पुणे महानगरपालिकेकडून खिसाल जाफरी यांच्या वैद्यकीय सेवेचा गौरव

Story by  Bhakti Chalak | Published by  Bhakti Chalak • 1 h ago
खिसाल जाफरी यांना पुणे महानगरपालिकेच्या वतीने पुणे प्रथम सन्मानचिन्ह प्रदान करताना महापौर मंजुषा नागपुरे
खिसाल जाफरी यांना पुणे महानगरपालिकेच्या वतीने पुणे प्रथम सन्मानचिन्ह प्रदान करताना महापौर मंजुषा नागपुरे

 

भक्ती चाळक

पुण्यासारख्या मेट्रो संस्कृतीत विस्तारणाऱ्या शहरात अनेकदा शेजारच्या माणसाची साधी ख्यालीखुशाली विचारायलाही कोणाला वेळ नसतो. पण याच धावपळीच्या शहरात वैद्यकीय आणीबाणीत अडकलेल्या रुग्णाला वेळेवर मोफत ऑक्सिजन मशीन पोहोचवणारा आणि दूरवरच्या खेड्यातून शिक्षणाची स्वप्ने घेऊन आलेल्या विद्यार्थ्याला पुण्यात स्थिरस्थावर करणारा एक सामाजिक कार्यकर्ता अखंड राबतोय.

खिसाल जाफरीअसे या कार्यकर्त्याचे नाव आहे. वैद्यकीय आणि सामाजिक क्षेत्रातील त्यांच्या या निष्ठावंत अन् अहोरात्र सेवेची दखल घेत पुणे महानगरपालिकेच्या वतीने नुकत्याच पार पडलेल्या ८० व्या स्वातंत्र्यदिनाच्या मुहूर्तावर त्यांचा विशेष गौरव करण्यात आला.

पुण्याच्या महापौर मंजुषा नागपुरे यांच्या हस्ते खिसाल जाफरी यांना अत्यंत मानाचा समजला जाणारा “पुणे प्रथम सन्मानचिन्ह” प्रदान करण्यात आला. या निमित्ताने ‘आवाज द व्हॉईस’ला दिलेल्या मुलाखतीत खिसाल जाफरी यांनी आपला प्रवास, सामाजिक कार्याचा वारसा आणि भविष्यातील संकल्प यावर अगदी मनापासून चर्चा केल्या.

कॉलेजच्या दिवसात पेटली समाजकार्याची ठिणगी
समाजसेवेची आवड किंवा ओढ ही खिसाल जाफरी यांना काही अचानक निर्माण झालेली नाही. त्यांना ही ओढ त्यांच्या वाडवडिलांकडून वारशाने मिळाली आहे. खिसाल यांचे वडील पुणे महानगरपालिकेमध्ये अधिकारी म्हणून कार्यरत होते. इतकेच नव्हे, तर त्यांचे आजोबाही पालिकेत अधिकारी पदावर राहून जनतेची सेवा करत आले. त्यामुळे समाजसेवेचे धडे त्यांना अगदी लहानपणापासून घरातच मिळाले.

आपल्या सामाजिक कारकीर्दीच्या सुरुवातीविषयी बोलताना खिसाल जाफरी सांगतात, “विद्यार्थीदशेपासून मला सामाजिक कार्याची ही पारंपारिक ओढ आहे. कॉलेजवयात असताना काही विद्यार्थ्यांचे फीचे प्रश्न समोर आले. त्या एका विद्यार्थ्याच्या फीचा प्रश्न सोडवल्यानंतर आपण शैक्षणिक आणि वैद्यकीय क्षेत्रामध्ये काम केलं पाहिजे असं मला वाटलं. म्हणून वयाच्या २० व्या वर्षापासून मी सामाजिक कार्याला सुरुवात केली.”

शिक्षणाचा हक्क आणि स्कॉलरशिपचा आधार
पुणे हे जगभरात शिक्षणाचे माहेरघर म्हणून ओळखले जाते. राज्याच्या कानाकोपऱ्यातून, ग्रामीण भागातून, परराज्यातून आणि अगदी परदेशातूनही हजारो विद्यार्थी इथे भविष्याची स्वप्ने घेऊन येतात. मात्र स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या किंवा उच्च शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या अनेक हुशार विद्यार्थ्यांची आर्थिक परिस्थिती जेमतेम असते.

अनेकदा पैशांअभावी किंवा योग्य मार्गदर्शनाअभावी हे विद्यार्थी गांगरून जातात. अशा वेळी त्यांना मानसिक अन् आर्थिक आधार देण्याचे काम खिसाल जाफरी यांची टीम करते.

विद्यार्थ्यांच्या या प्रश्नांवर बोलताना खिसाल जाफरी म्हणतात, “अनेक वेळा विद्यार्थी शिकण्यासाठी किंवा परीक्षा देण्यासाठी पुण्यात येत असतात. त्यांना मार्गदर्शन कोणत्याही प्रकारचं नसतं. खेड्यातून किंवा परराज्यातून आलेला एखादा विद्यार्थी पुण्यात आल्यावर घाबरलेला असतो, आम्ही त्यांना स्टेबल करण्याचा प्रयत्न करतो. विशेषतः गरीब अन् हुशार विद्यार्थ्यांना आर्थिक मागासलेपणामुळे प्लॅटफॉर्म मिळत नाही, त्यांना स्कॉलरशिपच्या माध्यमातून आम्ही मदत करतो.”

संविधानाने कलम २९ आणि ३० अंतर्गत अल्पसंख्याक समाजाला जे शैक्षणिक आणि इतर मूलभूत अधिकार दिलेले आहेत, त्या अधिकारांची अंमलबजावणी करून गरजू विद्यार्थ्यांपर्यंत शैक्षणिक सवलती पोहोचवण्यासाठी ते काम करतात.

आरोग्य सेवा हीच खरी ईश्वरसेवा
वाढते नागरीकरण आणि पर्यावरणाचा बिघडत चाललेला समतोल यामुळे आजघडीला शहरांमध्ये श्वसनाचे अन् इतर गंभीर आजार झपाट्याने वाढत आहेत. अशा प्रसंगी रुग्णालयांचे अवाढव्य बिल आणि महागडे वैद्यकीय साहित्य सामान्य माणसाच्या अवाक्याबाहेर जाते.

खिसाल जाफरी यांनी गेल्या १० वर्षांपासून एक विशेष उपक्रम हाती घेतला आहे. गरजू रुग्णांना वैद्यकीय उपचारांसाठी लागणारे ऑक्सिजन मशिन्स, बेड आणि इतर अत्याधुनिक वैद्यकीय उपकरणे ते पूर्णपणे मोफत पुरवतात.

आपल्या या वैद्यकीय उपक्रमाबाबत खिसाल सांगतात, “मेट्रो शहरामध्ये राहताना पर्यावरणाचा समतोल राखला जात नाही. त्यामुळे रुग्णांना वेळेवर ऑक्सिजन मिळत नाही. अशा रुग्णांना किंवा ज्यांना वैद्यकीय इन्फ्रास्ट्रक्चरची गरज आहे, त्यांना ऑक्सिजन मशीन असेल, बेड असेल किंवा इतर वैद्यकीय यंत्रं असतील हे सगळं मोफत पुरवण्याचे काम गेल्या १० वर्षांपासून करत आलेलो आहोत. प्रत्येक रुग्णाला चांगला उपचार मिळावा, हा त्याचा घटनात्मक अधिकार आहे.”

शासनाच्या ‘महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना’ आणि ‘आयपी’ (IP) सारख्या इतर आरोग्यदायी योजनांचा लाभ तळागाळातील आणि खऱ्या गरजू रुग्णांपर्यंत कशा प्रकारे पोहोचवता येईल, यासाठी ते आणि त्यांची टीम अहोरात्र मध्यस्थ म्हणून काम करते.

हे सर्व काम एकट्याने करणे अशक्य आहे, याची जाणीव खिसाल यांना सुरुवातीलाच झाली होती. म्हणूनच त्यांनी ‘युनिक फाउंडेशन’ आणि ‘गायडन्स फाउंडेशन’ यांसारख्या सामाजिक आणि शैक्षणिक संस्थांची मोट बांधली. राष्ट्रीय स्तरावर कार्यरत असलेल्या अशा ४ ते ५ संस्थांच्या माध्यमातून त्यांचे हे सेवाभावी जाळे आज पुणे शहर आणि परिसरात पसरले आहे.
 
हेही वाचा : उपेक्षितांच्या सेवेला धर्मकार्य मानणारे खिसाल जाफरी
 
‘पुणे प्रथम सन्मानचिन्ह’ ठरला पावती
गेल्या २० वर्षांपासून सातत्याने सामाजिक, शैक्षणिक, आरोग्यदायी आणि नागरी हक्कांच्या रक्षणासाठी काम करणाऱ्या या कार्यकर्त्याची दखल शेवटी पुणे महानगरपालिकेला घ्यावीच लागली. पुणे शहराच्या महापौर मंजुषा नागपुरे यांच्या हस्ते खिसाल जाफरी यांना “पुणे प्रथम सन्मानचिन्ह” देऊन गौरविण्यात आले.

या मानाच्या पुरस्काराबद्दल भावना व्यक्त करताना खिसाल जाफरी म्हणतात, “माझ्या कामाची विशेषतः ऑक्सिजन आणि वैद्यकीय साहित्याच्या मोफत पुरवठ्याची दखल पुणे महानगरपालिकेने घेतली. महानगरपालिकेने शहरातल्या नागरिकांना आणि समाजसेवेला प्रथम प्राधान्य दिल्याबद्दल त्यांनी मला हा पुरस्कार दिलेला आहे. या पुरस्काराने मला पुढील कार्यासाठी अधिक बळ मिळाले.”

शहराची वेगाने बदलणारी संस्कृती, आरोग्याच्या वाढत्या समस्या आणि शिक्षणातील स्पर्धा या पार्श्वभूमीवर, खिसाल जाफरी यांच्यासारखे सामाजिक भान असणारे कार्यकर्ते ही पुण्याची खरी ताकद ठरत आहेत. 

'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा  -

Awaz Marathi WhatsApp Group 
Awaz Marathi Facebook Page

Awaz Marathi Twitter



Latest News