गुरुपर्व निमित्त जामा मशीद समितीतर्फे नगर कीर्तनावर पुष्पवृष्टी; मुस्लिम मुलींच्या सहभागातून ऐक्याचा संदेश

Story by  आवाज़ मराठी | Published by  Mrudgandha Dixit • 58 m ago
गुरुपर्व निमित्त जामा मशीद समितीतर्फे नगर कीर्तनावर पुष्पवृष्टी करून स्वागत करताना नागरिक
गुरुपर्व निमित्त जामा मशीद समितीतर्फे नगर कीर्तनावर पुष्पवृष्टी करून स्वागत करताना नागरिक

 

ओनिका माहेश्वरी

धर्म वेगवेगळे असू शकतात आणि पूजा करण्याच्या पद्धतीही भिन्न असू शकतात. मात्र मनात एकमेकांप्रति प्रेम आणि आदर असल्यास सर्व भिंती गळून पडतात. गुरु नानक देव यांच्या प्रकाश पर्वाच्या निमित्ताने निघालेल्या नगर कीर्तनाचे मुस्लिम समाजाने फुलांची उधळण करून स्वागत केले. एका बाजूला मुस्लिम बांधव नगर कीर्तनावर फुले उधळत होते. दुसऱ्या बाजूला दोन मुस्लिम मुली शीख संगतीसोबत या नगर कीर्तनात सहभागी झाल्या होत्या. शीख समाजानेही या प्रेमाचा आणि आदराचा मोकळ्या मनाने स्वीकार केला. हा प्रसंग केवळ धार्मिक कार्यक्रमापुरता मर्यादित न राहता हिंदू-मुस्लिम-शीख ऐक्याचे आणि माणुसकीचे प्रतीक ठरला.

गुरुपर्व निमित्त जामा मशीद समितीतर्फे नगर कीर्तनाच्या स्वागताची तयारी करण्यात आली होती. मशिदीसमोर मुस्लिम समाजातील नागरिकांनी एक स्टॉल उभारला. या मार्गावरून जाणाऱ्या भाविकांवर फुलांची उधळण करून त्यांचे स्वागत केले गेले. तसेच नगर कीर्तनात सहभागी झालेल्या संगतीसाठी पाणी, बिस्किटे, चहा आणि मिठाईची व्यवस्था करण्यात आली होती. ही प्रथा आजची नसून गेल्या अनेक वर्षांपासून सुरू असल्याची माहिती समितीच्या सदस्यांनी दिली. दरवर्षी गुरुपर्व निमित्त मुस्लिम समाज उत्साहाने नगर कीर्तनाचे स्वागत करतो. नगर कीर्तन मशिदीसमोर पोहोचताच मुस्लिम बांधव फुले उधळतात. त्यानंतर गुरुद्वारा समितीच्या सदस्यांना गमछा घालून सन्मानित केले जाते आणि एकमेकांना मिठाई भरवून आनंद साजरा केला जातो.

हा उपक्रम केवळ एका दिवसापुरता किंवा एका वर्षापुरता मर्यादित नाही. गेल्या सुमारे बारा ते पंधरा वर्षांपासून ही परंपरा अखंड सुरू आहे. वर्षभरातील अनेक धार्मिक सणांना मुस्लिम समाजातर्फे असे स्वागत आणि सेवा उपक्रम राबवले जातात. जन्माष्टमी असो, गुरुपर्व असो किंवा जुलूस-ए-मोहम्मदी, प्रत्येक उत्सवात विविध समाजांतील लोक एकमेकांचे स्वागत करतात. मुस्लिम समाजाचा जुलूस-ए-मोहम्मदी निघतो, त्या वेळी गुरुद्वारा समिती आणि मंदिर समित्यांतर्फे त्यांचे स्वागत केले जाते. त्याचप्रमाणे हिंदू आणि शीख समाजाचे धार्मिक कार्यक्रम होतात, त्या वेळी मुस्लिम समाजही पुढे येऊन त्यांचा सन्मान करतो. सण कोणत्याही धर्माचा असो, तो एकत्र मिळून साजरा केल्यास समाजात प्रेम आणि विश्वास वाढतो, अशी भावना समितीच्या सदस्यांनी मांडली.

या संपूर्ण कार्यक्रमात दोन मुस्लिम मुलींचा सहभाग चर्चेचा विषय ठरला. या मुलींनी शीख संगतीसोबत पाऊल टाकत या धार्मिक मिरवणुकीत सहभाग घेतला. शीख समाजातील नागरिकांनीही त्यांना आपुलकीने आपल्यात सामावून घेतले. मुलांच्या मनात धर्माआधी प्रेम, आदर आणि आपुलकी रुजणे किती गरजेचे असते, हे या प्रसंगातून दिसून आले. वेगवेगळ्या समाजांतील मुले एकमेकांच्या सण आणि परंपरांशी जोडली गेल्यास पुढील पिढ्यांमध्ये सामंजस्य आणि सलोख्याचा पाया भक्कम होतो. धार्मिक विविधता ही समाजाची ओळख असून एकमेकांच्या श्रद्धेचा आदर करणे हीच खरी माणुसकी असल्याचा संदेश यातून मिळाला.

गुरु नानक देव यांनी संपूर्ण मानवजातीला समानता, प्रेम, सेवा आणि बंधुभावाची शिकवण दिली. माणसाला माणूस म्हणून पाहण्याचा आणि सर्वांप्रती समान भाव ठेवण्याचा विचार त्यांनी मांडला. जात, धर्म आणि उच्च-नीच भेदभावाच्या पलीकडे जाऊन त्यांनी मानवतेचा मार्ग दाखवला. गुरुपर्व निमित्त मुस्लिम समाजाने केलेले स्वागत आणि शीख संगतीने दिलेला आदर यातून गुरु नानक देव यांच्या शिकवणीचे दर्शन घडले. तिथे कोणीही कोणाचा धर्म विचारला नाही किंवा श्रद्धेवरून कोणताही भेदभाव दिसला नाही. मुस्लिम बांधवांनी भाविकांची सेवा केली आणि शीख संगतीने त्या प्रेमाचा आदरपूर्वक स्वीकार केला. हीच भावना कोणत्याही समाजाला एकसंध ठेवते.

सर्वच धर्मांचे सण आमच्यासाठी आनंदाचे आणि उत्सवाचे क्षण असतात, असे समितीच्या सदस्यांनी सांगितले. अशा उपक्रमांतून विविध समाजांतील नातेसंबंध दीर्घकाळासाठी घट्ट होतात. आज अनेकदा धर्म आणि समुदायाच्या नावावरून समाजात दुरावा निर्माण झाल्याचे चित्र दिसते. अशा काळात नगर कीर्तनाच्या स्वागताचा हा प्रसंग सकारात्मक ऊर्जा देतो. सर्वसामान्य माणसांमधील प्रेम, सहकार्य आणि बंधुभावाची परंपरा आजही जिवंत असल्याचे यातून स्पष्ट होते. फुलांची ही उधळण केवळ नगर कीर्तनाचे स्वागत नव्हते, तर धर्माच्या सीमा ओलांडून जोडल्या गेलेल्या नात्यांचा तो सन्मान होता. धर्म आपल्याला विभागण्यासाठी नसून एकमेकांचा आदर करायला शिकवण्यासाठी असतो, याची आठवण या घटनेने करून दिली आहे.