नवी दिल्ली
संयुक्त राष्ट्रसंघाच्या विशेष रॅपोर्टेअरच्या अहवालात कुख्यात गुन्हेगार दाऊद इब्राहिमच्या 'डी-कंपनी'चा उल्लेख 'भारत-आधारित' (India-based) गुन्हेगारी गट असा केल्याबद्दल भारताने तीव्र आक्षेप घेतला आहे. संयुक्त राष्ट्र महासभेच्या तिसऱ्या समितीत भारताने या अहवालातील चुकांवर बोट ठेवत हा दावा फेटाळून लावला आहे.
संयुक्त राष्ट्रसंघात भारताच्या स्थायी मिशनचे पहिले सचिव राघू पुरी यांनी बुधवारी यावर सविस्तर आक्षेप नोंदवला. बेन सॉल (Ben Saul) या दहशतवादविरोधी मानवाधिकारविषयक विशेष रॅपोर्टेअरच्या अहवालात फॅक्चुअल चुका असल्याचे सांगत त्यांनी नाराजी व्यक्त केली. अहवालात २००३ मध्ये सुरक्षा परिषदेने 'भारत-आधारित डी-कंपनी'चा अल-कायदाशी संबंध जोडल्याचा उल्लेख आहे, जो चुकीचा आणि दिशाभूल करणारा आहे, असे पुरी यांनी स्पष्ट केले.
भारताने स्पष्ट केले की, दाऊद इब्राहिम हा १९९३ च्या मुंबई बॉम्बस्फोट प्रकरणापासून भारतात वॉण्टेड दहशतवादी आहे आणि २००३ च्या आधीच तो भारत सोडून पळून गेला होता. अल-कायदा आणि ओसामा बिन लादेनसोबत त्याच्या सहभागाची नोंद भारताबाहेर असताना झाली होती. बिन लादेन जिथे सापडला आणि मारला गेला, त्याच देशात दाऊद इब्राहिम राहत असल्याचे सांगत भारताने पाकिस्तानकडे अप्रत्यक्ष निर्देश केला आहे. अशा प्रकारच्या अकार्यक्षमतेमुळे जागतिक संस्थेच्या विश्वासार्हतेला मोठा धक्का बसत असल्याचे भारताने खडसावले आहे.