नवी दिल्ली
लोवी इन्स्टिट्यूटच्या 'आशिया पॉवर इंडेक्स २०२६' नुसार आशियातील तिसरा सर्वात शक्तिशाली देश म्हणून भारताने आपले स्थान कायम राखले आहे. भारत 'प्रमुख शक्ती' म्हणून पुढे आला असून पंतप्रधान नरेंद्र मोदी हे दुसरे सर्वात प्रभावी प्रादेशिक नेते ठरले आहेत. २०२६ च्या निर्देशांकात भारताचा पॉवर स्कोअर ०.५ गुणांनी सुधारून ४०.५ झाला आहे. आशियात भारताने अधिक प्रभावशाली भूमिका बजावल्याचे यात नमूद केले आहे. चीनसोबतच्या भारताच्या पॉवर स्कोअरमधील तफावत २०१८ नंतर सर्वात कमी झाली आहे.
निर्देशांकानुसार, १०० पैकी ७८.९ गुणांसह अमेरिका आणि ७३.६ गुणांसह चीन हे २०२६ मध्ये आशियातील 'महासत्ता' आहेत. या वर्षी भारताने आपला 'प्रमुख शक्ती' हा दर्जा अधिक भक्कम केला आणि आशियातील प्रभाव वाढवला. प्रादेशिक संरक्षण सहभाग आणि आग्नेय आशियाला ब्रह्मोस क्षेपणास्त्रांच्या विक्रीमुळे संरक्षण जाळे अधिक मजबूत झाले. स्थिर व्यापार आणि गुंतवणूक संबंधांमुळे ज्या देशांचे आर्थिक संबंध कमकुवत झाले नाहीत, अशा मोजक्या देशांत भारताचा समावेश आहे.
शी जिनपिंग यांच्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे दुसरे सर्वात प्रभावी प्रादेशिक नेते असल्याचे तज्ज्ञांनी नमूद केले, त्यामुळे भारताचा राजनैतिक प्रभाव टिकून राहिला. मात्र आखाती संघर्षादरम्यान भारताच्या मर्यादित भूमिकेचा त्यांच्या जागतिक नेतृत्वावरील दृष्टिकोनावर परिणाम झाला, असे आशिया पॉवर इंडेक्स २०२६ मध्ये म्हटले आहे.
२०२६ मध्ये भारताला सांस्कृतिक प्रभावात (+२.३) सर्वाधिक फायदा झाला. आर्थिक क्षमतेत (-०.७) सर्वाधिक गुण घटले. इतर क्षेत्रांत संरक्षण जाळे (+२.१), भावी संसाधने (+१.२) आणि लष्करी क्षमतेत (+०.५) सुधारणा झाली. लवचिकता, आर्थिक संबंध आणि राजनैतिक प्रभावाचे गुण या वर्षी कायम राहिले. ताज्या निर्देशांकानुसार भारताची आर्थिक क्षमता २६.४, सांस्कृतिक प्रभाव ४३.८ आणि राजनैतिक प्रभाव ७०.३ इतका आहे. सापेक्ष आर्थिक क्षमतेतील घसरण आणि देशांतर्गत आव्हानांवर लक्ष केंद्रित असतानाही भारताने आशियात अधिक प्रभावशाली भूमिका बजावली, असे अहवालात म्हटले आहे.
आशियातील सत्ता कोणाकडे आहे हे मोजण्यासाठी २०२६ चा लोवी इन्स्टिट्यूट आशिया पॉवर इंडेक्स २७ देश आणि प्रदेशांचे १३१ निकषांवर मूल्यांकन करतो. अमेरिका (७८.९) आणि चीन (७३.६) यांच्यातील पॉवर स्कोअरची तफावत ५.३ गुणांवर आली आहे. २०१८ मध्ये निर्देशांक सुरू झाल्यापासूनची ही सर्वात कमी तफावत आहे. लष्करी क्षमतेतील दरीही आजपर्यंतच्या सर्वात कमी पातळीवर आहे. अमेरिकेचा राजनैतिक प्रभाव ६ गुणांनी घसरून ७६.७ वर आला. सलग चौथ्या वर्षी ही घसरण झाली असून आजपर्यंतची ती सर्वात मोठी घट आहे. इराण युद्ध, दंडात्मक शुल्क आणि दक्षिण कोरियासोबतचे लष्करी सराव कमी करण्याच्या आवाहनांचा यावर परिणाम झाला.
अस्थिरता असूनही प्रादेशिक शक्ती संतुलन द्विध्रुवीयच आहे. अमेरिका आणि चीनचे वर्चस्व कायम असून कोणतीही मध्यम शक्ती आघाडी किंवा वाढती हुकूमशाही युती त्यांना बाजूला सारू शकत नाही, असे आग्नेय आशिया कार्यक्रमाचे संचालक आणि आशिया पॉवर इंडेक्सचे प्रमुख हंटर मार्स्टन यांनी सांगितले.
भारताच्या सुधारलेल्या क्रमवारीवरून सत्ताधारी भाजपने काँग्रेसवर टीका करत काँग्रेसला वास्तवाची जाणीव झाल्याचे म्हटले. राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसचे भवितव्य 'विनाशकारी' ठरू शकते, तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारताचे भवितव्य 'सुरक्षित, संरक्षित आणि समृद्ध' असल्याचे भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते प्रदीप भंडारी म्हणाले. काँग्रेसच्या 'झूठ की गूंज'ला वास्तवाचा आरसा दिसल्याचेही त्यांनी नमूद केले.
भारतीय अर्थव्यवस्थेवरील विरोधकांच्या टीकेला प्रत्युत्तर देताना भाजपचे राज्यसभा खासदार विनोद तावडे यांनीही या निर्देशांकाचा संदर्भ दिला. भारताच्या 'वाढीच्या दशका'ला जगाने मान्यता दिल्याचे ते म्हणाले. परदेशात भारताची घसरगुंडी मांडणाऱ्यांनी जगाचे हे मूल्यांकन वाचावे, असे आवाहन तावडे यांनी केले.