एहसान फझिली
मध्य काश्मीरमधील एका छोट्याशा खेड्यातून आलेल्या तरुण सादिक अली मीर याने लहानपणापासूनच आभाळाच्या ओढीने भारावून जात एरोस्पेस इंजिनिअर आणि उद्योजक म्हणून आपले स्थान निर्माण करत मोठी झेप घेतली आहे. एरोस्पेस इंजिनिअरिंगच्या क्षेत्रातील अनेक वर्षांचा अभ्यास आणि प्रशिक्षणानंतर आता त्याची महत्त्वाकांक्षा स्वायत्त विमानांपासून थेट अंतराळ संशोधनापर्यंत पोहोचली आहे.
२४ वर्षीय सादिक अली मीर याची १२ ऑक्टोबर २०२६ रोजी प्रतिष्ठित 'नॅशनल स्पेस सोसायटी'च्या (NSS) पहिल्या '३० अंडर ३०' (30 Under 30 Class of 2026) यादीत निवड झाली आहे. अंतराळ संशोधन, विकास आणि मानवी वसाहतींच्या भविष्यासाठी योगदान देणाऱ्या ३० उदयोन्मुख तरुणांचा या यादीत गौरव करण्यात आला आहे.
'आवाज द व्हॉइस'शी बोलताना सादिक अली म्हणाला, "नॅशनल स्पेस सोसायटीच्या पहिल्या ३० अंडर ३० यादीत निवड होणे हा माझ्या प्रवासातील अत्यंत अर्थपूर्ण टप्पा आहे. NSS ही आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्यताप्राप्त संस्था असून ती अंतराळ संशोधन, विकास आणि मानवाच्या अंतराळ प्रवासी संस्कृतीच्या भविष्यासाठी काम करते. हा माझ्यासाठी सन्मान आणि जबाबदारी दोन्ही आहे, आणि या पहिल्याच तुकडीत जम्मू-काश्मीर व भारताचे प्रतिनिधित्व करताना मला अभिमान वाटतो."
"तुमची सुरुवात कुठून झाली यावरून तुमच्या मर्यादा ठरत नाहीत. मोठी स्वप्ने पाहण्यासाठी मोठ्या शहरातून येण्याची किंवा सुरुवातीपासून सर्व संधी उपलब्ध असण्याची गरज नसते," असे मत त्याने व्यक्त केले. काश्मीरमधील किंवा भारतातील कोणत्याही कोपऱ्यातील तरुण विद्यार्थ्यांनी याकडे पाहून आपणही विज्ञान, अभियांत्रिकी आणि अंतराळातील मानवी भविष्यात योगदान देऊ शकतो असा विश्वास बाळगावा, अशी आशा त्याने व्यक्त केली.
आकाशातील एका चमत्काराने बदलले आयुष्य
या यशापर्यंतच्या प्रवासाबद्दल सांगताना सादिक अली म्हणाला की, सातवीत शिकत असताना त्याची ही वाटचाल सुरू झाली. "काश्मीरच्या हिवाळी आकाशात मी आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानक (ISS) जाताना पाहिले आणि तिथूनच मला ओढ लागली. दहावीपर्यंत मी एरोस्पेस इंजिनिअरिंग करण्याचा निर्णय पक्का केला होता."
पुढे बंगळुरूच्या राष्ट्रीय विद्यालय (RV) कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमध्ये शिकताना त्याने सुहाना अर्श, ऋषिका बंडोपाध्याय, तुषार मोंगिया आणि वैभवी मोकाशी या आपल्या मित्रांसोबत 'टीम एरोअॅस्ट्रो'ची (Team AeroAstro) सह-स्थापना केली. "आम्ही एकत्र मिळून eVTOL विमान संकल्पना आणि अंतराळाशी संबंधित प्रकल्पांवर काम केले, आणि आमच्या एका विमानाचा प्रकल्प थेट 'बोईंग'समोर सादर करण्याची संधी आम्हाला मिळाली," असे त्याने सांगितले.
यानंतर तो मायलो स्पेस सायन्स इन्स्टिट्यूट, नासा आणि ऑस्ट्रेलियन स्पेस एजन्सी यांच्या संयुक्त आंतरराष्ट्रीय अंतराळ कार्यबल विकास कार्यक्रमात सहभागी झाला. तिथे त्याने 'ICEFOX' चंद्र रोव्हर विकास कार्यक्रमात लीड सिस्टम्स इंजिनिअर म्हणून जबाबदारी सांभाळली.
"पदवीनंतर मी आयआयटी रुरकी येथील संशोधन प्रकल्पांद्वारे माझा अभियांत्रिकी अनुभव वाढवत नेला, ज्यात मानवरहित हवाई वाहनांच्या विकासाचा समावेश होता. तसेच टायटन्स स्पेस इंडस्ट्रीजच्या २०३० च्या नियोजित मोहिमेसाठी अंतराळवीर-उमेदवार प्रशिक्षणाचा पहिला टप्पा सुरू केला. माझ्या मार्गदर्शकांसोबत मिळून मी 'झेफायरा डायनॅमिक्स'ची (Zephyra Dynamics) सह-स्थापनाही केली," असे सादिक म्हणाला. तांत्रिक काम, संशोधन, नेतृत्व आणि उद्योजकता यांच्या मिलाफामुळेच या सन्मानापर्यंतचा प्रवास घडला, असा विश्वास त्याने व्यक्त केला.
कुतूहलातून साकारलेली स्वदेशी तंत्रज्ञानाची झेप
अंतराळ तंत्रज्ञान हे एरोस्पेस इंजिनिअरिंग, रोबोटिक्स, प्रपल्शन, इलेक्ट्रॉनिक्स, सॉफ्टवेअर आणि सिस्टम्स इंजिनिअरिंग यांना एकत्र आणून पृथ्वीपलीकडील संशोधनाचे मार्ग खुले करते, असे सादिक सांगतो. "हे क्षेत्र फक्त रॉकेट्स आणि अंतराळवीरांपुरते मर्यादित नाही; यात उपग्रह, चंद्र रोव्हर्स, नेव्हिगेशन, दळणवळण आणि अंतराळातील जीवन व कामास आधार देणारे तंत्रज्ञानही येते."
लहानपणी पृथ्वीभोवती फिरणारी मानवनिर्मित प्रयोगशाळा पाहिल्यानंतर अशा अद्भुत यंत्रणा कशा तयार केल्या जातात आणि चालवल्या जातात याचे कुतूहल निर्माण झाले. पदवीच्या शिक्षणादरम्यान या कुतूहलाचे रूपांतर विमान रचना, पुनर्वापर करता येण्याजोगी प्रक्षेपण वाहने आणि चंद्र रोव्हर विकासाच्या प्रत्यक्ष कामात झाले. सुरुवातीची जिज्ञासा पुढे काहीतरी वेगळे घडवण्याच्या इच्छेमध्ये बदलली. कठीण वातावरणात काम करणारी गुंतागुंतीची यंत्रे तयार करण्याचे आव्हान त्याला खुणावत होते. ICEFOX वर काम करताना एका मोहिमेसाठी अनेक शाखा एकत्र येणे किती गरजेचे असते हे त्याला शिकायला मिळाले. बडगाममधील लबेरताल गावातून आल्यामुळे इतरांसाठीही संधी निर्माण करण्याची तीव्र इच्छा त्याच्या मनात निर्माण झाली.
पदवी पूर्ण झाल्यानंतर त्याला अमेरिकेतून पदव्युत्तर शिक्षणाच्या तसेच नोकरीच्या अनेक संधी चालून आल्या होत्या. "पण मी झेफायरा डायनॅमिक्ससोबत राहून भारतातील शहरी हवाई वाहतुकीला आकार देण्याचा मार्ग निवडला," असे त्याने सांगितले. "आम्ही 'केस्ट्रेल एक्स२' (Kestrel X2) हे स्वायत्त eVTOL विमान आणि 'लॅमिनार' (LAMINAR) हे शहरी हवाई वाहतूक व्यवस्थापन व्यासपीठ विकसित करत आहोत. महत्त्वाकांक्षी कल्पनांना भारतात बनवलेल्या उपयुक्त आणि विश्वासार्ह तंत्रज्ञानात बदलणे हा माझा मोठा उद्देश आहे."
कुटुंबाची साथ
महत्त्वाकांक्षेला शिस्त, तांत्रिक अचूकता आणि सतत शिकण्याच्या वृत्तीची जोड असावी लागते, हे व्यावसायिक प्रवासाने शिकवले असल्याचे सादिक नमूद करतो. आयआयटी रुरकीमधील संशोधनाने त्याला प्रत्यक्ष अभियांत्रिकी आव्हानांची ओळख करून दिली, तर अंतराळवीर उमेदवार प्रशिक्षणाने पूर्वतयारी, सातत्य, सांघिक काम आणि जबाबदारीचे मोल शिकवले.
मध्य काश्मीरमधील बडगाम जिल्ह्यातील सोइबुग भागातील लबेरताल गावात २००३ मध्ये जन्मलेल्या सादिक अली मीर याने आपल्या यशाचे श्रेय कुटुंबाला दिले आहे. वडील मोहम्मद जाफर मीर, आई झरीना, मित्र, शिक्षक आणि मार्गदर्शक यांचा मोठा आधार त्याला लाभला. बारावीनंतर २०२१ मध्ये त्याने बंगळुरूच्या आरव्ही कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमध्ये एरोस्पेस इंजिनिअरिंगला प्रवेश घेतला. २०२५ मध्ये आपल्या विभागातील आणि बॅचमधील सर्वोत्कृष्ट विद्यार्थी (Best Outgoing Student) म्हणून त्याने पदवी संपादन केली. आपल्या या यशाचा आनंद तो कुटुंब, शिक्षक आणि या प्रवासात साथ देणाऱ्या प्रत्येकासोबत वाटून घेतो.