हौती हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर सौदी अरेबियातील भारतीय नागरिकांसाठी सुरक्षा ॲडव्हायजरी जाहीर

Story by  आवाज़ मराठी | Published by  Mrudgandha Dixit • 1 h ago
प्रातिनिधिक इमेज
प्रातिनिधिक इमेज

 

नवी दिल्ली 

सौदी अरेबियात इराण समर्थित हौती बंडखोरांच्या हल्ल्यांनंतर वाढलेल्या सुरक्षा चिंतेच्या पार्श्वभूमीवर, रियाधमधील भारतीय दूतावासाने रविवारी तेथील भारतीय नागरिकांना स्थानिक प्रशासनाच्या सुरक्षा मार्गदर्शक तत्त्वांचे काटेकोरपणे पालन करण्याचे आवाहन केले आहे. नॅशनल अर्ली वॉर्निंग प्लॅटफॉर्म फॉर इमर्जन्सीद्वारे मिळणाऱ्या चेतावणीच्या अनुषंगाने हे निर्देश जारी करण्यात आले आहेत.

दूतावासाचे नागरिकांना सुरक्षेचे निर्देश

सोशल मीडियाच्या माध्यमातून शेअर करण्यात आलेल्या या सूचनांनुसार, नागरिकांनी शांत राहावे, अधिकृत निर्देश पाळावेत आणि आपत्कालीन चेतावणी मिळाल्यास तात्काळ इमारतीच्या आतील सुरक्षित भागात किंवा खिडक्यांपासून दूर असलेल्या खोलीत आश्रय घ्यावा. धोका टळईपर्यंत घराबाहेर न पडणे, खिडक्या व काचेपासून लांब राहणे आणि बाल्कनी किंवा गच्चीवर जाणे टाळण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

तसेच, जे नागरिक बाहेर असतील त्यांनी जवळच्या इमारतीत किंवा भक्कम आधाराच्या मागे आश्रय घ्यावा. गर्दीच्या आणि धोकादायक भागांपासून दूर राहावे तसेच चित्रीकरण टाळावे. वाहन चालवत असताना अलर्ट मिळाल्यास रस्ताच्या कडेला गाडी थांबवण्याचे निर्देश दिले आहेत. मक्का, मदिना, रियाध आणि पूर्व प्रांतात ९११ तर इतर भागात ९९८ या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. १० ऑक्टोबर रोजी रियाध विमानतळावरील हल्ल्यात एका भारतीयाचा मृत्यू झाल्यानंतर ही नवी मार्गदर्शक तत्त्वे जारी करण्यात आली आहेत.