शीख धर्म आणि सुफीवाद: प्रेम आणि मानवतेची सामायिक भाषा

Story by  आवाज़ मराठी | Published by  Mrudgandha Dixit • 29 m ago
प्रातिनिधिक इमेज
प्रातिनिधिक इमेज

 

आमिर सुहेल वाणी

भारतीय उपखंडाचा इतिहास हा विविध धर्म, संस्कृती आणि आध्यात्मिक परंपरांमधील संवादाचा इतिहास आहे. या इतिहासातील सुंदर पाने राजदरबारांत लिहिली गेली नाहीत; ती संत, फकीर, कवी आणि जीवनाचा सखोल अर्थ शोधणाऱ्या सामान्य माणसांच्या सहवासात लिहिली गेली. शीख धर्म आणि सुफीवाद यांच्यातील नाते हा असाच एक रंजक अध्याय आहे. दोन्ही परंपरा वेगवेगळ्या धार्मिक पार्श्वभूमीतून उदयास आल्या असल्या तरी त्या एकाच सांस्कृतिक वातावरणात बहरल्या. ईश्वर, प्रेम, समता आणि मानवी प्रतिष्ठा यांबाबत दोन्ही परंपरांच्या विचारांत कमालीचे साम्य दिसून येते.

पंधराव्या शतकात पंजाबच्या भूमीवर गुरु नानक देवजी (१४६९–१५३९) यांच्या शिकवणीतून शीख धर्माचा उदय झाला. हा काळ पंजाबमध्ये हिंदू आणि मुस्लिम समुदायांच्या धार्मिक व सांस्कृतिक देवाणघेवाणीचा होता. या भागात आधीच रुजलेल्या सुफीवादाने ईश्वरी प्रेम, आंतरिक शुद्धी, करुणा आणि अस्तित्वाची एकता यांवर आधारित आध्यात्मिक भाषा दिली होती. विशेषतः चिश्ती परंपरेतील सुफी संतांचा समाजजीवनावर प्रभाव होता. त्यांच्या "खानकाह" म्हणजेच आश्रमांचे दरवाजे सामाजिक आणि धार्मिक सीमा ओलांडून सर्वांसाठी खुले असत. अशा आध्यात्मिक संवादाच्या वातावरणात गुरु नानक यांचा संदेश आकाराला आला.

इथे एक महत्त्वाचा फरक लक्षात घेणे गरजेचे आहे. शीख धर्म हा सुफीवादाचा केवळ विस्तार नव्हता आणि इस्लाममधून विचार उसने घेऊनही तो घडला नव्हता. गुरु नानक यांनी स्वतःचा स्वतंत्र आध्यात्मिक मार्ग प्रस्थापित केला. भक्ती, धार्मिक शिस्त आणि मानव व ईश्वर यांच्यातील नाते यांबाबत त्यांची स्वतःची स्पष्ट मांडणी होती. तरीही मध्ययुगीन पंजाबचे बौद्धिक आणि आध्यात्मिक वातावरण परस्परांशी जोडलेले होते. ही सामायिक पार्श्वभूमी समजून घेतल्याशिवाय शीख आणि सुफी विचारांतील साम्य लक्षात येत नाही.

शीख धर्म आणि सुफीवाद यांचा सर्वात ठळक दुवा म्हणजे ईश्वराच्या एकत्वाची कल्पना. गुरु नानक यांनी शीख श्रद्धेचा मूलभूत मंत्र असलेल्या "मूल मंत्रा"ची सुरुवात "इक ओंकार" या शब्दांनी केली. याचा अर्थ ईश्वर एकच असून तो सर्वव्यापी आहे. सुफी संतांनीही आपल्या आध्यात्मिक चिंतनाच्या केंद्रस्थानी ईश्वराच्या एकत्वाला म्हणजेच "तौहीद"ला स्थान दिले. सर्व सृष्टी एकाच ईश्वरावर अवलंबून असल्याची अनुभूती सुफी परंपरेत मांडली जाते. दोन्ही परंपरांच्या मते ईश्वर कोणत्याही एका वास्तूत, समुदायात किंवा बाह्य धार्मिक ओळखीत बंदिस्त राहू शकत नाही. माणसांनी निर्माण केलेल्या भिंतींच्या पलीकडे ईश्वर असून प्रामाणिकपणा, प्रेम आणि आध्यात्मिक जाणिवेतूनच त्याच्यापर्यंत पोहोचता येते.

ईश्वरी प्रेमाची भाषा हा दोन्ही परंपरांना जोडणारा आणखी एक दुवा आहे. सुफी परंपरेत "इश्क" म्हणजेच प्रेम हे ईश्वरापर्यंत पोहोचण्याचे प्रभावी माध्यम मानले जाते. स्वार्थ, अहंकार आणि आसक्तीपासून मन शुद्ध झाल्याशिवाय ईश्वरी प्रेमाची प्राप्ती होत नाही, असे सुफी मानतात. शीख भक्ती परंपरेतही प्रेम, नामस्मरण आणि ईश्वरी इच्छेपुढे शरणागती यांना अनन्यसाधारण महत्त्व आहे. "नाम सिमरन" म्हणजेच ईश्वराच्या नामाचा जप हा शीख साधनेचा गाभा आहे. धर्म म्हणजे केवळ बाह्य कर्मकांड नसून माणसाच्या स्वभावात नम्रता, करुणा आणि ईश्वराशी जवळीक निर्माण करणारा प्रवास आहे, यावर दोन्ही परंपरांचा विश्वास आहे.

शीख आणि सुफी नात्याचे सर्वात सुंदर उदाहरण म्हणजे शीख धर्माचा पवित्र ग्रंथ "गुरु ग्रंथ साहिब" यामध्ये शेख फरीद यांच्या रचनांचा झालेला समावेश. बाबा फरीद (११७३–१२६६) या नावाने ओळखले जाणारे शेख फरीद हे पंजाबमधील सुरुवातीच्या आणि प्रसिद्ध सुफी कवींपैकी एक होते. चिश्ती परंपरेशी जोडलेल्या बाबा फरीद यांनी पंजाबी भाषेत काव्यरचना केली. निसर्ग, मानवी दुःख, नश्वरता आणि प्रेम या दैनंदिन जीवनातील प्रतिमा वापरून त्यांनी गहन आध्यात्मिक सत्य मांडले. ऐहिक जीवनाची क्षणभंगुरता, ईश्वराच्या स्मरणाचे महत्त्व आणि अहंकार व स्वार्थावर मात करण्याची गरज त्यांच्या रचनांतून व्यक्त होते.

शीख गुरूंनी बाबा फरीद यांच्या काव्याची केवळ प्रशंसा केली नाही; त्यांनी या रचना पवित्र धर्मग्रंथात जतन करून ठेवल्या. धार्मिक ओळखीच्या सीमा ओलांडून आध्यात्मिक शहाणपणाचा सन्मान करण्याचे हे अनोखे उदाहरण ठरले. या नात्याचा आणखी एक पैलू लक्ष वेधून घेतो. गुरु नानक यांच्या नंतरच्या गुरूंनी बाबा फरीद यांच्या रचना केवळ जशाच्या तशा स्वीकारल्या नाहीत. काही गुरूंनी त्यांच्या रचनांवर भाष्य करत त्यांचा आध्यात्मिक संदेश पुढे नेला, तर काहींनी वेगळा दृष्टिकोनही मांडला. या देवाणघेवाणीतून हे स्पष्ट होते, शीख धर्म आणि सुफीवाद यांतील संबंध हा आंधळेपणाने स्वीकारण्याचा नसून तो सक्रिय संवादाचा होता.

भाई मर्दाना यांचे जीवन या सामायिक आध्यात्मिक विश्वाचे आणखी एक दर्शन घडवते. मर्दाना हे मुस्लिम संगीतकार आणि गुरु नानक यांचे जिवलग सोबती होते. गुरु नानक यांच्या प्रवासात ते सोबत असत आणि गुरु नानक शबद गात असताना ते "रबाब" हे तंतुवाद्य वाजवत असत. त्यांचे नाते केवळ गुरु आणि वादक इतकेच मर्यादित नव्हते. तत्कालीन धार्मिक भेदांच्या पलीकडे गेलेली ती मैत्री होती. एका शीख आध्यात्मिक गुरूंसोबत प्रवास करत त्यांच्या भक्ती संदेशात सहभागी होणारा मुस्लिम सोबती हे आंतरधर्मीय मैत्रीचे सामर्थ्य दाखवून देते. औपचारिक धार्मिक वादांपेक्षा आध्यात्मिक सहवास अधिक प्रभावी संवाद साधतो, याची आठवण या मैत्रीतून होते.

धार्मिक कर्मकांडावरील टीका हे देखील दोन्ही परंपरांतील समान सूत्र आहे. मनाची अवस्था सुधारण्याऐवजी धर्माला केवळ बाह्य देखाव्यापुरते मर्यादित ठेवण्याविरोधात सुफी संतांनी नेहमीच इशारा दिला. एखादी व्यक्ती बाह्य कर्मकांड करूनही मनात अहंकार, लोभ आणि द्वेष बाळगू शकते. गुरु नानक यांनीही हीच चिंता व्यक्त केली. ज्या धार्मिक आचरणातून करुणा, प्रामाणिकपणा आणि नम्रता निर्माण होत नाही, त्याचे मूल्य काय, असा प्रश्न त्यांनी विचारला. विशिष्ट पेहराव केल्याने, तीर्थक्षेत्रांना भेटी दिल्याने किंवा धार्मिक चिन्हे मिरवल्याने माणूस आध्यात्मिकदृष्ट्या श्रेष्ठ ठरत नाही; खरा बदल अंतरंगात व्हायला हवा, अशी त्यांची शिकवण होती.

हाच विचार मानवी समतेच्या आग्रहाशी जोडला गेला आहे. सुफी आश्रमांत सर्व पार्श्वभूमीच्या लोकांचे स्वागत होत असे, तर गुरु नानक यांनी जातिव्यवस्था आणि त्यातून होणाऱ्या भेदभावाला आव्हान दिले. ईश्वरासमोर सर्व माणसे समान आहेत, हा विचार त्यांनी रुजवला. जात, दर्जा किंवा संपत्तीचा भेद न करता सर्वांनी एकत्र बसून भोजन करण्याची "लंगर" ही शीख परंपरा या समतेचे व्यावहारिक रूप आहे. लंगर ही परंपरा शीख समाजात विकसित झाली असली तरी तिचा आत्मा सुफी केंद्रांतील सर्वसमावेशक आतिथ्याशी मिळताजुळता आहे. सामाजिक बहिष्काराचे साधन बनणारी आध्यात्मिकता आपला अर्थ गमावून बसते, याची जाणीव दोन्ही परंपरा करून देतात.

संगीत हे देखील दोन्ही परंपरांचे मिलनस्थळ ठरले. सुफी मेळाव्यांमध्ये ईश्वरी प्रेम आणि ओढ जागवण्यासाठी भक्तिसंगीताचा, विशेषतः कव्वालीचा वापर केला जातो. शीख धर्मात गुरूंच्या वाणीचे भक्तिपूर्ण गायन करणारी "कीर्तन" परंपरा विकसित झाली. या दोन्ही स्वतंत्र संगीत पद्धती असल्या तरी आध्यात्मिक अनुभव पोहोचवण्याची संगीताची ताकद त्यातून दिसून येते. दोन्ही परंपरांत काव्य आणि संगीत ही केवळ कला नसून ईश्वर स्मरणाची आणि मानवी हृदय बदलण्याची साधने आहेत.

तरीही शीख धर्माची प्रत्येक महत्त्वाची शिकवण सुफीवादातूनच आली आहे असे मानणे ऐतिहासिकदृष्ट्या चुकीचे ठरेल. भारतातील भक्ती परंपरा, आधीच्या संत-कवींची शिकवण आणि गुरु नानक यांचा स्वतंत्र आध्यात्मिक अनुभव यांतूनही शीख धर्म घडला आहे. गुरूंचे स्थान, गृहस्थाश्रमाचे महत्त्व, "संगत" ही संस्था आणि पुढे झालेली "खालसा" पंथाची स्थापना यांमुळे शीख धर्माला स्वतःची स्वतंत्र धार्मिक ओळख आणि संस्थात्मक इतिहास लाभला आहे.

(लेखक आमिर सुहेल वाणी हे अभ्यासक आणि स्तंभलेखक आहेत.)