ब्रिक्स शिखर परिषदेनंतर द्विपक्षीय संबंध सुधारण्यावर भर; चीन भागीदारीसाठी सज्ज

Story by  आवाज़ मराठी | Published by  Mrudgandha Dixit • 12 m ago
प्रातिनिधिक इमेज
प्रातिनिधिक इमेज

 

बीजिंग

दोन्ही बाजूंच्या व्यावसायिकांसाठी व्हिसा व्यवस्था अधिक सुलभ करण्यासाठी भारतासोबत काम करण्यास चीन तयार आहे. भारतीय नागरिकांना दिले जाणारे व्यावसायिक व्हिसा कमी केल्याच्या चर्चांदरम्यान चीनने ही भूमिका स्पष्ट केली.

कायदे आणि नियमांनुसार चीनमध्ये येणाऱ्या पात्र परदेशी नागरिकांना व्हिसा दिला जातो. भारतीयांसाठी व्हिसा वाटपात कपात केल्याच्या चर्चांबाबत पीटीआयने विचारलेल्या प्रश्नाला चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्याने लेखी उत्तर दिले. "दोन्ही बाजूंच्या व्यावसायिकांसाठी व्हिसा व्यवस्था सुलभ करण्याकरिता आम्ही भारतासोबत काम करण्यास तयार आहोत," असे प्रवक्त्याने नमूद केले. शांघाय येथे या महिन्यात झालेल्या चायना इम्पोर्ट एक्स्पोसाठी कमी भारतीय व्यावसायिकांना व्हिसा मिळाल्याच्या चर्चाही समोर आल्या होत्या. हा वार्षिक व्यापार मेळा जगभरातील व्यावसायिकांना चिनी ग्राहकांसमोर आपला व्यवसाय मांडण्याची संधी देतो.

व्हिसा प्रक्रिया आणि द्विपक्षीय संबंध

चीनच्या व्हिसासाठी मागणी वाढत आहे. विशेषतः व्यावसायिक व्हिसाची मागणी अधिक आहे. त्यामुळे बीजिंगने 'चायना व्हिसा अ‍ॅप्लिकेशन सेंटर' या सेवा पुरवठादार संस्थेकडून व्हिसा अर्ज स्वीकारणे बंद केले. आता चीनचे दूतावास थेट अर्ज हाताळत आहेत.

२०२० मधील गलवान खोऱ्यातील संघर्षानंतर बिघडलेल्या द्विपक्षीय संबंधांत सुधारणा करण्याचे प्रयत्न सुरू झाले. गेल्या वर्षी जुलैमध्ये भारताने चिनी नागरिकांना पर्यटक व्हिसा देणे पुन्हा सुरू केले. पाच वर्षांच्या खंडानंतर हा निर्णय झाला. संबंध पूर्वपदावर आणण्याच्या प्रक्रियेत हे महत्त्वाचे पाऊल मानले गेले. व्हिसा प्रक्रिया सुलभ झाल्यावर दोन्ही देशांनी बीजिंग-नवी दिल्लीसह अनेक शहरांना जोडणारी थेट हवाई सेवा सुरू केली. भारत आणि चीनदरम्यान व्यापार व पर्यटनाला चालना मिळावी म्हणून चिनी नागरिकांसाठी व्हिसा नाकारण्याचे प्रमाण अलीकडच्या महिन्यांत सुमारे सात टक्क्यांपर्यंत कमी झाल्याचे भारतीय अधिकाऱ्यांनी सांगितले. भारतीय अर्जदारांना ऑनलाइन व्हिसा अर्ज करता यावा म्हणून चीनच्या भारतातील दूतावासाने गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये 'चायना ऑनलाइन व्हिसा अ‍ॅप्लिकेशन सिस्टम' सुरू केली.

ब्रिक्स बैठक आणि भागीदारीचा निर्धार

यंदा सप्टेंबरमध्ये ब्रिक्स शिखर परिषदेच्या निमित्ताने नवी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्यात भेट झाली. त्यानंतर द्विपक्षीय संबंधांच्या सद्यस्थितीबाबत विचारलेल्या प्रश्नावर चीनने सहकार्याची तयारी दर्शवली. "मोदी आणि शी यांच्यातील सर्वात महत्त्वाची सामायिक समज म्हणजे चीन आणि भारताने भागीदार बनणे गरजेचे आहे. दोन्ही बाजू या महत्त्वाच्या समजुतीवर काम करत आहेत," असे प्रवक्त्याने सांगितले. द्विपक्षीय संबंध सुधारण्यासाठी आणि वाढवण्यासाठी, एकमेकांच्या विकासाला साथ देण्यासाठी तसेच जागतिक शांतता व समृद्धीत योगदान देण्यासाठी चीन भारतासोबत काम करण्यास तयार असल्याचे प्रवक्त्याने स्पष्ट केले.