पाकिस्तानमधील खैबर पख्तूनख्व्यात २०० वर्षे जुने हिंदू मंदिर सील; स्थानिकांच्या तीव्र विरोधामुळे कारवाई

Story by  आवाज़ मराठी | Published by  Mrudgandha Dixit • 1 h ago
पाकिस्तानात २०० वर्षे जुने हिंदू मंदिर सील
पाकिस्तानात २०० वर्षे जुने हिंदू मंदिर सील

 

पैशावर 

पाकिस्तानच्या खैबर पख्तूनख्वा प्रांतातील २०० वर्षे जुने ऐतिहासिक हिंदू मंदिर स्थानिकांच्या आणि नागरी समाजाच्या तीव्र विरोधानंतर प्रशासनाने सील केले आहे. व्यावसायिक संकुल (कमर्शियल प्लाझा) उभारण्यासाठी हे ऐतिहासिक ठिकाण पाडण्याचा प्रयत्न केला जात होता, ज्याच्या विरोधात तीव्र आंदोलने झाली होती.

ऐतिहासिक मंदिरावर पाडकामाचा प्रयत्न आणि प्रशासनाची कारवाई

पाकिस्तानच्या उत्तर-पश्चिम खैबर पख्तूनख्वा प्रांतातील डेरा इस्माइल खान जिल्ह्यातील राम लीला मंदिर शनिवारी स्थानिक प्रशासनाने अधिकृत ताब्ब्यात घेतले आणि त्यानंतर इव्हॅक्यूई ट्रस्ट प्रॉपर्टी बोर्डाने (ETPB) ते सील केले. डेरा इस्माइल खान शहरातील रहीम बाजार भागात हे मंदिर असून, काही कामगार ते पाडण्याचा प्रयत्न करत असल्याची माहिती मिळाल्यानंतर स्थानिकांनी धाव घेऊन काम रोखले होते.

सिव्हिल सोसायटी आणि हिंदू समुदायाच्या प्रतिनिधींनी या नियोजित पाडकामास तीव्र विरोध केला असून, मालमत्तेची मालकी आणि व्यावसायिक बांधकामाच्या कायदेशीरपणाची चौकशी करण्याची मागणी केली आहे. ईटीपीबीने सांस्कृतिक वारसा म्हणून चिन्हांकित केलेल्या सुमारे ४०० इमारतींमध्ये या मंदिराचा समावेश आहे. या घटनेमुळे पाकिस्तानातील धार्मिक अल्पसंख्याकांच्या सुरक्षा आणि अधिकारांबाबत पुन्हा एकदा चिंता व्यक्त केली जात आहे.