जायराला तिच्या निवडीचं स्वातंत्र्य, मग काश्मीरच्या मुलींना का नाही?

Story by  आवाज़ मराठी | Published by  Bhakti Chalak • 1 Months ago
दंगल फेम अभिनेत्री जायरा वसीम
दंगल फेम अभिनेत्री जायरा वसीम

 

आशा खोसा

दहा वर्षांपूर्वीची गोष्ट. अंगावर मूठभर मांस नसलेली, फुगलेले गाल आणि चेहऱ्यावर निष्पाप हासू असलेली १६ वर्षांची एक काश्मिरी मुलगी एका रात्रीत देशभराची लाडकी बनली. आमिर खानच्या 'दंगल' सिनेमात गीता फोगटची भूमिका साकारणारी ही मुलगी होती जायरा वसीम!

तिच्या पहिल्याच अभिनयाने संपूर्ण देशाला याड लावलं. सिनेमा सुपरहिट ठरला, ब्लॉकबस्टर कमाई झाली आणि अवघ्या १६व्या वर्षी जायराला सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीचा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळाला.

पुढच्याच वर्षी आमिर खानच्याच 'सीक्रेट सुपरस्टार'मध्ये ती पुन्हा चमकली. गाण्याचं वेड असणारी, पण वडिलांच्या विरोधाला सामोरी जाणारी इन्सिया मलिक तिने पडद्यावर जिवंत केली. चीनमध्ये तर या सिनेमाने कमाईचे सर्व विक्रम मोडीत काढले. जगभरातल्या लोकांसाठी जायरा आपलं स्वप्न जगत होती. यश तिच्या पायांशी लोळण घेत होतं. पण अचानक काय घडलं?

कारकीर्द शिखरावर असताना अचानक संन्यास!
वय अवघं १८ वर्षे. हाताशी यश, प्रसिद्धी आणि कोट्यवधींचे करार असताना जायराने अचानक अभिनय सोडण्याची घोषणा केली. तिची ही कारकीर्द तिच्या धार्मिक विश्वासांच्या आड येत असल्याचे तिने सांगितले. तिच्या या निर्णयाने संपूर्ण देश हादरला. काहींनी तिच्या या धार्मिक निष्ठेचं कौतुक केलं, तर काहींनी काश्मीरमधील तरुण मुलींवर असलेल्या सामाजिक आणि धार्मिक दबावाकडे बोट दाखवलं.

वास्तविक, हा निर्णय घेण्यापूर्वी जायराला सोशल मीडियावर प्रचंड ट्रोलिंगचा सामना करावा लागला होता. तत्कालीन मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांनी तिला काश्मिरी तरुणांची 'रोल मॉडेल' म्हटलं होतं. त्या भेटीनंतर जायराला थेट जीवे मारण्याच्या धमक्या मिळाल्या होत्या. पुढे तिने स्वतः डिप्रेशनशी लढा देत असल्याचं कबूल केलं. लोकांनी तिच्या खासगी आयुष्याचा आदर करत तिला शांतता दिली.

काही दिवसांपूर्वी ती पुन्हा एकदा चर्चेत आली. तिच्या लग्नाचे फोटो शेअर करत तिने "कबूल आहे" म्हटलं आणि पुन्हा आपल्या खासगी आयुष्यात निघून गेली.

पण वाद इथे संपला नाही...
स्वातंत्र्यदिनाच्या दुसऱ्याच दिवशी जायराने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'X' वर एक पोस्ट टाकली. काश्मीरमधील एका स्वातंत्र्यदिन कार्यक्रमाचा तो व्हिडिओ होता. मंचावर जम्मू-काश्मीर वक्फ बोर्डाच्या अध्यक्षा डॉ. दरखशान अंद्राबी उपस्थित होत्या आणि समोर शाळकरी मुली डान्स करत होत्या.

हा व्हिडिओ शेअर करत जायराने थेट प्रश्न उपस्थित केला. "इस्लामिक मूल्यांनुसार चालणाऱ्या वक्फ बोर्डासारख्या धार्मिक संस्थेने अशा डान्स कार्यक्रमांशी स्वतःला का जोडावं?"

इतक्यावरच न थांबता तिने असाही सवाल केला की, "शाळकरी मुलींना मंचावर नाचवण्यापेक्षा शाळांनी त्यांना विचार करायला, शिकायला आणि काहीतरी नवीन निर्माण करायला शिकवायला हवे."

तिची ही पोस्ट समोर येताच इंटरनेटवर वादाचा भडका उडाला!
स्वतःची पसंती इतरांवर लादणार का? जायराच्या या पोस्टवर लोकांनी तिला चांगलंच धारेवर धरलं. टीकाकारांचं म्हणणं साधेसरळ आहे. जायराला तिचा धर्म निवडण्याचं, चित्रपट सोडण्याचं स्वातंत्र्य होतं. पण स्वतःची तीच धार्मिक बंधनं तिने दुसऱ्या काश्मिरी मुलींवर लादणे चुकीचे आहे.

दुसऱ्या बाजूला, स्वातंत्र्यदिनाच्या कार्यक्रमात काश्मिरी सुफी गाण्यावर मुलींनी नृत्य करणे यात धर्मविरोधी काय आहे? सुफी संगीत हे काश्मीरच्या मातीचा आत्मा आहे.

काश्मीरची परंपरा ओळखणाऱ्यांना ठाऊक आहे की, 'रुफ' (Rouf) हा तिथला पारंपरिक लोकनृत्य प्रकार वर्षानुवर्षे महिला सण-समारंभांत आणि ईदला सादर करतात. हे नृत्य काश्मीरच्या संस्कृतीचा भाग आहे, त्याला 'बिन-इस्लामिक' म्हणून नाकारता येत नाही.

जायराला पाठिंबा देणाऱ्यांचे म्हणणे वेगळे आहे. वक्फ बोर्ड ही जर धार्मिक संस्था आहे, तर अशा कार्यक्रमांशी तिने लांब राहावे असा सवाल करणे रास्त आहे. पण हा वाद केवळ सोशल मीडियापुरता मर्यादित नाही. यामागे काश्मीरची एक भयंकर पार्श्वभूमी दडली आहे.

भूतकाळातील तो कडू अनुभव
काश्मीरमध्ये महिलांना घराबाहेर पडण्यापासून आणि मोकळा श्वास घेण्यापासून रोखण्याचे प्रयत्न नेहमीच झाले आहेत. सुमारे दशकभरापूर्वी काश्मीरमधील मुलींचा 'प्रगाश' (Pragash) नावाचा एक म्युझिक बँड तयार झाला होता. त्या चिमुकल्या मुलींनी गाणे गायले म्हणून त्यांच्यावर धर्ममार्तंडांनी प्रचंड हल्लाबोल केला होता. धमक्यांमुळे शेवटी त्या मुलींना संगीत सोडावे लागले होते.

समाज जेव्हा अशा प्रकारे मुलींच्या स्वातंत्र्यावर नियंत्रण ठेवू लागतो, तेव्हा त्याचे भयंकर परिणाम होतात. जायरा स्वतः डिप्रेशनसारख्या आजारातून गेली आहे. जेव्हा एखाद्याला त्याच्या आवडीनिवडीवरून लक्ष्य केले जाते, तेव्हा काय वाटतं, हे तिच्यापेक्षा वेगळं कोणाला ठाऊक असणार?

माघार घेण्याचा अधिकार सर्वांनाच!
जायराला बॉलिवूड सोडण्याचा पूर्ण अधिकार होता. तिच्या इच्छेनुसार आयुष्य जगण्याचा, पडद्याआड जाण्याचा अधिकार होता. पण तोच अधिकार त्या काश्मिरी मुलींनाही आहे, ज्यांना नाचायचे आहे, गायचे आहे, शिकायचे आहे आणि स्वतःचे अस्तित्व निर्माण करायचे आहे!

कोणावरही नाचण्याची सक्ती केली जाऊ नये, हे जितके खरे; तितकेच स्वतःच्या आनंदासाठी मंचावर थिरकणाऱ्या मुलींना गुन्हेगार ठरवणेही तितकेच चुकीचे!
 

'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा  -

Awaz Marathi WhatsApp Group 
Awaz Marathi Facebook Page

Awaz Marathi Twitter