दिव्यांग व्यक्तीची हजारोंची रोकड सुपूर्द करत जालन्याच्या कदीर सय्यद यांनी दाखवला प्रामाणिकपणा

Story by  Bhakti Chalak | Published by  Bhakti Chalak • 1 d ago
जालना तहसील कार्यालयात सापडलेली रोकड आणि कागदपत्रे मूळ मालक संतोषराव घाटे यांच्या मुलाकडे परत करताना कदीर सय्यद
जालना तहसील कार्यालयात सापडलेली रोकड आणि कागदपत्रे मूळ मालक संतोषराव घाटे यांच्या मुलाकडे परत करताना कदीर सय्यद

 

भक्ती चाळक

सार्वजनिक ठिकाणी पैशांनी भरलेली बॅग सापडली, तर पहिला विचार काय येईल? बॅग कोणाची आहे, याचा शोध घ्यायचा की सापडलेली रक्कम स्वतःकडे ठेवायची? अशा काळात जालन्यातील कदीर उस्मान सय्यद यांनी दाखवलेल्या प्रामाणिकपणाचे सर्वत्र कौतुक होतेय. 

बॅगेत होते १६ हजार ४२० रुपये आणि एका अपंग व्यक्तीची महत्त्वाची बँक कागदपत्रे. जालना तहसील कार्यालयात ही बॅग सापडल्यावर कदी यांनी ती स्वतःकडे ठेवण्याऐवजी तिच्या मालकाचा शोध सुरू केला. सोशल मीडियावर व्हिडीओ टाकला आणि काही तासांतच बॅग तिच्या मालकापर्यंत पोहोचवली.

जालन्यातील पिंपरी डुकरी येथील कदीर सय्यद हे शेतकरी संघर्ष समितीचे जिल्हा प्रसिद्धी प्रमुख आहेत. शेतकऱ्यांच्या कामानिमित्त ते जालना तहसील कार्यालयात गेले होते. तिथे त्यांना एका अपंग व्यक्तीची बॅग, बँकेची फाईल आणि काही पैसे सापडले. बॅग ताब्यात घेऊन त्यांनी मालकाचा शोध घेण्याचे ठरवले. त्यासाठी त्यांनी फेसबुक आणि इन्स्टाग्रामचा आधार घेतला.

व्हिडीओ टाकताच लागला मालकाचा शोध 
बॅग आणि त्यातील कागदपत्रांची माहिती देणारा व्हिडीओ कदीर यांनी आपल्या फेसबुक आणि इन्स्टाग्राम खात्यावर प्रसिद्ध केला. बॅग कोणाची आहे, हे समजल्यास संबंधित व्यक्तीने संपर्क साधावा आणि आपली वस्तू घेऊन जावी, असे आवाहन त्यांनी केले. दिवसभराच्या धावपळीनंतर संध्याकाळी साडेसहाच्या सुमारास त्यांना फोन आला. फोन करणाऱ्या तरुणाने बॅग आपल्या वडिलांची असल्याचे सांगितले.

बॅगेचे मालक संतोषराव घाटे हे जालना जिल्ह्यातील उटवद गावचे रहिवासी होते. मुलाशी बोलून कदीर यांनी बॅग आणि तिच्यातील वस्तू परत करण्याची व्यवस्था केली. ही संपूर्ण प्रक्रिया पारदर्शक राहावी, यासाठी त्यांनी समक्ष व्हिडीओही तयार केला. त्यानंतर १६ हजार ४२० रुपये, बँकेची फाईल आणि बॅग संतोषराव यांच्या मुलाच्या स्वाधीन केली.

बॅग परत करण्यामागची भूमिका सांगताना कदीर आपल्या धार्मिक शिकवणीचा उल्लेख करतात. ते म्हणतात, “प्रामाणिकपणाचा गुण प्रत्येक व्यवहारात असायला हवा. कोणतीही अपेक्षा न ठेवता निस्वार्थपणे काम करणं, हीच आमच्या धर्माची शिकवण आहे.”

कुटुंबासोबतच समाजाची सेवा
३२ वर्षीय कदीर हे एकत्र कुटुंब पद्धतीत वाढलेले आहेत. पिंपरी फाटा परिसरात त्यांचे सय्यद कुटुंब राहते. सख्खे चार भाऊ, अकरा चुलत भाऊ, दोन चुलते आणि वडील असा त्यांचा मोठा परिवार आहे. कुटुंबातील सदस्य एकत्र राहतात. घरातील जबाबदाऱ्या वाटून घेताना सामाजिक आणि सार्वजनिक कामांची जबाबदारी कदीर यांच्याकडे सोपवण्यात आली आहे.

आपल्या कुटुंबाविषयी ते सांगतात,“आमच्या घरात सामाजिक किंवा सार्वजनिक काम असेल, सुख-दुःखाचा प्रसंग असेल, तर तिथे मी पोहोचायचं, अशी जबाबदारी माझ्यावर सोपवली आहे. माझ्यापेक्षा मोठे भाऊ आणि चुलत्यांनी माझ्यावर विश्वास ठेवला आहे. ही माझ्यासाठी मोठी जबाबदारी आहे आणि ती मी अभिमानाने पार पाडतो.”

प्रामाणिकपणा हीच खरी ओळख
शेतकरी संघर्ष समितीच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी काम करत असताना कदीर यांचा सार्वजनिक जीवनाशी नियमित संबंध येतो. तहसील कार्यालयातील बॅग परत करण्याची घटना त्यांच्या याच सामाजिक भूमिकेचा एक भाग ठरली. सापडलेली रक्कम मोठी होती, कागदपत्रे महत्त्वाची होती आणि बॅग हरवलेल्या व्यक्तीला त्यांची गरजही असणार होती. अशा वेळी स्वतः मालकाचा शोध घेऊन सर्व वस्तू सुरक्षित परत करून त्यांनी माणुसकी दाखवली.

'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा  -

Awaz Marathi WhatsApp Group 
Awaz Marathi Facebook Page

Awaz Marathi Twitter