पर्यावरण संरक्षणासाठी विस्डम फाऊंडेशनतर्फे मुंबईत विशेष परिषद

Story by  आवाज़ मराठी | Published by  Bhakti Chalak • 25 m ago
मुंबई प्रेस क्लबमध्ये विस्डम फाऊंडेशन आयोजित पर्यावरण परिषदेत उपस्थित विविध धर्मीय धर्मगुरू आणि विचारवंत
मुंबई प्रेस क्लबमध्ये विस्डम फाऊंडेशन आयोजित पर्यावरण परिषदेत उपस्थित विविध धर्मीय धर्मगुरू आणि विचारवंत

 

फझल पठाण 

सृष्टी निर्मात्याने माणसाला बुद्धीची अप्रूप देणगी देऊन या पृथ्वीचा रक्षक बनवले. पण दुर्दैवाने त्याच माणसाने स्वतःच्या स्वार्थासाठी निसर्गाचा बळी देण्याचा धडाका लावलाय. या पार्श्वभूमीवर मुंबईत 'पर्यावरण रक्षण' या विषयावर महत्वाचे चर्चासत्र पार पडले. 

विस्डम फाऊंडेशनच्या वतीने मुंबई प्रेस क्लबमध्ये 'एक मानवता, एक निवासस्थान' या विषयावर एका विशेष परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. वेगवेगळ्या धर्मपीठांचे प्रमुख, अभ्यासक अन् विचारवंत एकाच मंचावर आले आणि त्यांनी आपापल्या धर्मग्रंथांमधील पर्यावरण संरक्षणाच्या शिकवणीबाबत भाष्य केले.

विविध धर्मांच्या नैतिक अन् आध्यात्मिक परंपरांवर या परिषदेत सविस्तर चर्चा रंगली. धर्माच्या चौकटी वेगवेगळ्या असल्या तरी प्रत्येक धर्माने निसर्गाचा आदर करण्याचा अन् त्याच्या संरक्षणाचाच मार्ग दाखवलाय, यावर उपस्थितांचे एकमत झाले. सृष्टीकर्त्याच्या प्रत्येक निर्मितीवर जगातील सर्व जीवांचा समान हक्क आहे, त्यामुळे माणूस या पृथ्वीवर आपली एकछत्री मालकी सांगू शकत नाही, हे ठणकावून सांगण्यात आले.

धार्मिक नेत्यांना एकत्र आणण्याचे कारण काय?
कार्यक्रमाच्या सुरुवातीला विस्डम फाऊंडेशनच्या संचालिका डॉ. झीनत शौकत अली यांनी परिषदेची पार्श्वभूमी सांगितली. सध्याच्या काळात पर्यावरणाचा होत असलेला ऱ्हास आणि त्यामुळे निर्माण झालेली भीषण संकटे यावर त्यांनी चिंता व्यक्त केली.

उपस्थितांना संबोधित करताना डॉ. झीनत शौकत अली म्हणाल्या, "पर्यावरणाला होणारी हानी आणि त्यामुळे मानवी जीवनासमोर उभे राहिलेले मोठे धोके पाहता, आता विविध धर्माच्या नेत्यांना एका मंचावर आणणे गरजेचे होते. निसर्गाप्रती असलेल्या कर्तव्यांची अन् जबाबदाऱ्यांची आठवण लोकांना करून देण्यासाठी आम्ही हा निर्णय घेतला."

इस्लाममध्ये निसर्गाचे स्थान
ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डचे उपाध्यक्ष मौलाना जहीर अब्बास रिझवी यांनी पवित्र कुराण आणि इस्लामिक इतिहासातील अनेक महत्त्वाचे प्रसंग उपस्थितांसमोर मांडले.

माणसाला निसर्गाचे मालक नव्हे तर रक्षक बनवले असल्याचे स्पष्ट करताना मौलाना रिझवी म्हणाले, "ही जमीन तुमची वैयक्तिक मालकी नाही तर ही तुम्हाला दिलेली एक पवित्र अमानत आहे, असे पवित्र कुराणात मानवाला स्पष्टपणे सांगितले. ज्याच्या हातात अमानत सोपवली जाते, त्याने प्रामाणिकपणे रक्षण करणे हेच त्याचे सर्वात मोठे कर्तव्य ठरते."

पैगंबर मुहम्मद यांच्या काळातील एका महत्त्वपूर्ण कायद्याचा संदर्भ देत ते पुढे म्हणाले, "पैगंबर मुहम्मद यांच्या हिजरतीच्या दुसऱ्या वर्षी जेव्हा कायदे बनवले गेले, तेव्हा एक स्पष्ट नियम केला होता. मुस्लिम सैन्याने किंवा लोकांनी एखादे शहर अथवा ठिकाण जिंकून प्रवेश केला, तरी तेथील झाडे, वनस्पती, हिरवळ, शेती अन् पिकांना अजिबात हानी पोहोचवायची नाही. यातूनच आपल्याला पर्यावरण संरक्षणाचा सर्वात मोठा धडा मिळतो."

'कयामत जवळ आली तरी एक रोपटे नक्की लावा'
जमीयत उलेमा महाराष्ट्रचे उपाध्यक्ष मौलाना मुहम्मद आरिफ उमरी यांनी हदीस शरीफमधील अत्यंत भावनिक संदेश उपस्थितांना दिला. निसर्गातील झाडे-वेली हे परमेश्वराचे रूप असल्याचे त्यांनी सांगितले.

वृक्षारोपणाच्या महत्त्वाबद्दल सांगताना मौलाना उमरी म्हणाले, "हदीस शरीफमध्ये सांगितले आहे की, तुमच्या हातात जर एखादे रोपटे असेल अन् तुम्ही ते जमिनीत लावणार असाल, तितक्यात कयामत जवळ आल्याचे दिसले, त्या रोपट्याचे झाड होण्यासाठी वेळ उरलेला नाही हे माहीत असूनही तुम्ही ते रोपटे जमिनीत लावलेच पाहिजे."

निसर्गातील आशीर्वादांचा संदर्भ देताना ते पुढे म्हणाले, "पवित्र कुराणात सांगितलंय की, जिथे नद्या, झाडे अन् हिरवळ आहे, त्या ठिकाणांना आशीर्वादाची ठिकाणे म्हटले आहे. परमेश्वराने आपल्याला दिलेला हा निसर्गरूपी आशीर्वाद आहे अन् या आशीर्वादाची कदर करणे ही आपली धार्मिक अन् नैतिक जबाबदारी आहे."

गीतेतील 'धरती माता'
इस्कॉन गुडगाव चौपाटीचे खजिनदार आणि अभ्यासक केशवचंद्र दास यांनी श्रीमद्भगवद्गीतेतील तत्त्वज्ञान सोप्या अन् रोजच्या बोलीभाषेत समजावून सांगितले. निसर्ग अन् माणूस यातील नाते त्यांनी अतिशय समर्पकपणे मांडले.

आपल्या जबाबदारीची जाणीव करून देताना केशवचंद्र दास म्हणाले, "श्रीमद्भगवद्गीतेत पृथ्वीला आपली माता अन् माणसाला तिचा पुत्र म्हटले आहे. आपल्या आईची काळजी घेणे, तिच्यावर अत्याचार न करणे अन् तिला हानी न पोहोचवणे हे प्रत्येक पुत्राचे आद्यकर्त्यव्य आहे. आपण निसर्गाकडून आयुष्यभर काय उकळू शकतो यापेक्षा आपण या जगासाठी अन् निसर्गासाठी काय देतोय, याचा विचार प्रत्येकाने केला पाहिजे."

ख्रिश्चन धर्मातील शिकवण
बिशप एव्हलिन डी सिल्वा यांनी ख्रिश्चन परंपरेत पर्यावरणाला दिले जाणारे महत्त्व अधोरेखित केले. दरवर्षी जगभरातील ख्रिश्चन समाज हा काळ निसर्ग रक्षण संकल्प म्हणून साजरा करतो, असे त्यांनी सांगितले.

पर्यावरण संरक्षणाच्या जागतिक उपक्रमाबद्दल सांगताना बिशप डी सिल्वा म्हणाले, "जगभरातील ख्रिस्ती बांधव दरवर्षी १ सप्टेंबर ते ४ ऑक्टोबर दरम्यान निसर्गाचा उत्सव साजरा करतात. दरवर्षी यासाठी एक विशेष थीम ठरवली जाते. या वर्षी जीवनजल ही संकल्पना घेऊन आम्ही लोकांमध्ये पर्यावरणाची जनजागृती करत आहोत."

पोप यांच्या भूमिकेचा उल्लेख करताना ते शेवटी म्हणाले, "सध्याचे पोप लिओ यांनी एक खूप मोठा संदेश जगाला दिला आहे. आपण जर या पर्यावरणाचे अन् निसर्गाचे रक्षण केले नाही, तर आपण ईश्वराच्या दरबारात पापी ठरू."

मानवी विवेकबुद्धीला साद घातणारा सोहळा
मुंबई प्रेस क्लबमध्ये पार पडलेल्या या परिषदेने उपस्थितांच्या मनात निसर्गाबद्दलचा आदर आणखी वाढवला. केवळ भाषणात निसर्गाच्या गप्पा मारण्यापेक्षा आपापल्या धर्मातील शिकवणीचा स्वीकार करून प्रत्यक्ष कृतीत पर्यावरण जपले पाहिजे, असा सूर सर्वांनी आवर्जून लावला. विस्डम फाऊंडेशनच्या या अनोख्या उपक्रमाचे मुंबईतील विविध स्तरांतून कौतुक होत आहे.
 

'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा  -

Awaz Marathi WhatsApp Group 
Awaz Marathi Facebook Page

Awaz Marathi Twitter