१६ वर्षांखालील मुलांच्या सोशल मीडिया वापरावर तात्पुरते निर्बंध; बांगलादेश न्यायालयाचे आदेश

Story by  आवाज़ मराठी | Published by  Mrudgandha Dixit • 9 m ago
एआय निर्मित इमेज
एआय निर्मित इमेज

 

ढाका 

१६ वर्षांखालील मुलांना सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचा वापर करण्यापासून रोखण्यासाठी तात्पुरती मार्गदर्शक तत्त्वे तयार करण्याचे निर्देश बांगलादेशच्या न्यायालयाने दिले आहेत. अल्पवयीन मुलांवर अल्गोरिदम-आधारित कंटेंट फीडचा काय परिणाम होतो, याची तपासणी करण्यासाठी स्वतंत्र तज्ज्ञ समिती स्थापन करण्याचे आदेशही न्यायालयाने दिले आहेत.

१६ वर्षांखालील मुलांच्या सोशल मीडिया वापरावर नियंत्रण आणणारे राष्ट्रीय धोरण तयार करण्यात सरकार अपयशी ठरल्याचा प्रश्न उपस्थित करणाऱ्या रिट याचिकेवर बांगलादेश सर्वोच्च न्यायालयाच्या हायकोर्ट डिव्हिजनने रविवारी हे आदेश दिले. "प्रथम आलो" वृत्तपत्राने ही माहिती दिली. न्यायमूर्ती सिकदर महमदुर राझी आणि न्यायमूर्ती फातेमा अन्वर यांच्या खंडपीठाने पोस्ट आणि दूरसंचार विभागाचे सचिव तसेच बांगलादेश दूरसंचार नियामक आयोगाचे अध्यक्ष यांच्यासह इतर प्रतिवादींना आवश्यक पावले उचलण्यास सांगितले. सायबर सुरक्षा तज्ज्ञ, बाल मानसशास्त्रज्ञ, बालरोगतज्ज्ञ आणि कायदेतज्ज्ञांचा समावेश असलेली समिती तातडीने स्थापन करण्याचे आदेशही खंडपीठाने दिले.

अल्गोरिदम फीड आणि जागतिक कल

मुलांच्या मानसिक आरोग्यावर, शारीरिक तंदुरुस्तीवर आणि विकासावर सोशल मीडियाचा होणारा परिणाम याबाबत जगभरात चिंता वाढत आहे. हानिकारक ऑनलाइन कंटेंटपासून संरक्षण देण्यासाठी आणि वयानुसार निर्बंध आणण्यासाठी विविध देशांत विचार सुरू आहे. अल्गोरिदम-आधारित शिफारस प्रणाली मुलांच्या वर्तनावर, ऑनलाइन कंटेंटच्या संपर्कावर आणि सर्वांगीण विकासावर कसा परिणाम करते, याचा अभ्यास समिती करेल. नियामक उपाययोजना ठरवण्यास मदत करण्यासाठी समिती आपला अहवाल सादर करेल.

सर्वोच्च न्यायालयाचे वकील मोहम्मद फैसल दस्तगीर यांनी या महिन्याच्या सुरुवातीला ही रिट याचिका दाखल केली होती. ते स्वतः न्यायालयात हजर राहिले. नियामक चौकट नसल्याने १६ वर्षांखालील मुलांना अमर्याद सोशल मीडिया वापराला सामोरे जावे लागते. यातून त्यांच्या मानसिक आणि शारीरिक विकासावर परिणाम होऊ शकतो, असा युक्तिवाद दस्तगीर यांनी केला. अतिरेकी स्क्रीन टाइममुळे दृष्टी कमजोर होण्यासह आरोग्याच्या समस्या निर्माण होतात, अशा संशोधनाचा दाखला देत त्यांनी राष्ट्रीय धोरणाची गरज मांडली. अल्गोरिदम फीडचा अभ्यास करण्यासाठी स्वतंत्र समिती स्थापन करण्यात आणि १६ वर्षांखालील मुलांवर निर्बंध घालणारे राष्ट्रीय धोरण तयार करण्यात अपयशी ठरल्याचे बेकायदेशीर व कायदेशीर अधिकाराबाहेर का ठरवू नये, याचे स्पष्टीकरण देण्याचे निर्देशही न्यायालयाने दिले.

जगभरातील निर्बंध आणि नवे कायदे

मुलांच्या सोशल मीडिया वापराबाबत जगभरातील अनेक देश कडक नियम लागू करत आहेत. प्रमुख सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर खाती उघडण्यासाठी १६ वर्षे वयोमर्यादा लागू करणारा ऑस्ट्रेलिया हा डिसेंबर २०२५ मध्ये पहिला देश ठरला. १६ वर्षांखालील मुलांना खाती तयार करण्यापासून किंवा ठेवण्यापासून रोखण्यासाठी ठोस पावले उचलणे प्लॅटफॉर्मवर बंधनकारक केले. इंडोनेशियाने २८ मार्च २०२६ पासून १६ वर्षांखालील मुलांना "उच्च जोखमीच्या" सोशल मीडिया आणि ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर खाती ठेवण्यास बंदी घातली. आग्नेय आशियात असे निर्बंध आणणारा हा पहिला देश ठरला. मलेशियानेही जून २०२६ पासून वय पडताळणी नियम लागू केले आणि १६ वर्षांखालील मुलांना सोशल मीडिया खाती उघडण्यास मनाई केली. विद्यमान वापरकर्त्यांनाही वय पडताळणी बंधनकारक केली.

ब्रिटनने २०२७ च्या वसंत ऋतूपर्यंत प्रमुख सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर १६ वर्षांखालील मुलांना बंदी घालण्याची योजना आखली आहे. डिसेंबर २०२६ पर्यंत प्राथमिक नियम संसदेत मांडले जाण्याची अपेक्षा आहे. १६ आणि १७ वयोगटातील किशोरवयीन मुलांसाठी रात्रीची बंदी आणि मुलांसाठी इन्फिनिट-स्क्रोल यंत्रणा रोखण्याचा विचारही ब्रिटन करत आहे. कॅनडाने जूनमध्ये संसदेत विधेयक मांडून सोशल मीडिया खात्यासाठी किमान १६ वर्षे वयोमर्यादा सुचवली. या विधेयकाचे अद्याप कायद्यात रूपांतर झालेले नाही. ब्राझीलने २०२६ मध्ये नियम लागू करून १६ वर्षांखालील वापरकर्त्यांसाठी वय पडताळणी आणि पालकांच्या खात्याशी जोडणी अनिवार्य केली. युरोपीय आयोगाने सप्टेंबरमध्ये 'ईयू किड्स अ‍ॅक्ट' प्रस्तावित केला. यात १३ वर्षांखालील मुलांना सोशल मीडियावर बंदी घालणे आणि स्वतंत्र खात्यासाठी १५ वर्षे किमान वयोमर्यादा ठेवण्याची तरतूद आहे. फ्रान्स, ग्रीस, तुर्की, स्पेन, पोलंड, न्यूझीलंड, डेन्मार्क आणि स्लोव्हेनिया या देशांनी प्रामुख्याने १५ वर्षांखालील मुलांसाठी मसुदे तयार केले आहेत. ऑस्ट्रियाने १४ वर्षांखालील मुलांवर बंदीचा प्रस्ताव मांडला आहे.