मुंबई
महाराष्ट्रात सुरू असलेल्या विशेष सखोल पुनरावलोकन (SIR) मोहिमेत प्रारूप मतदार यादी जाहीर झाल्यानंतर राज्यभरातून ६ लाख २४ हजारहून अधिक अर्ज प्राप्त झाले आहेत. यामध्ये नवीन मतदार नोंदणी, हरकती आणि दुरुस्तीच्या अर्जांचा समावेश असून, पुणे जिल्ह्याने यामध्ये सर्वाधिक ५६,६०५ अर्ज नोंदवत पहिला क्रमांक पटकावला आहे.
मुख्य निवडणूक अधिकारी (CEO) कार्यालयाच्या अधिकृत आकडेवारीनुसार, ३१ ऑगस्ट रोजी प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली होती. या यादीत ९,७८,५४,०४९ मतदारांपैकी ७,७१,६५,५६२ मतदार समाविष्ट केले गेले, तर २,०६,८८,४८७ म्हणजेच २१.१४ टक्के मतदारांना अनुपस्थित, स्थलांतरित, मृत किंवा दुबार (ASDDO) श्रेणीत ठेवण्यात आले होते.
या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने विशेष शिबिरांचे आयोजन करत नागरिकांना पुन्हा नोंदणी करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली. ३१ ऑगस्ट ते ४ ऑक्टोबर दरम्यान एकूण ६,२४,०५४ अर्ज प्राप्त झाले आहेत. यामध्ये नवीन मतदारांसाठी ६,०५,०९७ फॉर्म ६, नावावर आक्षेप किंवा वगळण्यासाठी ११,२५१ फॉर्म ७ आणि कार्डावरील दुरुस्तीसाठी ७,७०६ फॉर्म ८ अर्जांचा समावेश आहे.
जिल्हावार आकडेवारीनुसार पुण्यात सर्वाधिक ५६,६०५ अर्ज आले असून त्याखोआप ठाण्यात ४६,३७३, मुंबई उपनगरमध्ये ३८,०९४, नाशिकमध्ये ३२,६९१ आणि जळगावमध्ये २८,३९७ अर्ज प्राप्त झाले आहेत. नागपूरमध्ये १६,००९, मुंबई शहरात १३,८५८ आणि पालघरमध्ये १४,४४८ अर्ज आले आहेत. तर सिंधुदुर्ग जिल्ह्यात सर्वात कमी २,३९४ अर्ज नोंदवले गेले.
दरम्यान, हरकती आणि दावे नोंदवण्याची मुदत १२ ऑक्टोबरपर्यंत वाढवण्यात आली असून, १२ नोव्हेंबरपर्यंत अर्जांची छाननी केली जाईल. त्यानंतर १६ नोव्हेंबर रोजी अंतिम मतदार यादी जाहीर केली जाणार आहे.