेल्या वडिलांकडे द्यावा का, हा मुद्दा समोर आल्याचे सर्वोच्च न्यायालयाने सांगितले.

कौटुंबिक पार्श्वभूमी आणि भेटण्याचे नियम

मुलांच्या पालकांचा विवाह ऑगस्ट २००९ मध्ये झाला होता. मुलांचा जन्म मदुराई येथे जुलै २०१० आणि मे २०१२ मध्ये झाला. वैवाहिक वादामुळे चार खटले दाखल झाले. पतीने दाखल केलेल्या घटस्फोटाच्या खटल्यात क्रूरतेच्या आधारावर विवाह विच्छेदनाचा आदेश दिला.

मुलांसह संबंधित पक्षकारांशी संवाद साधल्यावर, मुलांनी आईसोबत राहण्याची स्पष्ट इच्छा व्यक्त केल्याचे सर्वोच्च न्यायालयाने नमूद केले. अल्पवयीन मुलाचे वय, लिंग, धर्म तसेच संभाव्य पालकाचे चारित्र्य आणि क्षमता लक्षात घेऊन मुलाचे कल्याण हाच मुख्य निकष ठेवावा, असे खंडपीठाने सांगितले.

पक्षकार २०१४ पासून वेगळे राहत असून २०१८ मध्ये त्यांचा विवाह संपुष्टात आला. घटस्फोटानंतरही आईने मुलांचा सांभाळ करताना पुरेसे प्रेम, काळजी आणि चांगल्या शाळांत दर्जेदार शिक्षण दिले आहे. त्यामुळे मुलांना आईपासून वेगळे करू नये, असे खंडपीठाने स्पष्ट केले. मात्र मुलांच्या संतुलित वाढीसाठी वडिलांचे प्रेमही आवश्यक असल्याचे खंडपीठाने जोडले.

मदुराई येथील गांधी म्युझियम येथे दर महिन्याच्या दुसऱ्या शनिवारी आणि रविवारी सकाळी १० ते दुपारी २ या वेळेत वडिलांना मुलांना भेटता येईल. पोंगल आणि सहामाही सुट्ट्यांतही आईच्या राहत्या ठिकाणी किंवा गांधी म्युझियम येथे याच वेळेत वडिलांना भेटण्याची परवानगी मिळेल. त्यासाठी वडिलांनी फोन किंवा व्हॉट्सॲपद्वारे आधी कळवायचे आहे. आईने विचारल्यास मुलांच्या भविष्यातील शैक्षणिक खर्चाचा वाटा उचलण्याची तयारी वडिलांनी ठेवावी, असे निर्देश देत सर्वोच्च न्यायालयाने अपील मान्य केले.