'भारताला मिळाला नवा हिरो'; इस्रायलच्या काउन्सिलर जनरलकडून पायलट स्मित मच्छहर यांच्या सन्मानार्थ मुंबईत होर्डिंग

Story by  आवाज़ मराठी | Published by  Mrudgandha Dixit • 59 m ago
मुंबईतील इस्रायलच्या काउन्सिलर जनरलने फ्लाईदुबईचे पायलट स्मित मच्छहर यांच्या कौतुकात लावलेले डिजिटल होर्डिंग
मुंबईतील इस्रायलच्या काउन्सिलर जनरलने फ्लाईदुबईचे पायलट स्मित मच्छहर यांच्या कौतुकात लावलेले डिजिटल होर्डिंग

 

मुंबई :

दुबईहून तेल अवीव जाणाऱ्या 'फ्लाईदुबई' (flydubai) विमानाचा मोठा अपघात टळवल्यानंतर भारताचे कौतुक सर्वत्र होत आहे. या विमानातून इस्रायली प्रवासीही प्रवास करत होते. सह-वैमानिकाचा घातपाताचा प्रयत्न हाणून पाडत शेकडो प्रवाशांचे प्राण वाचवणारे भारतीय पायलट कॅप्टन स्मित मच्छहर (Captain Smit Machchhar) यांच्या शौर्याला इस्रायलने सलाम केला आहे. मुंबईतील इस्रायलच्या काउन्सिलर जनरलने शुक्रवारी मुंबईत एक विशेष होर्लिंग (Billboard) झळकवून पायलट स्मित यांचे आभार मानले आहेत.

"इस्रायल त्यांचे नाव कधीही विसरणार नाही"

मुंबईतील इस्रायलचे काउन्सिलर जनरल यानीव रेवाच (Yaniv Revach) यांनी 'एक्स' (X) वर पोस्ट करत एक छायाचित्र शेअर केले आहे. "भारताला एक नवा हिरो मिळाला आहे आणि इस्रायल त्यांचे नाव कधीही विसरणार नाही: कॅप्टन स्मित मच्छहर! धन्यवाद कॅप्टन स्मित! लवकरात लवकर बरे व्हा. इस्रायल तुमचे स्वागत करण्यासाठी वाट पाहत आहे," अशा शब्दांत त्यांनी भावना व्यक्त केल्या आहेत. होर्लिंगवर "प्राण वाचवल्याबद्दल धन्यवाद कॅप्टन स्मित, आम्ही तुमच्या प्रकृतीत लवकरात लवकर सुधारणा होवो अशी सदिच्छा व्यक्त करतो," असा संदेश लिहिला आहे.

दोन दिवसांपूर्वी दुबईहून तेल अवीव जाणारे फ्लाईदुबईचे विमान एफझेड १०७३ (FZ1073) हवेत असताना को-पायलटने विमान पाडण्याचा प्रयत्न केला होता. मात्र गंभीर दुखापत झालेली असतानाही कॅप्टन स्मित मच्छहर यांनी प्रसंगावधान राखत हा डाव हाणून पाडला आणि विमानाचे सौदी अरेबियातील ताबुक विमानतळावर सुखरूप आपत्कालीन लँडिंग केले. या विमानात २७ मुलांसह एकूण १७४ प्रवासी प्रवास करत होते.