पैगंबर मुहम्मद यांच्या चरित्र लेखनात हिंदू विद्वानांचे योगदान; भारतीय बौद्धिक परंपरेतील संवादाचा वारसा

Story by  आवाज़ मराठी | Published by  Mrudgandha Dixit • 45 m ago
प्रातिनिधिक इमेज
प्रातिनिधिक इमेज

 

डॉ. रहमतुल्लाह

पैगंबर मुहम्मद (स.) यांच्या जीवनचरित्राने म्हणजेच "सीरत" साहित्याने विविध धार्मिक आणि बौद्धिक पार्श्वभूमीच्या अभ्यासकांना नेहमीच आकर्षित केले आहे. भारतात विविध धार्मिक समुदायांमध्ये शतकानुशतके चाललेल्या संवादातून अनेक हिंदू विद्वान आणि विचारवंतांनी पैगंबर मुहम्मद यांचे जीवन, शिकवण आणि व्यक्तिमत्त्वाचा अभ्यास केला. त्यांनी उर्दू, हिंदी आणि इंग्रजी भाषांमध्ये पुस्तके, लेख आणि काव्याच्या माध्यमातून आपले विचार मांडले. त्यांच्या लेखनात पैगंबरांचे जीवन आणि कार्याबद्दल सकारात्मक आणि चिकित्सक अशा दोन्ही बाजू पाहायला मिळतात.

पैगंबरांचे जीवन आणि कार्याबद्दल सकारात्मक विचार मांडणाऱ्यांमध्ये एम. एन. रॉय, एन. के. सिंग आणि टी. एल. वासवानी यांचा समावेश होतो. त्यांच्या लेखनातून हिंदू-मुस्लिम एकोपा आणि परस्पर सामंजस्याचे महत्त्व अधोरेखित होते. धार्मिक द्वेषातून भारत आणि इतर आशियाई देशांच्या प्रगतीचा वेग मंदावतो, असे मत त्यांनी मांडले. त्याच वेळी भारतीय संस्कृतीच्या जडणघडणीत मुस्लिम समाजाने निभावलेल्या भूमिकेची दखलही त्यांनी घेतली.

सीरत साहित्यात योगदान देणाऱ्या सुरुवातीच्या हिंदू लेखकांमध्ये लालचंद अमरदिनोमल जगतियानी यांचे नाव महत्त्वाचे आहे. त्यांचे "मुहम्मद रसूलुल्लाह" हे सिंधी भाषेतील पैगंबर मुहम्मद यांच्या जीवनावरील उल्लेखनीय पुस्तक मानले जाते. याशिवाय श्राद सेह प्रकाश यांनी १९०७ मध्ये "हजरत मुहम्मद साहिब, फाउंडर ऑफ इस्लाम" हे पुस्तक लिहिले. डॉ. निशिकांत चट्टोपाध्याय यांनी १९०४ मध्ये "मुहम्मद: द प्रॉफेट ऑफ इस्लाम" या ग्रंथाचे लेखन केले. जे. एस. दारा यांनी १९१४ मध्ये प्रसिद्ध झालेल्या "रसूल-ए-अरबी" या पुस्तकातून या साहित्यात मोलाची भर घातली. बिगर-मुस्लिम विचारवंतांनी पैगंबरांचे जीवन आणि शिकवण समजून घेण्यासाठी केलेले हे सुरुवातीचे प्रयत्न होते.

या परंपरेतील इतर उल्लेखनीय पुस्तकांमध्ये लक्ष्मण प्रसाद यांचे "अरब का चांद" (१९३२), पंडित सुंदर लाल यांचे "हजरत मुहम्मद और इस्लाम", रघुनाथ सहाय यांचे "पैगंबर-ए-इस्लाम" आणि गोबिंद राम सेठी शाद यांचे "चार मिनार" (१९४४) यांचा समावेश होतो. प्राध्यापक लाला लजपत राय यांनीही "हजरत मुहम्मद साहिब की सवानह-उम्री" या पुस्तकातून पैगंबरांचे चरित्र मांडले. पैगंबरांचे जीवन समजून घेऊन ते आपल्या वाचकांपर्यंत पोहोचवण्याचा हिंदू लेखकांचा प्रयत्न या लेखनातून दिसतो. सीरतचा अभ्यास केवळ मुस्लिम विद्वानांपुरता मर्यादित न राहता इतर धार्मिक समुदायांतील अभ्यासकांनाही आकर्षित करत होता, हे यावरून स्पष्ट होते.

अलीकडच्या काळातील लेखनात के. एस. रामकृष्ण राव यांचे "मुहम्मद: द प्रॉफेट ऑफ इस्लाम" हे पुस्तक लक्ष वेधून घेते. एका भारतीय हिंदू विचारवंताच्या दृष्टिकोनातून पैगंबरांचे चारित्र्य, नेतृत्व आणि मानवी समाजासाठीचे योगदान या पुस्तकात मांडले आहे. तसेच एन. के. सिंग यांच्या "प्रॉफेट मुहम्मद अँड हिज कम्पॅनियन्स" या पुस्तकात पैगंबरांच्या जीवनासोबतच त्यांचे सोबती आणि सुरुवातीच्या मुस्लिम समाजाचा वेध घेतला आहे. हिंदू विद्वानांनी पैगंबरांचे जीवन, शिकवण आणि ध्येय कसे समजून घेतले व मांडले, याची सखोल माहिती या ग्रंथांतून मिळते.

स्वतंत्र पुस्तकांव्यतिरिक्त हिंदू आणि इतर बिगर-मुस्लिम विचारवंतांनी लेख, निबंध आणि कवितांच्या माध्यमातूनही सीरत साहित्यात योगदान दिले आहे. सय्यद बशीर अहमद यांनी संकलित केलेला "सरवर-ए-कौनैन अग्यार की नजर में" हा संग्रह या संदर्भात विशेष महत्त्वाचा आहे. या संग्रहात मालिक राम, पंडित गोपाल किशन, लाला राम लाल वर्मा, मोती लाल माथुर, भगवान दास भगवान आणि स्वामी ब्रज नारायण संन्यासी यांसारख्या विविध धर्मांतील लेखकांचे लेख एकत्र केले आहेत. यासोबतच दिल्लू राम कौसरी, महाराजा सर किशन प्रसाद, मुन्शी शंकर लाल साकी, मनोहर लाल बिहार आणि महात्मा जोतिबा फुले यांच्या साहित्यिक रचनांतूनही पैगंबरांचे जीवन आणि शिकवणीबद्दलची आस्था दिसून येते.

पैगंबरांच्या जीवनचरित्रावरील हिंदू विद्वानांच्या लेखनाचे विश्लेषण केल्यास त्यात काही समान सूत्रे दिसून येतात. पैगंबर मुहम्मद यांचे नैतिक चारित्र्य हा त्यातील सर्वात प्रमुख विषय आहे. लेखकांनी त्यांचा प्रामाणिकपणा, सत्यनिष्ठा, संयम, क्षमाशीलता, दयाळूपणा, नम्रता आणि करुणा या गुणांची चर्चा केली आहे. या गुणांनी त्यांचे व्यक्तिमत्त्व कसे घडवले आणि सर्व पार्श्वभूमीच्या लोकांसाठी आजही त्यातून कोणते धडे मिळतात, हे लेखकांनी दाखवून दिले आहे.

समाजसुधारक म्हणून पैगंबरांची भूमिका हा या लेखनातील दुसरा महत्त्वाचा विषय आहे. न्याय प्रस्थापित करणे, दुर्बल घटकांच्या हक्कांचे रक्षण करणे, महिलांचा दर्जा सुधारणे, समानता रुजवणे आणि सामाजिक भेदभाव नष्ट करणे यांसाठी त्यांनी केलेल्या प्रयत्नांनी अनेक लेखकांचे लक्ष वेधले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली अरब समाजात झालेले परिवर्तन आणि मानवी सभ्यतेसाठी त्याचे महत्त्व काही अभ्यासकांनी तपासले आहे. विविध धार्मिक समुदायांमध्ये परस्पर सामंजस्य निर्माण होण्यासाठी त्यांचा शांती, दया आणि सहअस्तित्वाचा संदेश कसा उपयुक्त ठरतो, यावरही लेखकांनी भाष्य केले आहे. याशिवाय एकेश्वरवाद, उत्तरदायित्व, दानधर्म, बंधुभाव आणि मानवी समानता या इस्लामच्या नैतिक व धार्मिक शिकवणींमध्ये हिंदू विद्वानांनी रस दाखवला. मदिनेत मुस्लिम समाजाची स्थापना करणे आणि स्थिर सामाजिक व्यवस्था निर्माण करणे या पैगंबरांच्या ऐतिहासिक नेतृत्वाचीही दखल घेतली गेली आहे.

या लेखकांची लेखनपद्धती त्यांची शैक्षणिक पार्श्वभूमी, उपलब्ध साधने आणि बौद्धिक उद्दिष्टांनुसार वेगवेगळी राहिली आहे. काहींनी पैगंबरांचे जीवन कालक्रमानुसार मांडले, तर दुसरीकडे काहींनी त्यांचे चारित्र्य, शिकवण आणि कार्याच्या विशिष्ट पैलूंवर लक्ष केंद्रित केले. विषयाची व्यापक समज विकसित करण्यासाठी काहींनी इस्लामी शिकवणींची इतर धर्मांच्या शिकवणींशी तुलनाही केली. लेखन करताना त्यांनी उपलब्ध सीरत ग्रंथ, इस्लामी ग्रंथांचे अनुवाद आणि प्राच्यविद्या अभ्यासकांच्या लिखाणाचा आधार घेतला. हे लेखक वेगवेगळ्या प्रदेशांतून आलेले असल्याने आणि त्यांनी भिन्न साधने वापरल्याने प्रत्येकाच्या कार्याचा स्वतंत्र अभ्यास होणे गरजेचे आहे. त्यांनी मांडलेल्या माहितीची ऐतिहासिक अचूकता, संदर्भ साधने आणि कुराण व हदीसबद्दलची त्यांची समज तपासणे आवश्यक ठरते. भाषाभेदाची मर्यादा, मूळ इस्लामी साधनांची उपलब्धता आणि अभिजात सीरत साहित्याची ओळख या गोष्टींचा त्यांच्या आकलनावर परिणाम झाला असू शकतो. त्यामुळे त्यांच्या लेखनाची प्रस्थापित सीरत ग्रंथांशी तुलना केल्यास त्यांच्या योगदानाचे मूल्य आणि मर्यादा दोन्ही समजून घेता येतात.

भारताचा बौद्धिक इतिहास आणि आंतरधर्मीय संबंधांच्या दृष्टीने हिंदू विद्वानांचे हे योगदान मोलाचे आहे. पैगंबर मुहम्मद यांच्या जीवनाने मुस्लिम समाजाबाहेरील अभ्यासकांनाही आकर्षित केले, हे या लेखनातून सिद्ध होते. भारतीय उपखंडातील विविध धार्मिक परंपरांमध्ये झालेल्या बौद्धिक देवाणघेवाणीचा हा पुरावा आहे. इतर समुदायांतील अभ्यासकांनी केलेल्या धार्मिक परंपरांच्या अभ्यासातून संवाद आणि परस्पर सामंजस्याच्या संधी निर्माण होतात. हिंदू लेखकांच्या या साहित्याने बिगर-मुस्लिम वाचकांना इस्लामी इतिहास, नैतिकता आणि पैगंबरांच्या व्यक्तिमत्त्वाची ओळख करून दिली. त्याच वेळी वेगळ्या पार्श्वभूमीच्या विचारवंतांनी पैगंबरांच्या शिकवणीकडे कसे पाहिले, हे मुस्लिम वाचकांनाही समजण्यास मदत झाली. आधुनिक भारतातील पैगंबर मुहम्मद यांच्या अभ्यासाचा हा एक महत्त्वाचा पैलू आहे. या साहित्याचा पद्धतशीर अभ्यास केल्यास इस्लामिक स्टडीज, तुलनात्मक धर्म अभ्यास आणि भारताचा बौद्धिक इतिहास समृद्ध होईल. विविधतेने नटलेल्या समाजात हिंदू-मुस्लिम संबंधांचे संतुलित आकलन होण्यास आणि परस्पर आदराची भावना वाढण्यास त्यातून हातभार लागेल.

(लेखक डॉ. रहमतुल्लाह हे अलिगढ मुस्लिम विद्यापीठाच्या इस्लामिक स्टडीज विभागात सहाय्यक प्राध्यापक आहेत.)