देशातील प्रत्येक तरुण व्यसनापासून मुक्त राहावा; दिल्ली लोक निवास येथील कार्यक्रमात मोदींचे आवाहन

Story by  आवाज़ मराठी | Published by  Mrudgandha Dixit • 20 m ago
गुरु नानक देव यांच्या प्रकाश पर्वाच्या पूर्वसंध्येला दिल्ली लोक निवास येथे शबद कीर्तनात सहभागी झालेले पंतप्रधान नरेंद्र मोदी.
गुरु नानक देव यांच्या प्रकाश पर्वाच्या पूर्वसंध्येला दिल्ली लोक निवास येथे शबद कीर्तनात सहभागी झालेले पंतप्रधान नरेंद्र मोदी.

 

नवी दिल्ली

देशातील तरुण कोणत्याही प्रकारच्या व्यसनापासून मुक्त राहावेत, अशी सदिच्छा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी व्यक्त केली. तरुण अंमली पदार्थांच्या प्रभावाखाली येतात, तेव्हा कुटुंबांची स्वप्ने चक्काचूर होतात, असे ते म्हणाले.

शीख धर्माचे पहिले गुरू श्री गुरू नानक देव यांच्या जयंती म्हणजेच प्रकाश पर्वाच्या पूर्वसंध्येला दिल्ली लोक निवास येथे शबद कीर्तन कार्यक्रमात मोदी सहभागी झाले. जगाच्या प्रत्येक भागात शांतता नांदावी, प्रत्येक कुटुंब सुरक्षित राहावे आणि प्रत्येक व्यक्तीला सन्मानाने जगण्याची संधी मिळावी, यासाठी 'सरबत दा भला' म्हणजेच सर्वांच्या कल्याणाची भावना अधिक महत्त्वाची ठरते, असे मोदी म्हणाले.

शीख परंपरा आणि तरुणांची स्वप्ने

राष्ट्र आणि संस्कृतीसाठी सर्वस्व अर्पण करण्याच्या भावनेशी संपूर्ण शीख परंपरा जोडलेली आहे, असे पंतप्रधानांनी नमूद केले.

"देशातील प्रत्येक तरुण व्यसनापासून मुक्त राहावा. त्यांनी आपली स्वप्ने पूर्ण करावीत. त्यांनी मन लावून अभ्यास करावा, पुढे जावे आणि आपल्या कुटुंबाचा व देशाचा अभिमान वाढवावा. या प्रयत्नात कुटुंबांची भूमिका खूप महत्त्वाची आहे," असे मोदी म्हणाले. तरुण अंमली पदार्थांच्या आहारी गेल्यावर कुटुंबांची स्वप्ने उद्ध्वस्त होतात, असेही त्यांनी स्पष्ट केले.

जागतिक संघर्ष आणि शांतता

जगात आज अनेक ठिकाणी संघर्ष सुरू आहेत. त्यामुळे अनेक निरपराध लोक आणि अनेक कुटुंबे हिंसाचार व अस्थिरतेचा सामना करत आहेत, असे मोदी यांनी सांगितले.



Latest News