पायांनी लिहून बारावीत जिल्ह्यात पहिली आलेली जुहा बनू पाहतेय न्यायाधीश!

Story by  आवाज़ मराठी | Published by  Bhakti Chalak • 4 h ago
जुहा रशीद
जुहा रशीद

 

ओनिका माहेश्वरी 

आयुष्यात प्रत्येकासमोर आव्हानं येतात. पण काही लोक याच आव्हानांना स्वतःची ताकद बनवतात. जुहा रशीद हे असंच प्रेरणादायी उदाहरण आहे. जन्मापासूनच हात आणि पाय नसतानाही जुहा पायाच्या बोटांनी लिहायलाही शिकली. तिने आपलं शिक्षण सुरू ठेवलं आणि घरातली रोजची कामं स्वतः करायला शिकली. आता बारावीच्या परीक्षेत विशेष श्रेणीत जिल्हास्तरावर प्रथम क्रमांक मिळवून तिने आपली वेगळी ओळख निर्माण केलीय. तिची कहाणी कुटुंबाची साथ, आत्मविश्वास, कठोर मेहनत आणि आयुष्य पूर्णपणे जगण्याची जिद्द यातून दिसून येते.

आईच्या पाठिंब्यावर जुहाने केवळ आपल्या पायांचा वापर करून अनेक गोष्टी साध्य केल्या. तिने लिहिणं, स्वयंपाक करणं, शिलाई काम करणं आणि आपलं आयुष्य स्वतःच्या अटींवर जगणं शिकून घेतलं. आज तिने दहावीत ८३% आणि बारावीत ७८% गुण मिळवलेत. तिला अनेक सन्मान मिळालेत. तिला आता वकील बनून समाजातल्या उपेक्षित लोकांसाठी आवाज उठवायचाय.

स्वतःच्या जन्माच्या वेळचा काळ कुटुंबासाठी भावूक आणि कठीण होता, असं जुहा सांगते. तिने बालपणी आपल्या आईला प्रश्न विचारला होता. या प्रश्नाने तिच्या आईला भावूक केलं. "मी अम्मीला नेहमी एक प्रश्न विचारायचे. अम्मी, सर्वांना हात आहेत, मग मला हात का नाहीत?" असं जुहा म्हणते. या प्रश्नावर तिची आई रडू लागायची. पण हाच प्रश्न पुढे जुहाचे विचार बदलणारा ठरला. इतरांशी स्वतःच्या आयुष्याची तुलना करण्याऐवजी स्वतःच्या क्षमतेनुसार आयुष्य स्वीकारणं गरजेचं आहे, हे तिने हळूहळू समजून घ्यायला सुरुवात केली. ती सांगते, "या प्रश्नाने काहीही साध्य होणार नाही आणि अम्मीला आता अजिबात रडवायचे नाही, असा पक्का विचार मी केला होता. आता अम्मीला फक्त खूश ठेवायचे आहे. अम्मी जशी खूश राहील, तसे वागायचे आहे. अम्मी-अब्बू खूश राहतील, अशा प्रकारे मला स्वतः जगायचे आहे आणि अतिशय मनमोकळेपणाने जगायचे आहे."

जन्मानंतर लोकांचे टोमणे- ही जास्त दिवस जगणार नाही
जुहाच्या आयुष्यातला सुरुवातीचा काळ कठीण होता. तिच्या जन्मानंतर काही लोकांनी कुटुंबाला वाईट गोष्टी सांगितल्या. ही मुलगी जास्त दिवस जगणार नाही, असं ते लोक म्हणाले. तिला दूध पाजतानाच मारून टाकण्याचा भयानक सल्ला तिच्या आईला दिला गेला. जुहा सांगते, "माझ्यासाठी चालणे हेच सर्वात मोठे आव्हान होते. ही जन्मतःच मरेल,असे लोक बोलत होते. तर काही लोक तिला मारून टाकण्यास सांगत होते. दूध पाजताना तिला मारून टाका आणि ती कधीही चालू शकणार नाही,असे लोक माझ्या अम्मीला सांगत होते. हिचे आयुष्य फक्त चार दिवसांचे आहे, असेही ते म्हणायचे."

पण जुहाच्या आईने लोकांचं बोलणं ऐकण्याऐवजी आपल्या मुलीला पुढे नेण्याचा निर्णय घेतला. त्यांनी जुहाला चालायला शिकवलं. सामान्य मुलांसारखं चालायला शिकणं तिच्यासाठी अजिबात शक्य नव्हतं. तिला हात नव्हते. ती अनेकदा पडायची आणि तिला दुखापत व्हायची. "माझ्या अम्मीने मला चालायला शिकवले. मी नेहमी पडायची आणि माझी हनुवटी फाटायची. लहान मूल हात पकडून चालायला शिकते. पण मला हातच नव्हते. माझी अम्मी मला कमरेला पकडून चालायला लावायची. मी खाली पडायची आणि माझी हनुवटी फाटायची. मग असे पडत पडतच मी चालायला शिकले," अशी माहिती जुहा देते.

चालायला शिकल्यानंतरही अडचणी पूर्णपणे संपल्या नाहीत. ती आपल्या पायाच्या बोटांच्या मदतीने लिहायला शिकली. एकदा पेन्सिलला टोक करताना तिला गंभीर दुखापतही झाली. जुहा सांगते, "पायाच्या बोटांनी पेन्सिल पकडून मी लिहायला शिकले. एकदा मी पेन्सिलला टोक करत होते. त्यावेळी पेन्सिलचे टोक माझ्या बोटात घुसले. खूप जास्त रक्तस्राव झाला आणि मी रडत होते. मी जेव्हाही एखादे नवीन काम करायचे, तेव्हा सुरुवातीला मला नेहमी दुखापतच व्हायची."

असं असूनही तिने कोणतंही काम अर्धवट सोडण्याचा विचार अजिबात केला नाही. तिची आई तिला नेहमी प्रोत्साहन देत राहिली. जुहा सांगते, "माझी अम्मी मला नेहमी एक गोष्ट समजवायची. एखादे काम सतत केल्यावरच ते आपल्याला जमते. एकदा करायचे ठरवले, तर ते काम पूर्ण करायचेच असते. चालताना आपण पडून जाऊ, असा विचार मी केला असता, तर मी कधीही चालू शकले नसते. मी परीक्षा देऊ शकले नसते आणि शिक्षणही घेऊ शकले नसते."

पायांनी अभ्यास, टॅबच्या मदतीने शिकण्याचा प्रवास
जुहाने स्वतःच्या शिक्षणात शारीरिक परिस्थितीचा कोणताही अडथळा येऊ दिला नाही. ती पायांच्या मदतीने अभ्यास करते आणि टॅबलेटचा कुशलतेने वापर करते. ती नियमितपणे शाळेतही जाते. शाळेत तिला कधीही दुजाभाव किंवा भेदभावाचा सामना करावा लागला नाही. याउलट, शिक्षकांनी तिला नेहमी पूर्ण सहकार्य केलं. जुहा आनंदाने सांगते, "शिक्षकांनी मला पालकांसारखाच खूप मोठा आधार दिला आहे. त्यांनी माझ्याशी कधीही कोणताही भेदभाव केला नाही."

खेळतानाही शिक्षकांनी तिला इतर मुलांपासून अजिबात वेगळं ठेवलं नाही. खेळाच्या तासाला शिक्षिका नेहमी असे खेळ घ्यायच्या. त्या खेळांमध्ये जुहालाही सहज सहभाग घेता यायचा. ती सांगते, "खेळाचा तास असल्यावर मॅडम मला नेहमी सर्वात पुढे ठेवायच्या. तू सुद्धा आमच्यासोबत खेळणार आहेस. इतर सर्व मुले खेळत आहेत आणि तू एकटीच बसली आहेस, असे अजिबात होणार नाही, असा धीर त्या द्यायच्या. पकडापकडी आणि लपाछपीसारखे अनेक खेळ त्या घ्यायच्या. या खेळांमध्ये मलाही सहभागी होता यायचे." आपण इतर मुलांपेक्षा कमी आहोत, याची जाणीव शाळेने तिला कधीच होऊ दिली नाही. शाळेच्या विविध कार्यक्रमांमध्येही तिला नेहमी पुढे ठेवलं जायचं, असं जुहा सांगते.

इतरांशी तुलना नाही, स्वतःच्या आयुष्यात खूश राहायला शिकले
इतर लोकांना पाहून तुम्हाला कधी वाईट वाटतं का? त्यांना हात-पाय आहेत आणि त्यांचं आयुष्य सामान्य आहे, असा विचार कधी मनात येतो का? असा प्रश्न जुहाला विचारण्यात आला. यावर तिने वेगळा आणि सकारात्मक दृष्टिकोन सर्वांसमोर मांडला. आपल्या आयुष्यात असलेल्या सर्व गोष्टींबद्दल नेहमी कृतज्ञ राहायला आईने शिकवलंय, असं ती सांगते. जुहा सांगते, "अल्लाहने आपल्याला दिलेल्या गोष्टींबद्दल नेहमी कृतज्ञता व्यक्त केली पाहिजे, अशी शिकवण माझ्या अम्मीने मला दिली आहे." ती पुढे म्हणते, "आपल्यापेक्षा वरच्या लोकांकडे पाहिल्यास माणूस कधीही खूश राहू शकत नाही. त्याच्याकडे हे आहे आणि ते आहे, असा विचार केल्यास दुःखच मिळते. अधिकाधिक मिळवण्याच्या स्पर्धेतच माणूस अडकून पडेल."

तिचा हा सुंदर विचार आता तिच्या आयुष्याचा महत्त्वाचा भाग बनलाय. माणसाने स्वतःपेक्षा जास्त सोयीसुविधा असलेल्या लोकांशी सतत तुलना करणं योग्य नाही. त्याऐवजी त्याने स्वतःचं आयुष्य आणि स्वतः मिळवलेल्या यशाकडे लक्ष दिलं पाहिजे, असं ती ठामपणे मानते.

घरातली जवळपास सर्व कामं जुहा स्वतः करते
जुहा रोजच्या जीवनातली अशी अनेक कामं स्वतःच करते. हे पाहून इतर लोक थक्क होतात. ती सांगते, "मी सर्व प्रकारची कामे सहज करू शकते. झाडू मारणे, फरशी पुसणे, भांडी घासणे, कपडे धुणे आणि पोळ्या लाटणे अशी सर्व कामे मी करते. मी हँडपंपही चालवू शकते. स्वतः ब्रश करणे, कपडे बदलणे आणि स्वतःचा हिजाब बांधणे,ही सर्व कामे मी स्वतःच करते." तिची ही क्षमता तिच्या कुटुंबाच्या सततच्या सहकार्याचा आणि स्वतः शिकण्याच्या इच्छेचा परिणाम आहे. तिच्या आईने तिला लहानपणापासूनच प्रत्येक काम करायला शिकवलं. "लहानपणापासूनच अम्मी मला प्रत्येक गोष्ट करायला शिकवायची. हे असे कर आणि ते तसे कर, असे ती सांगायची. माझ्या अब्बूनेही माझ्या गरजेच्या सर्व गोष्टी मला नेहमी आणून दिल्या," असं जुहा अभिमानाने सांगते.

तिचे वडील आणि आईने तिला कधीही कोणत्याही गोष्टीपासून वंचित ठेवलं नाही. तसंच तिच्याशी कोणताही वेगळा व्यवहार करण्याचा प्रयत्न त्यांनी कधीच केला नाही. इतर भावंडांप्रमाणेच आपल्या आई-वडिलांनी मला प्रत्येक आवश्यक गोष्ट उपलब्ध करून दिली, असं जुहा समाधानाने सांगते.

२०२३ मध्ये यूट्यूब चॅनेल सुरू केलं, आता लाखो लोक पाहतात
सोशल मीडियाच्या माध्यमातून जुहाची कहाणी मोठ्या संख्येने लोकांपर्यंत पोहोचलीय. तिने २०२३ मध्ये स्वतःचं यूट्यूब चॅनेल सुरू केलं. याची सुरुवातही रंजक घटनेने झाली. पासपोर्ट काढायला ती बँक आणि इतर ठिकाणी गेली होती. तिथल्या लोकांनी तिची प्रतिभा आणि आत्मविश्वास पाहिला. त्यानंतर त्यांनी तिच्या वडिलांना मुलीचे व्हिडिओ बनवण्याचा सल्ला दिला, असं जुहा सांगते.

ती सांगते, "सर्वांनी मला एक अतिशय छान गोष्ट सांगितली. तू खूप टॅलेंटेड आहेस. तू तुझे स्वतःचे व्हिडिओ बनवले पाहिजेस, असे लोक मला म्हणाले. तुम्ही तुमच्या मुलीचे व्हिडिओ का बनवत नाही?ती खूप लोकांना प्रेरित करेल, असे लोक माझ्या अब्बूंना म्हणाले." पासपोर्टसाठी स्वाक्षरी करण्याच्या वेळीही जुहाने स्वतःची क्षमता सिद्ध केली. तिला स्वाक्षरी करता येणार नाही. म्हणून तिने अंगठा लावावा, असं लोक तिला म्हणाले होते. पण जुहाने तसं करायला स्पष्टपणे नकार दिला.

"तू सही कशी करणार? तू आपला अंगठाच लाव, असे ते लोक म्हणाले. यावर मी त्यांना अतिशय स्पष्ट उत्तर दिले. मी अंगठा लावणार नाही आणि मी माझी सही स्वतः करेन. मी दहावीत शिकत आहे, मग मी अंगठा का लावू? असा प्रश्न मी त्यांना विचारला." यानंतर तिच्या वडिलांनी तिचा व्हिडिओ बनवला. लोकांनी तिच्या वडिलांना सतत प्रोत्साहन दिलं आणि त्यानंतर ऑगस्ट महिन्यात यूट्यूब चॅनेल सुरू झालं. १८ ऑगस्ट रोजी हे चॅनेल सुरू झालं. सुमारे तीन महिन्यांनंतर ते 'मोनेटाईज' झालं, अशी माहिती जुहा देते. अवघ्या तीन महिन्यांत तिचे एक लाख सबस्क्रायबर्स पूर्ण झाले. आता तिच्या यूट्यूब चॅनेलवर सुमारे सहा लाख सबस्क्रायबर्स पूर्ण होताहेत. तसंच इन्स्टाग्रामवरही तिचे जवळपास तीन लाख फॉलोअर्स आहेत. तिचे भाऊ आणि वडील व्हिडिओ बनवण्यात तिला मोठी मदत करतात.

अभ्यासासोबतच गरीब मुलांना मोफत शिकवते
जुहाची दिनचर्याही तिचा संघर्ष आणि जबाबदारीची भावना दर्शवते. ती सकाळी उठून आपला इस्लामिक क्लास आणि तजवीदचा अभ्यास करते. यानंतर ती व्हिडिओ बनवण्याचं काम करते आणि मग स्वतःचा अभ्यास करते. पण तिचा दिवस इथेच संपत नाही. ती आर्थिकदृष्ट्या कमकुवत असलेल्या गरीब मुलांना मोफत शिकवते. जुहा अभिमानाने सांगते, "मी गरीब मुलांना शिकवते. काही पालक आपल्या मुलांची शाळेची फी भरू शकत नाहीत. तसेच सरकारी शाळेत बऱ्याचदा नीट शिकवले जात नाही. अशा मुलांना मी माझ्याकडे बोलावून घेते. तुम्ही माझ्याकडे या, मी तुम्हाला मोफत शिकवेन, असे मी त्यांना सांगते."

ती संध्याकाळी सुमारे पाच-सहा वाजेपर्यंत या मुलांना शिकवते. मुलांच्या वह्या तपासणं, त्यांना अभ्यास देणं आणि शिकवणं हा तिच्या रोजच्या दिनचर्येचा महत्त्वाचा भाग आहे. यानंतर ती स्वतःचे व्हिडिओ एडिट करते, त्यामध्ये आवाज देते आणि ते सोशल मीडियावर पोस्ट करते. याशिवाय ती आपल्या लहान भावंडांसोबतही छान वेळ घालवते.

काही सेकंदात सुईत दोरा ओवते
मुलाखतीदरम्यान जुहाने आपल्या आणखी एका अद्भुत क्षमतेचं दर्शन घडवलं. तिने आपल्या पायांच्या मदतीने काही सेकंदातच सुईमध्ये दोरा ओवून दाखवला. हे पाहून मुलाखत घेणारी व्यक्तीही थक्क झाली. याशिवाय ती कपड्यांची शिलाईही उत्तमरीत्या करते. एखादा कपडा फाटल्यास ती तो स्वतःच शिवून घेते.

आयुष्यात हार न मानण्याचा संदेश
अनेक मुलांचे हात-पाय अगदी व्यवस्थित असतात. पण ते आयुष्यात लवकर हार मानतात. अशा मुलांना तू काय सांगशील? असा प्रश्न जुहाला विचारण्यात आला. यावर तिने माता-पित्याप्रती असलेल्या जबाबदारीची आठवण करून दिली. जुहा सांगते, "तुमचे पालक तुम्हाला अनेक गोष्टी देतात. आपल्याला ज्या गोष्टी मिळाल्या नाहीत, त्या आपल्या मुलांना मिळाल्या पाहिजेत, हा विचार त्यांच्या मनात असतो. आपले पालक आपल्यासाठी इतके काही करत आहेत, याची जाणीव तुम्ही ठेवली पाहिजे. आपणही त्यांच्यासाठी काहीतरी खास केले पाहिजे. त्यांचे नाव नेहमी मोठे केले पाहिजे."

आपलं मूल आयुष्यात यशस्वी व्हावं, हीच प्रत्येक आई-वडिलांची इच्छा असते, असं ती ठामपणे मानते. मुलांनीही आपल्या आई-वडिलांसाठी काहीतरी करायला स्वतःला पूर्णपणे सक्षम बनवलं पाहिजे. तसंच त्यांच्या म्हातारपणाचा आधार बनण्याची तयारी ठेवली पाहिजे. यशासाठी कठोर मेहनत आणि सततचे प्रयत्न आवश्यक आहेत, हा संदेश ती सर्वांना देते.

आईला खूश ठेवणं हीच आयुष्यातली मोठी प्रेरणा
जुहाची सर्वात मोठी प्रेरणा तिचे आई-वडील आहेत. यात विशेषतः तिच्या आईचा मोठा वाटा आहे. स्वतःच्या जन्माच्या वेळी तिने आपल्या आईला रडताना पाहिलं होतं. आपण आपल्या आईला पुन्हा कधीही दुःखी करणार नाही, अशी भावना तेव्हा तिच्या मनात निर्माण झाली. जुहा सांगते, "माझ्या जन्माच्या वेळी सगळे जण खूप रडत होते. माझ्या अम्मीलाही खूप रडू येत होते. अम्मी,सर्वांना हात आहेत, मग मला हात का नाहीत? असा प्रश्न मी अम्मीला विचारायचे. जुहाने असा प्रश्न विचारल्यामुळे माझी अम्मी खूप रडायची." या सर्व गोष्टींनंतर तिने आपल्या आईला नेहमी खूश ठेवण्याचा पक्का निर्णय घेतला.

"अम्मीला आता अजिबात रडवायचे नाही,असा पक्का विचार मी केला होता. आता अम्मीला फक्त खूश ठेवायचे आहे. अम्मी-अब्बू खूश राहतील, अशा प्रकारे मला स्वतः जगायचे आहे आणि अतिशय मनमोकळेपणाने जगायचे आहे," असं ती पुन्हा एकदा सांगते. जुहा अनेक प्रेरणादायी भाषणंही ऐकते आणि पाहते. अनेक लोकांकडे सर्व सुविधा असूनही त्यांना दुसऱ्यांच्या मदतीची सतत गरज भासते. ती आत्मविश्वासाने सांगते, "अशा लोकांकडे पाहून मी स्वतःला त्यांच्यापेक्षा खूप चांगली मानते. याच गोष्टीतून मला प्रेरणा मिळते."

धार्मिक श्रद्धेतूनही मिळते ताकद
जुहा स्वतःच्या आयुष्यातल्या आव्हानांना आपल्या धार्मिक श्रद्धेशीही सुंदरपणे जोडते. कठीण प्रसंगातही ईश्वर माणसाची साथ कधीच सोडत नाही, असं ती मानते. ती सांगते, "ज्याने तुम्हाला जन्म दिला आहे, तो तुमची साथ कधीही सोडत नाही. तो तुम्हाला अनेक अडचणी देतो. पण आपला भक्त आपल्यासोबत खंबीरपणे उभा आहे की नाही, हे पाहण्यासाठीच तो या अडचणी निर्माण करतो." ती पुढे म्हणते, "आपण त्याची प्रार्थना करावी, यासाठीच त्याने आपल्याला या जगात पाठवले आहे. त्याला आपली अजिबात गरज नाहीये. उलट आपल्यालाच त्याची गरज आहे." याच अढळ विश्वासाच्या आधारावर ती लोकांना आयुष्यात हार न मानण्याचा आणि सतत मेहनत करत राहण्याचा संदेश देते.

आता कायद्याचं शिक्षण घेऊन न्यायाधीश होण्याची जुहाची इच्छा
बारावीच्या परीक्षेत यश मिळवल्यानंतर जुहाने आपल्या भविष्यातलं ध्येयही निश्चित केलंय. तिला कायद्याचं शिक्षण घ्यायचंय आणि पुढे जाऊन न्यायाधीश बनण्याचं तिचं स्वप्न आहे. बारावीनंतर तुझा पुढचा विचार काय आहे? असा प्रश्न तिला विचारण्यात आला. यावर "मी कायद्याचे शिक्षण घेईन आणि न्यायाधीश बनेन," असं तिने स्पष्टपणे सांगितलं.

जुहा घरी आली, त्या दिवशी मोठा आनंदही सोबत आला- जुहाचे वडील
जुहाच्या वडिलांनी आपल्या मुलीच्या संघर्षाची आणि यशाची कहाणी अभिमानाने सर्वांना सांगितली. तिच्या जन्माच्या वेळचा तो काळ कुटुंबासाठी भावूक होता. आजूबाजूच्या गावांतले लोक या मुलीला पाहायला येऊ लागले होते. सुरुवातीला मी आणि माझी पत्नी लपून लपून खूप रडायचो. आता पुढे काय होणार, असा विचार आम्ही नेहमी करायचो,अशी जुनी आठवण त्यांनी सांगितली. याच काळात या भागात आलेल्या सुफी संताने त्यांना प्रेमाने एक गोष्ट समजावली. मुलीचा असा जन्म होणं, हे तुमच्या अजिबात हातात नव्हतं, असा आधार त्यांनी दिला.

त्या सुफी संताने माझ्या डोक्यावर हात ठेवला आणि मला विचार दिला, असं जुहाचे वडील सांगतात. "यात तुमचा कोणताही दोष नाहीये. ही मुलगी तुम्हाला कोणी दिली आहे? ईश्वराने दिली आहे, अल्लाहने दिली आहे. मग त्यानेच ती दिली असल्याने तुम्ही फक्त तुमचे कर्म योग्य प्रकारे पार पाडा," असा संदेश त्या संताने दिला. याच एका गोष्टीने कुटुंबाची विचारसरणी पूर्णपणे बदलली. त्यांनी जुहाचा पूर्णपणे स्वीकार केला आणि तिला खंबीर साथ देण्याची प्रेरणा त्यांना मिळाली. यानंतर कुटुंबाने जुहाचं शिक्षण आणि तिच्या सर्व गरजांवर पूर्ण लक्ष केंद्रित केलं. ज्या दिवसापासून जुहा घरी आली,त्याच दिवसापासून घरात आनंद वाढू लागला,असं तिचे वडील आनंदाने सांगतात. ते सांगतात, "ती आमच्या घरात आल्यापासून आमच्या घराला चार चाँद लागले. साक्षात लक्ष्मीच आमच्या घरात चालत आली."

शाळेत प्रवेश मिळवायलाही करावा लागला संघर्ष
आपल्या मुलीने चांगल्या शाळेत शिकावं, अशी कुटुंबाची इच्छा होती. पण सुरुवातीला काही शाळांनी तिला प्रवेश द्यायला नकार दिला. तिच्या देखभालीसाठी स्वतंत्र व्यक्तीला कामावर ठेवावं लागेल, असं शाळा व्यवस्थापनाचं म्हणणं होतं. त्यानंतर स्थानिक आमदार ठाकूर धीरेंद्र सिंह यांनी जुहाला स्वतःच्या शाळेत शिकवण्याचा निर्णय घेतला. ही शाळा त्यांच्या आईच्या नावाने सुरू असलेली 'शांती देवी कन्या विद्यालय' होती,अशी माहिती जुहाचे वडील देतात.

आमदारांनी शाळेतल्या कर्मचाऱ्यांना स्पष्ट सूचना दिल्या. जुहाच्या सर्व गरजा वेळेवर पूर्ण केल्या जाव्यात आणि तिला शक्य ती सर्व मदत दिली जावी, असं ते म्हणाले. यानंतर जुहाने मागे वळून पाहिलं नाही. तिने स्वतःच्या अभ्यासात सातत्याने उत्कृष्ट कामगिरी करून दाखवली.

यशानंतर सन्मानाची रांग लागली
हायस्कूलच्या परीक्षेत उत्तम यश मिळवल्यानंतर जुहाला विविध स्तरांवर सन्मान मिळाला. मानवाधिकार आयोगाच्या अध्यक्षा श्रीमती बबिता चौहान, जिल्हाधिकारी मनोज कुमार आणि अनेक आयपीएस अधिकारी, मंत्री व आमदारांनी तिचा सन्मान केला. ग्रेटर नोएडाच्या प्रेस क्लबनेही तिला विशेष आमंत्रित करून गौरवलं. ज्या मुलीच्या जन्मावेळी कुटुंबासमोर चिंता आणि दुःखाचं वातावरण होतं, तीच मुलगी आज या कुटुंबाच्या आनंदाचा आणि अभिमानाचा सर्वात मोठा स्रोत बनलीय. "एकेकाळी आम्हाला रडण्याचे कारण ठरलेली ही मुलगी आज आमच्या हसण्याचे आणि आनंदाचे सर्वात मोठे साधन बनली आहे,"असं जुहाचे वडील अभिमानाने सांगतात.

शारीरिक मर्यादा कोणत्याही व्यक्तीची क्षमता आणि स्वप्नांची मर्यादा कधीच ठरवू शकत नाहीत. जुहाची ही कहाणी हाच संदेश सर्वांना देते.

'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा  -

Awaz Marathi WhatsApp Group 
Awaz Marathi Facebook Page

Awaz Marathi Twitter



Latest News