नवी दिल्ली
रशियन निर्यातमधील अडचणी आणि अमेरिकेच्या शिपमेंटमधील घट यामुळे भारताने युरोपसाठी डिझेलचा एक अत्यंत महत्त्वाचा स्रोत म्हणून आपले स्थान निर्माण केले आहे. ऊर्जा आणि मालवाहतूक विश्लेषक संस्था 'व्होर्टेक्सा'च्या (Vortexa) आकडेवारीनुसार, ऑगस्ट महिन्यात बाब-एल-मंदेब मार्गे युरोपमध्ये जाणारा सुमारे ६० टक्के डिझेलचा पुरवठा एकट्या भारताने केला आहे. भारताची रिफायनिंग क्षमता देशांतर्गत मागणीपेक्षा जास्त असल्याने जागतिक स्तरावर भारताची ऊर्जा निर्यात सतत वाढताना दिसत आहे.
ऑगस्ट महिन्यात युरोपला जाणारे सुमारे २ लाख बॅरल प्रतिदिन डिझेल बाब-एल-मंदेब मार्गातून गेले. यातील जवळपास ६० टक्के वाटा भारताचा राहिला आहे. रशियामधील रिफायनरींवर युक्रेनियन ड्रोन हल्ले झाल्यामुळे आणि निर्बंधांमुळे रशियन डिझेल निर्यात मोठ्या प्रमाणावर मंदावली आहे. तसेच अमेरिकेतून युरोपला जाणारे शिपमेंटही ऑगस्टच्या उत्तरार्धात सुमारे ३५ टक्क्यांनी कमी झाले आहे. अशा स्थितीत युरोपियन देशांची भिस्त आता भारतीय रिफायनरींवर अधिक वाढली आहे.
भारत हा जगातील चौथा सर्वात मोठा रिफायनिंग करणारा देश असून, वार्षिक २५ कोटी ८१ लाख टन इतकी त्याची स्थापित क्षमता आहे. २०२५-२६ या आर्थिक वर्षात भारताने ६ कोटी १५ लाख टन पेट्रोलियम उत्पादनांची निर्यात केली आहे. एकीकडे रशिया आपली देशांतर्गत तूट भरून काढण्यासाठी आयात करत असताना आणि अमेरिका पुरवठा कमी करत असताना, भारताने युरोपच्या हिवाळ्याच्या मागणीपूर्वी डिझेल पुरवठा साखळीत महत्त्वाची भूमिका बजावली आहे.