भक्ती चाळक
स्वतःचा व्यवसाय उभा करणं, त्यातून आर्थिक स्थैर्य मिळवणं आणि पुढे त्याच व्यवसायाच्या माध्यमातून इतर महिलांसाठी रोजगाराच्या संधी निर्माण करणं, हे सहज शक्य नसतं. त्यासाठी जिद्द, मेहनत आणि माणसं जोडण्याची हातोटी लागते. पुण्याच्या परवीन सय्यद यांनी नेमकं हेच साध्य केलं आहे.
अवघ्या अडीच हजार रुपयांच्या भांडवलावर सुरू केलेला परवीन यांचा कपड्यांचा व्यवसाय आज ‘हिरा बुटीक’ या नावाने ओळखला जातो. प्रदर्शनांच्या माध्यमातून त्यांनी हजारो महिलांना व्यवसायाची संधी उपलब्ध करून दिली. घरातून सुरू झालेल्या छोट्या व्यवसायाचं रूपांतर ब्रँडमध्ये झालं.
पुण्यापासून मुंबई, इंदूर, अहमदाबाद, लखनऊ, बनारस आणि आता दुबईपर्यंत पोहोचलेली त्यांची ही व्यावसायिक वाटचाल अनेक महिलांसाठी प्रेरणादायी आहे. विशेष म्हणजे स्वतःची प्रगती साधताना इतर महिलांची प्रगती व्हावी, हाच त्यांच्या कामाचा केंद्रबिंदू राहिला आहे.
परवीन यांचा जीवनप्रवास
परवीन सैय्यद यांचं बालपण मुंबईत गेलं. उर्दू माध्यमातून दहावीपर्यंत शिक्षण झालं. त्यानंतर लवकर लग्न झालं आणि त्या पुण्यात आल्या. आज पुण्यात राहून त्यांना ३२ वर्षे झाली आहेत. या काळातील सहा ते सात वर्षे त्यांनी ऑस्ट्रेलियातही घालवली.
व्यवसायाचा वारसा परवीन यांना घरातूनच मिळाला. आई-वडिलांचा धाग्यांचा व्यवसाय होता. गजऱ्यांमध्ये वापरल्या जाणारे धागे ते बनवायचे. घरी व्यवसायाचं वातावरण असल्याने लहानपणापासूनच कामाची आणि मेहनतीची सवय लागली. त्या काळात धागा तयार करण्यासाठी चरखा चालवला जायचा. कारागीर असतानाही आई-वडील मुलांनाही कामात सहभागी करून घेत. परवीन यांनीही चरखा चालवला. त्यामुळे लहानपणापासूनच व्यवसायाची गोडी लागली.
लग्नानंतर पुण्यात आल्यावर मात्र मुंबईच्या वेगवान आयुष्याची सवय असलेल्या परवीन यांना सुरुवातीला मोकळा वेळ खटकू लागला. काहीतरी काम करावं, स्वतःला व्यस्त ठेवावं, अशी इच्छा होती. त्यातून त्यांनी कपड्यांचा व्यवसाय सुरू केला.
साधारण तीस वर्षांपूर्वी मुस्लिम समाजातील महिलांनी घराबाहेर पडून स्वतंत्र व्यवसाय करणं सोपं नव्हतं. व्यवसाय जमेल का, ग्राहक मिळतील का, लोक काय म्हणतील, अशा अनेक प्रश्नांचा सामना महिलांना करावा लागत होता. मात्र परवीन यांनी या प्रश्नांमध्ये न अडकता स्वतःचा मार्ग निवडला.
पुण्यातील गणेश पेठ परिसरात सासरचं घर होतं. तिथेच त्यांनी व्यवसाय सुरु केला. मुंबईहून अडीच हजार रुपयांचे काही दुपट्टे आणले आणि विक्री सुरू केली. पहिल्याच प्रयत्नाला चांगला प्रतिसाद मिळाला. मिळालेल्या नफ्यातून पुन्हा माल आणला. अडीच हजारांपासून तीन हजार, त्यानंतर पाच हजार अशा पद्धतीने व्यवसायाची व्याप्ती वाढत गेली.
ऑस्ट्रेलियातही शिकण्याची धडपड
पुण्यात दोन-तीन वर्षे व्यवसाय केल्यानंतर परवीन कुटुंबासह ऑस्ट्रेलियात गेल्या. पती तिथे नोकरी करत होते. मात्र परवीन यांनी तिथेही स्वतःला रिकामं ठेवलं नाही. त्या तिथे इंग्रजी भाषा आणि संगणक शिकल्या. चाइल्ड केअर आणि नर्सरीसंबंधी अभ्यासक्रमही पूर्ण केला. पुढे तिथे नोकरीची संधी मिळाली आणि त्या कामातही यश मिळालं.
सहा ते सात वर्षांनंतर कुटुंब पुन्हा पुण्यात परतलं. परवीन यांनी कपड्यांचा व्यवसाय नव्या जोमाने सुरू केला. याच व्यवसायाला पुढे ‘हिरा बुटीक’ हे नाव मिळालं. ग्राहकांचा विश्वास वाढत गेला आणि व्यवसायही विस्तारत गेला.
मात्र २०२० मधील लॉकडाऊनने सगळ्यांच्याच आयुष्याला वेगळं वळण दिलं. व्यवसाय बंद झाले. अनेक मध्यमवर्गीय कुटुंबांसमोर आर्थिक प्रश्न उभे राहिले. परवीन याही मध्यमवर्गीय कुटुंबातून येतात. त्यामुळे घरबसल्या काहीतरी काम करण्याची इच्छा असलेल्या महिलांची अडचण त्यांना जवळून जाणवत होती. पुण्यात महिलांना घरबसल्या व्यवसायाच्या संधी फारशा उपलब्ध नव्हत्या. लॉकडाऊन संपल्यानंतर या महिलांसाठी काहीतरी करण्याचा निर्धार त्यांनी केला.
१२ स्टॉल्सचे भव्य प्रदर्शन
लॉकडाऊन संपल्यानंतर परवीन यांनी स्वतःच्या घराबाहेरील मोकळ्या जागेत पहिलं प्रदर्शन भरवलं. सुरुवातीला अवघे १२ स्टॉल लावण्यात आले. प्रत्येक स्टॉलसाठी दिवसाला ५०० रुपये शुल्क ठेवलं. ओळखीच्या लोकांपर्यंत संदेश पोहोचवला. स्वतःच्या ग्राहकांनाही फोन करून या महिलांच्या स्टॉलवर खरेदी करण्याचं आवाहन केलं.
दोन दिवसांच्या या छोट्याशा प्रदर्शनाला चांगला प्रतिसाद मिळाला. महिलांची विक्री झाली. ग्राहकांचा प्रतिसाद पाहून त्यांच्या मनातील भीती कमी झाली. व्यवसाय करता येतो, ग्राहक मिळू शकतात आणि स्वतःच्या उत्पादनांना बाजारपेठ मिळू शकते, हा विश्वास निर्माण झाला.
या पहिल्या प्रदर्शनातूनच पुढच्या मोठ्या प्रवासाची बीजं रोवली गेली. आज या व्यासपीठाशी हजारो महिला जोडल्या गेल्या आहेत. घरातून छोट्या प्रमाणावर काम करणाऱ्या अनेक महिलांनी स्वतःची दुकानं सुरू केली आहेत. काहींनी भाड्याने जागा घेतली, तर काहींनी स्वतःची दुकानं उभी केली.
प्रत्येक महिलेचा स्वतःचा ब्रँड तयार व्हावा, दुकानाबाहेर तिच्या ब्रँडचा फलक लागावा, अशी परवीन इच्छा होती. महिलांना आवाहन करताना त्या म्हणतात, “मला महिलांना फक्त स्टॉलपर्यंत आणायचं नाही, तर दुकानापर्यंत पोहोचवायचं आहे. त्यांच्या नावाचा स्वतःचा ब्रँड तयार व्हावा, असं मला वाटतं. फक्त स्वतःच्या हिमतीवर उभं राहण्याची तयारी असली पाहिजे.”
आज अनेक महिलांची ओळख त्यांच्या स्वतःच्या ब्रँडमुळे तयार झाली आहे. पूर्वी व्यवसाय सुरू करण्याची भीती वाटणाऱ्या महिला आता आत्मविश्वासाने दुकान सांभाळतात, ग्राहकांशी बोलतात आणि स्वतःचे निर्णय घेतात.
महिलांच्या कौशल्याला बळ देण्याचा प्रयत्न
हिरा बुटीकच्या प्रदर्शनांमध्ये कपडे आणि दागिन्यांपुरते स्टॉल मर्यादित नाहीत. मेहंदी आर्टिस्ट, मेकअप आर्टिस्ट, टेलरिंग करणाऱ्या महिला, आर्ट अँड क्राफ्ट करणारे व्यावसायिक अशा अनेकांना त्यांनी व्यासपीठ उपलब्ध करून दिलं आहे.
विशेषतः मुलांना मोबाईलच्या विळख्यातून बाहेर काढण्यासाठी आर्ट अँड क्राफ्ट आणि विविध उपक्रमांचे स्टॉल सुरू करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. लहान मुलांना जेवतानाही मोबाईल दिला जातो. खेळण्यांची जागा मोबाईलने घेतली आहे. यासाठी पालकही जबाबदार असल्याचं परवीन स्पष्टपणे सांगतात.
त्या म्हणतात, “मुलांच्या हातात मोबाईल देण्याची सवय आपणच लावतो. ते शांत बसावेत म्हणून आपण मोबाईल देतो. पण त्याचा त्यांच्या विचारांवर आणि मनावर काय परिणाम होतो, याकडे आपलं लक्ष नसतं. मुलांना मोबाईलपासून दूर ठेवण्यासाठी त्यांना वेगवेगळ्या उपक्रमांमध्ये सहभागी करून घ्यायला हवं.”
त्यामुळे परवीन यांच्या प्रदर्शनांमध्ये मुलांसाठी उपक्रमांचे स्टॉल असतात. मुलांना नवनवीन गोष्टी शिकण्याची संधी मिळते. पालकांनाही मुलं आनंदाने काहीतरी शिकत असल्याचं समाधान मिळतं. मेहंदी, शिवणकाम, मेकअप अशा कामांकडे अनेकदा दुय्यम नजरेने पाहिलं जातं. मात्र या कामांसाठीही महिलांनी वेळ, पैसा आणि मेहनत खर्च केलेली असते. त्यांच्या कौशल्याचा सन्मान व्हावा, यासाठी परवीन प्रयत्नशील आहेत.
आर्थिक उन्नतीचा कानमंत्र देताना परवीन म्हणतात, “जगात सगळ्यात मौल्यवान गोष्ट कोणती असेल, तर ती म्हणजे वेळ. तुम्ही वेळेची कदर केली, मेहनत घेतली, तर खूप मोठी दौलत कमवू शकता. पैशाच्या मागे धावण्यापेक्षा वेळेचा योग्य वापर करा. पैसा तुमच्या मागे येईल.”
पहिल्यांदा व्यवसाय सुरू करणाऱ्या महिलांना त्या विशेष प्रोत्साहन देतात. एखादी महिला आपला व्यवसाय छोटा असल्याचं सांगत आली, तर त्या तिला आधी स्वतःकडे मोठ्या नजरेने पाहायला शिकवतात. त्या म्हणतात, “छोटा व्यवसाय असं कधी म्हणू नका. व्यवसाय सुरू करण्याचा विचार करणं हीच खूप मोठी गोष्ट आहे. तुम्ही स्वतःला मोठं समजा. मनात करण्याची जिद्द आली, तर पुढचा मार्ग सोपा होतो.”
मोठ्या कार्यक्रमापेक्षा महिलांच्या रोजीरोटीला प्राधान्य
आजपर्यंत परवीन यांनी २५ प्रदर्शने भरवली आहेत. सुरुवातीला १२ स्टॉलपासून सुरू झालेला हा प्रवास आता १२० स्टॉलपर्यंत पोहोचला आहे. महिलांचा प्रतिसाद पाहून दर महिन्याला प्रदर्शन भरवण्याची मागणीही होते. मात्र परवीन प्रत्येक तीन महिन्यांनी प्रदर्शन आयोजित करण्याला प्राधान्य देतात.
यामागे त्यांचा व्यावसायिक दृष्टिकोन आहे. ग्राहक दर महिन्याला खरेदी करेलच असं नाही. प्रदर्शनात सहभागी होणाऱ्या प्रत्येक महिलेला चांगली विक्री व्हावी, तिला आर्थिक फायदा मिळावा, याचा त्या विचार करतात. स्वतःच्या उत्पन्नासाठी महिलांच्या स्टॉलवर ग्राहक नसताना त्यांच्याकडून पैसे घेणं त्यांना योग्य वाटत नाही.
याबाबत परवीन म्हणतात, “मलाही पैशांची गरज आहे. मीसुद्धा मध्यमवर्गीय आहे. पण माझ्यासोबत आलेल्या महिलांचा व्यवसाय झाला पाहिजे. त्यांना ग्राहक मिळाले पाहिजेत. त्यांचा व्यवसाय न होता त्या स्टॉलवर उदास बसलेल्या दिसल्या, तर त्यांच्याकडून आलेले पैसे मी कसे स्वीकारू? मला स्वतःलाही मिळावं आणि माझ्यासोबतच्या महिलांनाही मिळावं. आपण सगळ्यांनी मिळून पुढे जायचं आहे.”
मोठमोठे कार्यक्रम, स्टेज शो आणि गर्दी जमवण्यापेक्षा प्रत्यक्ष ग्राहक महिलांपर्यंत पोहोचला पाहिजे असे परवीन यांना वाटते. प्रत्येक प्रदर्शनातून सहभागी महिलांना नफा मिळावा, नवीन ग्राहक जोडले जावेत आणि पुढे त्यांचा स्वतंत्र व्यवसाय वाढावा, हाच त्यांचा प्रयत्न असतो.
‘रिश्ता हिरा’ वधूवर मेळाव्याचे आयोजन
परवीन यांचं काम केवळ प्रदर्शनं भरवण्यापुरतं मर्यादित नाही. गेल्या दोन वर्षांपासून त्यांनी ‘रिश्ता हिरा’ या नावाने विवाह जुळवणीचा उपक्रम सुरू केला आहे. आज अनेक कुटुंबांना मुला-मुलींसाठी योग्य स्थळ शोधताना आर्थिक आणि मानसिक अडचणींचा सामना करावा लागतो. विवाह जुळवणीसाठी काही ठिकाणी मोठ्या प्रमाणावर शुल्क आकारलं जातं. अनेक मध्यमवर्गीय कुटुंबांना हा खर्च परवडत नाही.
ही अडचण लक्षात घेऊन परवीन या पालकांना थेट एकमेकांशी जोडून देतात. मुला-मुलींची माहिती आणि प्रोफाइल एकमेकांपर्यंत पोहोचवली जातात. त्यानंतर पालकांना प्रत्यक्ष भेटून चर्चा करता येते. यासाठी ठरावीक ठिकाणी भेटी आयोजित केले जातात. त्यामुळे वारंवार प्रवास, चहा-पाण्याचा खर्च आणि मध्यस्थांच्या माध्यमातून होणारा अतिरिक्त खर्च टाळता येतो.
या उपक्रमातून लग्न जुळल्यानंतर परवीन कोणतंही शुल्क घेत नाहीत. मात्र प्रत्यक्ष भेटीचा कार्यक्रम आयोजित करण्यासाठी सभागृह आणि नाश्त्याचा खर्च भागवण्याकरिता नोंदणी शुल्क आकारलं जातं. सहभागी कुटुंबांना सहा महिन्यांसाठी संबंधित ग्रुपमध्ये जोडण्याची सुविधाही दिली जाते.
परवीन म्हणतात, “रिश्ता जुळल्यानंतर मी एक रुपयाही घेत नाही. पालकांनी एकमेकांशी थेट बोलावं, मुलांची प्रोफाइल पाहावी आणि स्वतः निर्णय घ्यावा. अनेक वर्षांपासून स्थळासाठी प्रयत्न करणाऱ्या कुटुंबांना इथं सहज मदत मिळते, याचं समाधान वाटतं.”
या उपक्रमाला देशाबाहेरही मोठा प्रतिसाद मिळत आहे. दुबई, ऑस्ट्रेलिया आणि कॅनडामधूनही त्यांच्याकडे विचारणा होत आहे. येत्या १५ नोव्हेंबरला त्यांनी दुबईमध्ये ‘रिश्ता हिरा’चा कार्यक्रम आयोजित केला आहे.
पुण्याच्या महिलांना दुबईच्या बाजारपेठेपर्यंत पोहोचवण्याचं स्वप्न
दुबई दौऱ्यामागे परवीन यांचा आणखी एक महत्त्वाचा उद्देश आहे. तिथल्या कुटुंबांना विवाह जुळवणीसाठी व्यासपीठ देण्यासोबतच पुण्यातील महिलांच्या व्यवसायाला आंतरराष्ट्रीय बाजारपेठ उपलब्ध करून द्यायची आहे. त्यांच्या प्रदर्शनांमध्ये सहभागी होणाऱ्या महिलांनी दुबईत जाऊन स्टॉल लावावेत, तिथल्या ग्राहकांपर्यंत स्वतःची उत्पादनं पोहोचवावीत, अशी त्यांची योजना आहे.
एखादी महिला वीस ड्रेस घेऊन दुबईत स्टॉल लावेल. तिथल्या ग्राहकांना तिचं कलेक्शन आवडलं, तर पुढे भारतात परतल्यानंतरही ऑनलाइन खरेदीच्या माध्यमातून तिचा व्यवसाय सुरू राहू शकतो. एका ग्राहकाच्या माध्यमातून आणखी चार ग्राहक जोडले जाऊ शकतात.
या विचारातून परवीन स्थानिक महिलांना आंतरराष्ट्रीय व्यासपीठ मिळवून देण्याचा प्रयत्न करत आहेत. देशातील अनेक मोठमोठाल्या शहरांमधील महिलाही त्यांच्या व्यासपीठाशी जोडल्या गेल्या आहेत. हाँगकाँगमधूनही त्यांना संपर्क आला आहे. तिथल्या महिलांनी दुबईतील प्रदर्शनात सहभागी होण्याची तयारी दर्शवली आहे.
याविषयी परवीन म्हणतात, “व्यवसाय प्रत्येक ठिकाणी आहे. प्रत्येक घराला रोजच्या वापरातील वस्तू लागतात. गरज आहे ती व्यवसाय करण्याची हिंमत दाखवण्याची. माझ्यासोबतच्या महिलांना आणखी चांगली बाजारपेठ मिळावी, त्यांचा व्यवसाय वाढावा, यासाठी मला त्यांना वेगवेगळ्या देशांपर्यंत घेऊन जायचं आहे.”
मुस्लीम महिलाही निर्माण करू शकतात स्वतःची ओळख
मुस्लिम समाजातील महिला शिक्षण घेत नाहीत किंवा त्या व्यवसायात उतरू शकत नाहीत, असे बऱ्याचदा बोलले जाते. परवीन यांनी स्वतःच्या प्रवासातून अशा विचारांना चपराक दिली आहे. हिजाब आणि पडद्याचं पालन करत महिलांना व्यवसाय करता येतो, स्वतःची ओळख निर्माण करता येते, असा त्यांचा ठाम विश्वास आहे.
लॉकडाऊननंतर त्यांनी याच विचारातून एक व्हिडिओ तयार करून समाजमाध्यमांवर प्रसिद्ध केला होता. त्यानंतर महिलांचा त्यांच्याशी संपर्क वाढला. पुण्यातील अनेक कुटुंबांचा विश्वास संपादन करण्यात त्यांना यश आलं. सुरुवातीला काही महिला प्रदर्शनासाठी येताना कुटुंबीयांनाही संकोच वाटत होता. मात्र कार्यक्रमाचं वातावरण पाहिल्यानंतर त्यांचाही विश्वास वाढला.
परवीन सांगतात, “पडदा आणि हिजाब पाळून आपण आपली कामं करू शकतो. मग बाहेर पडून व्यवसाय का करू नये? एकदा हिंमत करून बाहेर पडा. स्वतःची ओळख निर्माण करा.”
त्यांच्या प्रदर्शनांचं वातावरणही कुटुंबांना सहभागी होण्यासाठी प्रोत्साहन देणारं असतं. अनेकदा पती, भाऊ, वडील आणि मुलं स्टॉलवर महिलांना मदत करतात. परवीन यांच्या कुटुंबातील सदस्यही प्रत्येक कार्यक्रमात त्यांच्या सोबत उभे असतात. महिलांच्या कुटुंबीयांनी दिलेल्या पाठिंब्याचं त्या विशेष कौतुक करतात. कधी कधी स्टॉलवर मदत करणाऱ्या पुरुषांनाही त्या सन्मानचिन्ह देतात.
परवीन महिलांना आवर्जून सांगतात की, “कुटुंबाने विश्वास ठेवून तुम्हाला बाहेर काम करण्याची संधी दिली आहे, तर तो विश्वास जपा. व्यवसाय महत्त्वाचा आहेच. पण कुटुंबाला पहिलं स्थान द्या. माहेर असो किंवा सासर, कुटुंबाची काळजी घेऊन व्यवसाय करा.”
कष्टकरी महिलांच्या डोक्यावर चढवला मुकुट
परवीन प्रत्येक प्रदर्शनात काहीतरी नवीन करत असतात. अलीकडील एका प्रदर्शनात त्यांनी सहभागी महिलांसाठी खास उपक्रम राबवला. अनेक वर्षांपासून मेहनत करणाऱ्या महिलांच्या डोक्यावर त्यांनी मुकुट चढवला. एवढंच नाही, तर प्रदर्शनात स्वच्छतेचं काम करणाऱ्या महिलांनाही मुकुट घालून सन्मानित केलं. मुकुट घालताना अनेक महिला भावूक झाल्या तर काहींच्या डोळ्यात अश्रू आले.
घर, मुलं, सासर-माहेरची जबाबदारी आणि व्यवसाय सांभाळताना महिलांची होणारी धावपळ त्यांना माहिती आहे. अनेक वर्षं काम करूनही महिलांच्या कष्टांचं कौतुक क्वचितच होतं. अशा महिलांना राणी असल्याची भावना अनुभवता यावी, हा या उपक्रमामागचा हेतू होता.
वैचारिक समुपदेशन
परवीन या लहान मुलांशी मुलांसारख्या, तरुण मुलींशी मैत्रिणीसारख्या वागतात. कार्यक्रमांना येणारी अनेक मुलं त्यांच्यासोबत फोटो काढण्यासाठी उत्सुक असतात. मुलांच्या मनातलं समजून घेण्यासाठी त्या छोट्या छोट्या समुपदेशनाच्या गप्पाही मारतात. हसतखेळत मुलांशी संवाद साधून त्यांना योग्य दिशा देण्याचा प्रयत्न त्या करतात.
तरुण मुलींच्या मनात लग्न, शिक्षण, नोकरी आणि वैवाहिक आयुष्याबद्दल असणारे प्रश्नही त्या समजून घेतात. लग्न करावं की नाही, सासरच्या अपेक्षा, माहेरच्या जबाबदाऱ्या आणि स्वतंत्र आयुष्य याबद्दल गोंधळलेल्या मुलींशी त्या चर्चा करतात. कोणताही निर्णय घाईने घेण्याऐवजी प्रत्येक पर्यायाचे फायदे-तोटे समजून घ्यावेत, असं त्यांना वाटतं.
याशिवाय वयाची साठी ओलांडलेल्या महिलांसाठी आठवड्यातून एक दिवस, एक-दोन तासांचा स्वतंत्र मेळावा आयोजित केला जातो. घर, मुलं, सुना, जावई आणि आजारपण या चक्रात अडकलेल्या ज्येष्ठ महिलांना स्वतःसाठी थोडा वेळ मिळावा, एकमेकींशी संवाद साधता यावा आणि मनमोकळं हसता यावं, हा त्यामागचा हेतू आहे.
कुटुंबाची खंबीर साथ
या सगळ्या प्रवासात परवीन यांना पती जाकिर सय्यद आणि मुलांची मोठी साथ मिळाली. त्यांना एक मुलगी आणि तीन मुलं आहेत. लग्नानंतर परवीन यांच्यातील व्यवसायाची आवड आणि काम करण्याची जिद्द पतीने ओळखली. त्यामुळे त्यांनी कधीही परवीन यांना अडवलं नाही. लॉकडाऊननंतर प्रदर्शनांचा विस्तार सुरू झाला, तेव्हा पतींसह तिन्ही मुलं आणि मुलगी त्यांच्या सोबत उभे राहिले.
प्रत्येक प्रदर्शनात शुक्रवार, शनिवार आणि रविवार असे तीन दिवस कुटुंबीय दिवसभर आणि रात्री उशिरापर्यंत मदत करतात. आता सून आणि जावईही या कामात सहभागी होतात. परवीन यांचा दोन नंबरचा मुलगा व्यवसायाचं मॅनेजमेंट सांभाळतो. परवीन स्वतः महिलांशी संवाद साधतात, तर पडद्यामागील अनेक जबाबदाऱ्या मुलगा पाहतो.
कुटुंबाच्या पाठिंब्याबद्दल परवीन म्हणतात, “या सगळ्या प्रवासात मला कधीच एकटं वाटलं नाही. माझ्या प्रत्येक कामात माझं कुटुंब माझ्यासोबत उभं असतं. कुटुंबाचा पाठिंबा खूप महत्त्वाचा आहे.”
स्वतःसोबतच इतरांचीही प्रगती
वयाच्या ५३व्या वर्षी परवीन यांच्याकडे स्वतःच्या व्यवसायाचा अनुभव, ग्राहकांचा विश्वास आणि अनेक महिलांचं मोठं जाळं आहे. व्यवसायाच्या माध्यमातून इतर महिलांना रोजीरोटी मिळवून देणं, त्यांना स्वतःची ओळख मिळवून देणं, यातच परवीन यांना समाधान मिळतं.
परवीन म्हणतात, “माझ्या आयुष्यातील प्रगतीचा काळ मी पाहिला आहे. आता माझा फायदा घेऊन महिलांनी प्रगती करावी, असं मला वाटतं. ईश्वर प्रत्येकाला काही ना काही गुण देऊन पाठवतो. त्या गुणांचा उपयोग इतरांच्या भल्यासाठी केला पाहिजे. माझ्यामुळे कोणाच्या चेहऱ्यावर थोडंसं हसू आलं, कोणाचा फायदा झाला, तरी माझ्यासाठी ती खूप मोठी गोष्ट आहे.”
त्या पुढे म्हणतात, “माणसाचं आयुष्य केवळ स्वतःसाठी जगण्यात संपता कामा नये. प्रत्येकाला काही ना काही जबाबदारी आणि इतरांसाठी उपयोगी पडण्याची संधी मिळालेली असते. त्या संधीचं सोनं करणं महत्त्वाचं आहे.”
पन्नाशीनंतरच्या आयुष्याकडे पाहण्याचा त्यांचा दृष्टिकोनही तितकाच सकारात्मक आहे. पती-पत्नीने एकमेकांच्या आनंदाची काळजी घ्यावी, मुलं मोठी झाल्यानंतर स्वतःसाठीही वेळ द्यावा, असं त्यांना वाटतं. आयुष्यात अनेक चढ-उतार पाहिल्यानंतर आता दोघांनीही आनंदाने जगावं, ही त्यांची भावना आहे.
वयाची पन्नाशी ओलांडलेल्यांना परवीन म्हणतात, “लोक काय म्हणतील, याचा फार विचार करू नका. स्वतःचं मन काय सांगतं, याकडे लक्ष द्या. आयुष्यात खूप उन्हाळे-पावसाळे पाहिले. मुलं मोठी झाली. आता एकमेकांच्या आनंदाची काळजी घ्यायची आणि स्वतःसाठीही जगायचं.”
परवीन सय्यद यांचे हिरा बुटीक अनेक महिलांच्या आत्मविश्वासाचं केंद्र बनलं आहे. त्या आज हजारो महिलांच्या स्वप्नांना बळ देत आहेत. त्यांच्या कामाचा आवाका आता देशाच्या सीमा ओलांडण्याच्या तयारीत आहे. स्वतः पुढे जाताना इतर महिलांनाही सोबत घेऊन पुढे जाण्याचा त्यांचा विचार खरोखरंच वाखाणण्याजोगा आहे.