यंदा 'मिळून साऱ्याजणी'चा दिवाळी अंक मुस्लिम स्त्रियांविषयी; अंकात नेमकं आहे तरी काय?

Story by  आवाज़ मराठी | Published by  Bhakti Chalak • 1 h ago
'मिळून साऱ्याजणी' या दिवाळी अंकाचे मुखपृष्ठ
'मिळून साऱ्याजणी' या दिवाळी अंकाचे मुखपृष्ठ

 

मृदगंधा दीक्षित 

साहित्यिक आणि सांस्कृतिक विश्वात दिवाळी अंकांचे आगमन म्हणजे विचारांची पर्वणीच असते. मराठी नियतकालिकांच्या या समृद्ध परंपरेत 'मिळून साऱ्याजणी' या अग्रगण्य मासिकाने नेहमीच चाकोरीबाहेरचे, टोकदार आणि महिलांच्या प्रश्नांना थेट भिडणारे विषय हाताळले आहेत. 

यंदाच्या ऑक्टोबर-नोव्हेंबर २०२६ च्या संयुक्त दिवाळी अंकात मासिकाने एक धाडसी निर्णय घेतला. आंतरराष्ट्रीय महिला वर्षाच्या सुवर्णमहोत्सवी वाटचालीचा सखोल धांडोळा घेत, या अंकात 'अहसास-ए-मुस्लिम औरत' म्हणजेच ‘मुस्लिम महिलांचे भावविश्व’ नावाचा विशेष विभाग प्रकाशित करण्यात आला आहे.

आजच्या अस्वस्थ, ध्रुवीकरणाच्या आणि राजकीय द्वेषाने भरलेल्या वातावरणात हा विभाग म्हणजे धार्मिक सुसंवाद आणि मुस्लिम महिलांच्या अभिव्यक्तीच्या दिशेने टाकलेले संवेदनशीलतेने टाकलेले पाऊल आहे. 

मुस्लिम समाजाविषयी जाणीवपूर्वक पसरवलेले पूर्वग्रह आणि गैरसमज दूर करत, या विशेषांकाने मुस्लिम महिलांच्या जगण्याचा, त्यांच्या संघर्षाचा आणि त्यांच्या यशाचा व्यापक पट वाचकांसमोर मांडला आहे. 

मासिकाच्या संपादक गीताली वि. मं. यांच्या संकल्पनेतून आणि या विभागाच्या अतिथी संपादक, रामनाथ गोयंका पुरस्कार प्राप्त पत्रकार हलीमाबी कुरेशी-शेख यांच्या संपादकीय कौशल्यातून हा अंक ऐतिहासिक दस्तावेजासारखा उभा राहिला आहे. यानिमित्ताने आवाज मराठीशी बोलताना दोघींनीही या अंकाचा उद्देश आणि अंकपूर्तीचा अनुभव सांगितला. 

गीताली ताईंचे 'शांतिसंवाद' संपादकीय 
अंकाच्या सुरुवातीलाच गीताली ताईंनी आपल्या 'शांतिसंवाद' या संपादकीयमधून आजच्या वर्तमानावर परखड भाष्य केले आहे. देशातील अस्वस्थ वातावरण, ऑक्टोबर महिन्यातच उग्र रूप धारण करणारी पाण्याची भीषण टंचाई आणि या सर्व संकटांचे मूळ असणारी 'आर्थिक विषमता' यावर याकडे त्यांनी लक्ष्य वेधले आहे. भूक लागली असताना खाणं ही प्रकृती आहे, दुसऱ्याला घासातला घास देणं ही संस्कृती आहे आणि भूक मिटल्यावरही दुसऱ्याचं ओरबाडून घेणं ही विकृती आहे, याची आठवण त्यांनी करून दिली आहे.

लोकशाहीत केवळ पाच वर्षांत एकदा मतदान करून सुजाण नागरिक म्हणून आपली जबाबदारी संपत नाही, तर सरकार काय धोरणे आखते, ती कशी राबवली जातात यावर डोळ्यात तेल घालून नजर ठेवणारा 'सजग नागरिक' असणे ही काळाची गरज आहे, हे त्यांनी सांगितले आहे.

या संपादकीयमधील लक्षवेधी संकल्पना म्हणजे 'सोशल बंकर' (Social Bunker). याविषयी भाष्य करताना गीतालीताईंनी समाजातील एका दुर्दैवी वास्तवावर प्रकाश टाकला आहे. उजवीकडचे लोक किंवा मुख्य प्रवाहातले अनेक जण आपल्या ओळखीच्या एखाद्या मुस्लिम व्यक्तीविषयी बोलताना त्यांना संपूर्ण समाजाचे प्रतिनिधित्व करू देत नाहीत. त्या चांगल्या व्यक्तीला ते 'अपवाद' ठरवतात आणि बाकीच्या संपूर्ण समुदायाबद्दल मनात पूर्वग्रह बाळगून असतात. हीच आजची मोठी सामाजिक-सांस्कृतिक शोकांतिका आहे, असं त्या नोंदवतात. 

या शोकांतिकेवर मात करण्यासाठी कोल्हापूरच्या 'रिनेसा' संस्थेच्या कार्यकर्त्यांनी मांडलेली 'सोशल बंकर'ची संकल्पना गीतालीताईंनी पुढे सांगितली आहे. युद्धाच्या काळात स्वतःचे रक्षण करण्यासाठी जसे आपण बंकरचा आश्रय घेतो, तशीच विविध जाती-धर्मांच्या मित्रांची, शेजाऱ्यांची एक विनाभेद रचना उभी राहणे गरजेचे आहे. कधीही आकस्मिक धोक्याची परिस्थिती निर्माण झाली तर आपले मित्र-मैत्रिणी आणि शेजारी हेच आपले 'सोशल बंकर' बनून उभे राहिले पाहिजेत, हा विचार यात मांडला आहे.

हलिमाबी कुरेशी आणि 'अहसास-ए-मुस्लिम औरत' विभागाची पार्श्वभूमी
मुख्य प्रवाहातील माध्यमांमध्ये मुस्लिम महिलांचे चित्रण नेहमीच काही ठराविक साच्यात बसवले जाते. मुस्लिम महिलांचे विश्व हिजाब, तिहेरी तलाक किंवा गुन्हेगारी जगत यांपुरतेच मर्यादित आहे, असा एक आभास पद्धतशीरपणे निर्माण केला जातो. या पूर्वग्रहांवरवर हल्ला करत हलिमाबी कुरेशी यांनी अतिथी संपादक म्हणून अभ्यासपूर्ण पद्धतीने विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या महिलांना समोर आणले आहेत.

याविषयी बोलताना हलिमाबी स्पष्ट करतात की, माध्यमांमध्ये नेहमीच मुस्लिम महिलांना 'अबला' किंवा पीडित म्हणून दाखवले जाते. हे चित्र चुकीचे आहे. आजच्या युगात मुस्लिम महिला शिक्षण घेत आहेत, पोलिस दलात, वैद्यकीय क्षेत्रात, प्रशासनात तसेच विमान चालवण्यासारख्या उच्च पदांवर कार्यरत आहेत. त्यांची ही सकारात्मक बाजू समोर आणणे आवश्यक आहे. स्वतः मराठी माध्यमात फिल्डवर काम करणाऱ्या पहिल्या महिला टेलिव्हिजन रिपोर्टर म्हणून काम करताना त्यांना आलेले अनुभव आणि भाषेवरील पकड त्यांच्या या संपादकीय प्रवासाला एक वेगळी खोली मिळवून देते.

विशेषांकातील विविध लेखांचा सखोल धांडोळा
या विशेषांकामध्ये समाविष्ट केलेल्या विविध लेखांमधून मुस्लिम महिलांच्या बहुआयामी संघर्षाचे आणि कर्तृत्वाचे दर्शन घडते. 
अनिसा सिकंदर यांनी फातिमा शेख यांच्या शैक्षणिक आणि सामाजिक कार्याचे स्मरण करून दिले आहे. महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या खांद्याला खांदा लावून पुण्यात मुलींची पहिली शाळा सुरू करणाऱ्या फातिमा शेख यांच्या इतिहासातील योगदानावर प्रकाश टाकण्यात आला आहे. 

तसेच अरुणा दिवेगावकर यांनी मराठवाड्यातील मुस्लिम स्त्रियांच्या स्थितीचा सखोल शोध घेतला आहे. निजाम राजवट, रजाकार चळवळ आणि तिथल्या ऐतिहासिक पार्श्वभूमीचा तिथल्या बायकांच्या मनावर व आयुष्यावर झालेला परिणाम त्यांनी मांडला आहे.

कोल्हापूरच्या 'रिनेसा' संस्थेच्या माध्यमातून शिल्पा शिवलकर यांनी मुस्लिम महिलांच्या कौटुंबिक आणि सामाजिक कोंडीचा वेध घेतला आहे. संविधानाने दिलेले हक्क आणि कुराणातील आधुनिक विचारांचा आधार घेत महिला कशा प्रकारे पुरुषसत्ताक बंधने तोडत आहेत, याचे चित्रण यात दिसते. दुसरीकडे, मुंब्रामधील 'पर्चम' या संस्थेच्या माध्यमातून मुस्लिम मुलींना फुटबॉल खेळायला शिकवणे आणि त्या खेळाच्या माध्यमातून जाती-धर्माचे भेद कसे गळून पडतात, याचा आढावा घेतला आहे. 

समाजात एकल महिलांसमोर असणाऱ्या समस्यांचे गांभीर्य राजेंद्र बहाळकर यांनी आपल्या लेखात मांडले आहे. हमीद दलवाई इस्लामिक रिसर्च इन्स्टिट्यूटच्या माध्यमातून काम करताना त्यांनी बालविवाहाच्या दुष्टचक्रातून बाहेर पडून स्वतः बॉडीगार्ड किंवा बाउन्सर बनलेल्या एका महिलेची रोमांचक केस स्टडी समोर आणली आहे.

 नूरजहां सफिया नियाज (भारतीय मुस्लिम महिला आंदोलन) यांनी मुस्लिम पर्सनल लॉ मधील त्रुटी आणि महिलांवर होणाऱ्या अन्यायावर कायदेशीर भाष्य केले आहे. कायद्यातील तरतुदी आणि प्रत्यक्षातली अंमलबजावणीतील विसंगती त्यांनी उलगडून दाखवली आहे.

मीनाज लाटकर यांनी प्रशासनात वर्षानुवर्षे काम करणाऱ्या यास्मिन शेख आणि नव्याने अधिकारी झालेल्या शाजिदा पठाण यांच्या प्रवासाविषयी लिहिले आहे. प्रतिकूल परिस्थितीवर मात करत उच्च पदांवर पोहोचलेल्या या महिला आजच्या पिढीसाठी प्रेरणास्थान आहेत. 

प्राध्यापक डॉ. शाकिरा इनामदार यांनी प्राणिशास्त्र विभागाच्या प्रमुख म्हणून काम करताना शैक्षणिक क्षेत्रात जात आणि धर्माच्या आधारावर होणाऱ्या भेदभावाला कसा कडाडून विरोध केला, याचा अनुभव लिहिला आहे. काश्मिरी आणि मुस्लिम विद्यार्थ्यांवर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध त्यांनी उभी केलेली कायदेशीर आणि नैतिक लढाईही वाचकांचे डोळे उघडणारी आहे.

शहरांमध्ये मुस्लिम समुदायाला मिश्र वस्त्यांमध्ये घर मिळताना येणाऱ्या अडचणी आणि त्यामुळे वाढत चाललेले घेट्टोकरण (Ghettoization) यावर तमन्ना इनामदार यांनी 'रहने को घर नहीं...' या लेखातून मार्मिक भाष्य केले आहे. 

तर दुसरीकडे, आजच्या तरुण पिढीच्या म्हणजेच 'जेन-झी' च्या विचारपद्धतीवर आणि आंदोलनांमधील सहभागावर कलीम अज़ीम, अर्णव वेलदोडे आणि फेमिना नझीर यांनी प्रकाश टाकला आहे. दिल्लीच्या जंतरमंतरपासून ते देशभरातील विविध आंदोलनांमध्ये मुस्लिम तरुण आणि तरुणींचा सक्रिय सहभाग दिसून येतो. व्यक्तिगत स्वातंत्र्य, हक्क आणि लोकशाही मूल्ये जपण्यासाठी ही तरुण पिढी अधिक आक्रमक, सजग झाली आहे.

साहिल कबीर यांची कविता ग्रामीण अर्थव्यवस्थेत आणि बारा बलुतेदारांच्या व्यवहारात मुस्लिम स्त्रीचे असणारे स्थान अधोरेखित करते. तसेच वृषाली दिशा यांनी आदिवासी ट्रान्समहिलेचा प्रवास मांडत, मुस्लिम ओळख आणि ट्रान्स ओळख यांच्या संघर्षाचे वास्तव मांडले आहे.

दीपावली अंकात इतर समृद्ध विषय : स्त्री चळवळ नाबाद पन्नास
या दिवाळी अंकात मुस्लिम महिलांच्या विशेष विभागाव्यतिरिक्त इतरही अनेक गंभीर आणि वैचारिक विषयांवर सुंदर लेखन आले आहे. आंतरराष्ट्रीय महिला वर्षाच्या सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त 'स्त्री-चळवळ नाबाद पन्नास' या व्यापक थीम अंतर्गत अनेक अभ्यासपूर्ण लेख समाविष्ट आहेत. 

'मिळून साऱ्याजणी'चा हा ऑक्टोबर-नोव्हेंबर २०२६ चा दिवाळी अंक सामाजिक प्रबोधनाचा आणि वैचारिक मंथनाचा मोठा दस्तावेज ठरू शकतो. मुस्लिम महिलांच्या जीवनातील वेदना, संघर्ष, यश आणि आत्मसन्मान या सर्व अंगांना स्पर्श करणारा हा अंक नवी दृष्टी देणारा आहे.

'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा  -

Awaz Marathi WhatsApp Group 
Awaz Marathi Facebook Page

Awaz Marathi Twitter