नवी दिल्ली
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नेपाळसाठी २४ हजार कोटी नेपाळी रुपयांचे (सुमारे १५ हजार कोटी भारतीय रुपये) आर्थिक पॅकेज सोमवारी जाहीर केले. नेपाळचे पंतप्रधान बालेंद्र शाह यांच्यासोबत त्यांनी सीमापार प्रवासी रेल्वे सेवेला हिरवा झेंडा दाखवला. दोन्ही देशांनी संयुक्त दृष्टिकोन दस्तऐवज अंतिम केला आणि द्विपक्षीय सहकार्य वाढवण्यासाठी आठ करारांवर स्वाक्षऱ्या केल्या. दीर्घकाळ चाललेल्या सीमावादावरून संबंधांत आलेल्या तणावानंतर दोन्ही देशांमधील संबंधांत मोठी सुधारणा होत असल्याचे यातून स्पष्ट होते.
सर्वंकष चर्चांमध्ये दोन्ही पंतप्रधानांनी प्रलंबित सीमा प्रश्नावर काम करण्याचे निर्देश आपापल्या परराष्ट्र सचिवांना दिले. नेपाळ आणि भारताचे संबंध "हिमालयासारखे भक्कम आणि महासागरांइतके अथांग" असल्याचे शाह म्हणाले. दोन्ही नेत्यांनी नेपाळमधील भारत-निधीतून उभारलेल्या दोन ऊर्जा व कनेक्टिव्हिटी प्रकल्पांचे दूरदृश्य प्रणालीद्वारे लोकार्पण केले. तसेच इतर तीन उपक्रमांची पायाभरणी केली. व्यापार, ऊर्जा, जलसंपदा, हवामान लवचिकता, कनेक्टिव्हिटी, तंत्रज्ञान आणि आरोग्य यांसह अनेक महत्त्वाच्या क्षेत्रांत दुतर्फा सहकार्य वाढवण्याचा निर्धारही त्यांनी व्यक्त केला.
"विकसित भारत आणि समुन्नत नेपाळ: भागीदारीची पुनर्कल्पना" या नावाच्या दृष्टिकोन दस्तऐवजाचा उद्देश आर्थिक सहकार्य, ऊर्जा, जलसंपदा, हवामान लवचिकता, कनेक्टिव्हिटी, तंत्रज्ञान आणि आरोग्य या क्षेत्रांना नवी गती देणे हा आहे. सामायिक दृष्टिकोनाचे ठोस यशामध्ये रूपांतर होईल आणि भारत-नेपाळ संबंधांत "नवा सुवर्ण अध्याय" लिहिला जाईल, असा विश्वास मोदी यांनी व्यक्त केला. "भारत आणि नेपाळमधील नाते केवळ शेजारधर्मापुरते मर्यादित नाही. ते खोलवरच्या आपुलकीत आणि चिरंतन विश्वासात रुजले आहे," असे मोदी आपल्या माध्यमांतील निवेदनात म्हणाले. "आपले आनंद आणि आव्हाने सामायिक आहेत. आपण एकमेकांच्या प्रगतीचे भागीदार आणि कठीण काळात एकमेकांना आधार देणारे आहोत," असे ते म्हणाले.
या पॅकेजमध्ये नेपाळमधील भूकंपानंतरच्या पुनर्रचनेसाठी आणि नवीन पायाभूत सुविधा प्रकल्पांसाठी ५,६०० कोटी नेपाळी रुपयांचे (३,५०० कोटी रुपये) अनुदान समाविष्ट आहे. तसेच ऊर्जा क्षेत्रातील प्रकल्पांसाठी १८,४०० कोटी नेपाळी रुपयांची (११,५०० कोटी रुपये) पत सुविधा उपलब्ध होईल. ऑगस्टमध्ये नेपाळमध्ये आलेल्या भीषण पुरात झालेल्या जीवितहानीबद्दल मोदींनी तीव्र दुःख व्यक्त केले. पुनर्रचना आणि दीर्घकालीन विकासासाठी हे २४ हजार कोटी नेपाळी रुपयांचे पॅकेज जाहीर करत असल्याचे त्यांनी सांगितले. न्यायवैद्यक विज्ञान, आरोग्य, शाश्वत शहरी विकास आणि मत्स्यव्यवसाय या क्षेत्रांत सहकार्य वाढवण्यासाठी दोन्ही बाजूंनी करारांवर स्वाक्षऱ्या केल्या.
उत्तर प्रदेशातील अयोध्या आणि नेपाळमधील जनकपूर दरम्यान नवीन सरयू-कमला एक्सप्रेस रेल्वे सेवेला दोन्ही पंतप्रधानांनी हिरवा झेंडा दाखवला. यामुळे कनेक्टिव्हिटी सुधारण्यासोबतच रामायण सर्किटमधील धार्मिक आणि सांस्कृतिक पर्यटनाला चालना मिळेल. बौद्ध आणि शिव-शक्ती धार्मिक पर्यटन सर्किट विकसित करण्यासाठीही नेत्यांनी सहमती दर्शवली.
सीमास्तंभांच्या देखभाल आणि दुरुस्तीसंबंधीच्या संयुक्त क्षेत्रीय कामातील प्रगतीबद्दल मोदी आणि शाह यांनी समाधान व्यक्त केले. उर्वरित सीमा प्रश्नांवर काम करण्याचे निर्देश परराष्ट्र सचिवांना दिले. दीर्घकालीन सीमा वाद सोडवण्यासाठी चीन आणि युनायटेड किंगडमचा सहभाग मिळावा, अशा आशयाचे विधान शाह यांनी मे महिन्यात केले होते. त्यानंतर द्विपक्षीय संबंधांत काही प्रमाणात तणाव आला होता. सीमा प्रश्नाच्या सर्व पैलूंवर हाताळण्यासाठी दोन्ही देशांत स्थापित द्विपक्षीय यंत्रणा असल्याने तिसऱ्या पक्षाची भूमिका नवी दिल्लीने ठामपणे नाकारली होती. लिपुलेख, लिम्पियाधुरा आणि कालापानी या भागावरून जुना सीमावाद असून, हे भाग उत्तराखंडचा हिस्सा असल्याचे भारताने सातत्याने स्पष्ट केले आहे.
नेपाळच्या पारगमन व्यापारासाठी गुजरातच्या कांडला येथील दीनदयाळ बंदराचा नवा मार्ग मोदी यांनी जाहीर केला. आवश्यक पायाभूत सुविधा तयार झाल्यावर ओडिशातील पारादीप बंदराची सुविधाही नेपाळला उपलब्ध करून दिली जाईल. सीमापार रेल्वे मार्ग, पूल, एकात्मिक तपासणी चौक्या (ICPs) आणि पेट्रोलियम पाइपलाइनद्वारे सीमा पायाभूत सुविधा मजबूत करण्यावर भर दिला. बनबासा येथे नवीन आयसीपीची पायाभरणी केली. भैरहवा, सुनौली आणि दोधारा-चांदनी येथील आयसीपींच्या कामातील प्रगतीचे स्वागत केले. भारतातील धारचुला आणि नेपाळमधील दार्चुला दरम्यान नवीन वाहन पूल सुरू केला. मोतिहारी-अमलेखगंज पाइपलाइनचा दुसरा टप्पा नेपाळच्या जनतेला समर्पित केला. नेपाळमधील झापा येथे पेट्रोलियम टर्मिनलची पायाभरणी केली. सिलीगुडी ते झापा दरम्यानच्या पेट्रोलियम पाइपलाइनचे काम लवकर सुरू करण्यावर भर दिला. गॅस पाइपलाइन उभारणीतील सहकार्याचा अभ्यास करण्यास दोन्ही बाजूंनी सहमती दर्शवली.
जलविद्युत क्षेत्रातील प्रगतीबद्दल समाधान व्यक्त करत भारतीय कंपन्यांच्या सहभागाचे स्वागत केले. ६६९ मेगावॅटच्या लोअर अरुण जलविद्युत प्रकल्पाची पायाभरणी केली. नेपाळमध्ये भारतीय तंत्रज्ञान संस्थेचा (IIT) ऑफशोर कॅम्पस उभारण्यासही सहमती दर्शवली. नेपाळच्या तरुण पिढीसाठी स्टार्ट-अप इनक्युबेटर, इनोव्हेशन हब आणि आयआयटी कॅम्पस उभारण्यासोबतच कायदा व तंत्रज्ञान क्षेत्रात शिष्यवृत्ती वाढवण्याचे मोदी यांनी सांगितले. तसेच अॅग्रो-इंडस्ट्रियल पार्क उभारणीत सहकार्य देण्याचेही नमूद केले.
परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री यांनी सांगितले की, नेपाळच्या व्यापारासाठी पारगमन सुविधेवर सविस्तर चर्चा झाली. कांडला येथील दीनदयाळ बंदर आणि त्यानंतर पारादीप बंदरातून मालाच्या वाहतुकीची सोय उपलब्ध होईल. चर्चेत लोकांमधील संबंधांवर विशेष भर दिला. "चर्चेदरम्यान क्रिकेटवर बराच वेळ चर्चा झाली," असे मिस्री म्हणाले. प्रादेशिक परिस्थिती आणि आंतरराष्ट्रीय मुद्द्यांवरही दोन्ही पंतप्रधानांनी संवाद साधला. शाह यांनी मोदी यांना नेपाळ भेटीचे निमंत्रण दिले.