वेलिंग्टन कसोटी अनिर्णित; वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप अंतिम फेरीच्या आशांना मोठा धक्का

Story by  आवाज़ मराठी | Published by  Mrudgandha Dixit • 12 m ago
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप अंतिम सामन्यातील एक क्षण
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप अंतिम सामन्यातील एक क्षण

 

नवी दिल्ली 

न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या कसोटीत अनिर्णित निकाल लागल्याने पुढील वर्षी होणाऱ्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (WTC) अंतिम फेरीत पोहोचण्याच्या भारताच्या आशांना मोठा धक्का बसला आहे. वेलिंग्टन येथे सोमवारी संपलेल्या या कसोटीत न्यूझीलंडने पाचवा दिवस खेळून काढला आणि भारताचा संभाव्य विजय रोखला. सामना संपण्यास एक तास बाकी असताना पाच बाद २३९ धावांवर कर्णधार शुभमन गिल आणि टॉम लॅथम यांनी सामन्यावर अनिर्णित शिक्कामोर्तब केले. या निकालासह भारत आता WTC गुणतालिकेत ५० टक्के गुणांसह चौथ्या स्थानावर आला आहे. मालिकेपूर्वी भारताचे गुण ५१.५२ टक्के होते.

सध्याच्या WTC सायकलमध्ये (२०२४-२७) भारताचे आणखी सहा कसोटी सामने बाकी आहेत. त्यातील एक सामना क्राइस्टचर्च येथे न्यूझीलंडविरुद्ध होईल. जानेवारी-फेब्रुवारी २०२७ मध्ये मायदेशात ऑस्ट्रेलियाविरुद्ध पाच कसोटी सामने होतील. दक्षिण आफ्रिका सध्या ७५ टक्के गुणांसह गुणतालिकेत पहिल्या स्थानावर आहे. ऑस्ट्रेलिया (६९.२३ टक्के) आणि न्यूझीलंड (६६.६७ टक्के) अनुक्रमे दुसऱ्या आणि तिसऱ्या स्थानावर आहेत.

अंतिम फेरीचे गणित आणि इतर संघ

उर्वरित सर्व सामने जिंकल्यास भारताचे गुण ६६.६७ टक्क्यांपर्यंत पोहोचतील. तरीही भारत आघाडीच्या दोन संघांच्या मागे राहील. उर्वरित सहापैकी पाच विजय आणि एक अनिर्णित लढत राहिल्यास भारताचे गुण ६२.९६ टक्क्यांवर राहतील. पाच विजय आणि एका पराभवामुळे हे प्रमाण ६१.११ टक्क्यांपर्यंत घसरेल.

त्यामुळे WTC अंतिम फेरीच्या शर्यतीत टिकून राहण्यासाठी भारताला सर्व सहा कसोटी जिंकाव्या लागतील. तसेच पुढील सुमारे तीन महिन्यांत इतर संघांची घसरण व्हावी अशी अपेक्षा धरावी लागेल. दुसरीकडे, गतविजेता दक्षिण आफ्रिका संघ अंतिम फेरीच्या सर्वात जवळ आहे. बांगलादेशविरुद्ध सोमवारी सुरू झालेल्या सामन्यासह उर्वरित पाचपैकी केवळ तीन विजय दक्षिण आफ्रिकेला पुरेसे ठरतील.