मालिक असगर हाशमी
दिल्लीच्या रस्त्यांवर कधीकाळी कुटुंबाचं पोट भरण्यासाठी रात्रंदिवस उबरची टॅक्सी पळवणारा एक तरुण आज भारतीय लष्कराच्या रोइंग (नौकानयन) संघाचा महत्त्वाचा शिपाही बनलाय. उत्तर प्रदेशातील अमेठीच्या एका छोट्याशा गावातून आलेला हा २९ वर्षांचा तरुण, म्हणजेच सलमान खान. कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी कधीकाळी स्टिअरिंग व्हीलवर हात ठेवणारा हा मुलगा आता २०२६ च्या एशियन गेम्समध्ये भारतासाठी पदक जिंकण्याच्या तयारीला लागलाय.
त्याची ही यशोगाथा काही एका रात्रीत घडलेली नाही. त्यामागे वडिलांचे अचानक गेलेले छत्र, १८ व्या वर्षी खांद्यावर आलेली घराची जबाबदारी, आर्थिक तंगी, सैन्यात भरती होण्याचे अपूर्ण राहिलेले स्वप्न अन् शेवटी कल्पनेतही नसलेल्या खेळात मारलेली गरुडझेप असा एक मोठा संघर्ष दडलाय.
अमेठी जिल्ह्यातील खैरहाना जवळील पुरे धिंगाई हे सलमानचे मूळ गाव. बालपण तसं खडतरच गेलं. वडील मोहम्मद कासिम खान हे हरियाणातील तावडे येथे ट्रक निर्मितीच्या कामात होते, जिथे सलमानचे शालेय शिक्षण पूर्ण झाले. चार भाऊ आणि दोन बहिणींमध्ये सलमान हा सर्वात मोठा.
वय अवघं १८ वर्षे असताना डेंग्यूने वडिलांचा बळी घेतला. डोक्यावरचे सावलीचे छत्र हरपले आणि अचानक कुटुंबाचा सगळा भार सलमानच्या कोवळ्या खांद्यावर आला. लहान भावंडे अजून शिकत होती. परिस्थितीअभावी सैन्यात भरती होण्याचे त्याचे स्वप्न बाजूला पडले. घराला आधार देण्यासाठी तो दिल्लीत आला अन् हातात टॅक्सीचे स्टिअरिंग धरले.
एका फोन कॉलने बदलले नशीब!
दिल्लीत टॅक्सी चालवणे ही सलमानसाठी केवळ एक नोकरी नव्हती, तर ती त्याच्या कुटुंबाची गरज होती. तो दिवस-रात्र रस्ते तुडवत होता. सैन्यात जाण्याचे स्वप्न गर्दीत कुठेतरी हरवून गेले होते.
अशातच एका दिवशी, ड्युटी संपवून विश्रांती घेत असताना त्याच्या एका जवळच्या मित्राचा फोन आला. मित्राने त्याच्या उंच आणि दणकट शरीराची आठवण करून देत सैन्याच्या भरतीसाठी पुन्हा प्रयत्न करण्याचा सल्ला दिला.
त्या एका फोनने सलमानच्या मनात राखेत दबलेला निखारा पुन्हा पेटवला. त्याने टॅक्सी दुसऱ्या ड्रायव्हरकडे सोपवली आणि चार महिने दिवस-रात्र भरतीची तयारी केली. मैदानी चाचणी, वैद्यकीय तपासणी आणि लेखी परीक्षा उत्तीर्ण करत, २५ सप्टेंबर २०१८ रोजी तो पुण्यातील खडकी येथील बॉम्बे इंजिनिअर ग्रुप (BEG) मध्ये भारतीय लष्करात भरती झाला.
नौकानयनाच्या विश्वात अनपेक्षित प्रवेश
सैन्यात दाखल झाल्यावर सलमानच्या आयुष्याला एक नवीनच वळण मिळाले. ट्रेनिंग सेंटरवर त्याच्या शरीरयष्टीचा आणि उंचीचा अंदाज घेऊन प्रशिक्षकांनी त्याला रोइंग या जलक्रीडेशी ओळख करून दिली.
सलमानला या खेळाबद्दल फारशी माहिती नव्हती. सुरुवातीला त्याला यात अजिबात रस नव्हता. बिकट परिस्थितीमुळे खेळ त्याच्यासाठी कधीच प्राधान्याचा विषय नव्हता. त्याने या खेळापासून दूर पळण्याचा प्रयत्नही केला. पण प्रशिक्षकांनी त्याच्यातील सुप्त गुण ओळखले आणि त्याला पाण्यात उतरवले. तिथूनच त्याच्या आयुष्याचा एक नवा अध्याय सुरू झाला. पहिल्याच अंतर-केंद्र नौकानयन स्पर्धेत रौप्य पदक जिंकून सलमानचा आत्मविश्वास उंचावला. आपण नावडत्या खेळातही प्रगती करू शकतो, याची त्याला जाणीव झाली.
खरा बदल २०२१ मध्ये झाला. एर्गोमीटरच्या निकषांनुसार त्याची निवड सीएमई पुणे येथील 'आर्मी रोइंग नोड'साठी झाली. देशातील अव्वल रोव्हर्ससोबत सराव करताना त्याच्यासमोर एक नवे जग खुले झाले. रोइंग ही केवळ लष्करातली एक अॅक्टिव्हिटी नसून ते एक व्यावसायिक क्रीडा करिअर बनू शकते, हे त्याला समजले.
कुटुंब अन् मार्गदर्शकांचे बळ
सलमान आपल्या कुटुंबाला, विशेषतः आईच्या प्रार्थनांना आपली सर्वात मोठी ताकद मानतो. त्याची पत्नी साहिबा खातून ही सुद्धा त्याच्या या प्रवासात भक्कम ढाल बनून उभी राहिली.
रोइंगच्या सुरुवातीच्या दिवसांत अनेकदा असा प्रसंग आला की त्याने खेळ सोडण्याचा विचार केला. त्या कठीण काळात त्याचे ट्रेनिंग ऑफिसर मेजर नागेंद्र हुड्डा त्याच्या पाठीशी उभे राहिले. आर्मी रोइंग नोडचे कमांडिंग ऑफिसर कर्नल रामकृष्णन यांनीही त्याला सातत्याने प्रोत्साहन दिले. अखेर प्रशिक्षकांनी त्याची प्रतिभा ओळखली आणि त्याला भारतीय राष्ट्रीय संघात स्थान मिळाले.
यशाची तुफान घोडदौड
यानंतर सलमानच्या यशोगाथेत नवनवीन पदके जोडली गेली. २०२२ मध्ये गुजरात येथे झालेल्या ३६ व्या राष्ट्रीय खेळांमध्ये त्याने सुवर्णपदक जिंकले. २०२३ च्या सिनियर नॅशनल चॅम्पियनशिपमध्ये ऑलम्पियन दत्तू भोकनाळला मागे टाकत त्याने सिंगल स्कल्स प्रकारात सुवर्णपदकावर नाव कोरले. या कामगिरीनंतर भारतीय संघात त्याचे स्थान पक्के झाले.
२०२४ मध्ये दक्षिण कोरियातील एशियन रोइंग कपमध्ये नितीन देओल याच्या सोबतीने त्याने आपले पहिले आंतरराष्ट्रीय सुवर्णपदक जिंकले. या कामगिरीबद्दल त्याला भारतीय लष्करात नाईब सुभेदार पदावर पदोन्नती मिळाली. २०२५ च्या ऑस्ट्रेलियन रोइंग चॅम्पियनशिप आणि एशियन रोइंग चॅम्पियनशिपमधील रौप्य पदकांनी त्याचा एशियन गेम्सचा मार्ग अधिक सुकर केला.
दृष्टी २०२६ च्या 'एशियन गेम्स'वर
सलमानचे पूर्ण लक्ष आता २०२६ च्या एशियन गेम्सवर केंद्रित आहे. बलराज पंवार, सतनाम सिंग आणि जकार खान यांच्यासोबत तो भारताच्या 'मेन्स क्वाड्रपल स्कल्स' संघाचा महत्त्वाचा भाग आहे. या क्रीडा प्रकारात केवळ एका खेळाडूची ताकद पुरेशी नसते. चारही रोव्हर्सना तालात अन् सुरात नाव पुढे न्यावी लागते. एकाची छोटीशी चूकही पूर्ण बोटीचा वेग मंदावू शकते.
सलमानच्या मते, सततच्या सरावामुळे संघात उत्तम समन्वय निर्माण झालाय. हे चौघे एकत्र राहतात, सराव करतात आणि शर्यतीचे व्हिडिओ पाहून चुका सुधारतात. २००० मीटरच्या शर्यतीत आपापसात बोलायला वेळ नसतो. स्ट्रोक मॅन छोट्या तांत्रिक सूचना देतो. काही वेळा वेग बदलावा लागतो, तर काही वेळा स्ट्रोकची लांबी सांभाळावी लागते. उरलेला समन्वय बोटीच्या हालचालींवरून आपोआप साधला जातो.
जसपिंदर सिंग याच्यासोबत व्हिएतनाममध्ये मिळवलेले रौप्य पदक सलमानसाठी मोलाचे ठरले. या कामगिरीने आशियातील सर्वोत्तम खेळाडूंशी दोन हात करण्याचा आत्मविश्वास त्याला दिला.
अंगाचा तीळ तीळ तुटणारा सराव!
सध्या त्याच्या सरावाचा पूर्ण भर रेसचा वेग आणि तांत्रिक अचूकतेवर आहे. सलमानची रोजची दिनचर्या अत्यंत कठीण आहे. पहाटे ५ वाजता पाण्यात सराव सुरू होतो, ज्यामध्ये २० किलोमीटरचा तांत्रिक आणि ॲरोबिक सराव समाविष्ट असतो. त्यानंतर नाश्ता, विश्रांती आणि व्हिडिओ विश्लेषणाचा तास असतो.
सकाळी ११ वाजता तो ताकद आणि कोर स्नायू मजबूत करण्यासाठी जिममध्ये जातो. दुपारनंतर पुन्हा पाण्यात दुसरा सराव सुरू होतो. संध्याकाळचा सराव हा वेग आणि रेसच्या पेसवर केंद्रित असतो. पुढच्या दिवशीच्या दोन कठीण सरावांसाठी शरीर तयार राहावे म्हणून तो रात्री लवकर झोपण्याचा प्रयत्न करतो.
रोइंगमध्ये केवळ हाताची ताकद पुरेशी नसते. फुप्फुसाची कार्यक्षमता, पायांची ताकद आणि शरीराचा समतोल तितकाच महत्त्वाचा असतो. त्यामुळे जिम आणि कंडिशनिंगवर विशेष भर दिला जातो.
या कडक दिनचर्येत त्याचे शरीर दररोज ४,५०० ते ५,००० कॅलरीज वापरते. त्याच्या आहारात ओट्स, भात, रताळे यांसारख्या कर्बोदकांसह अंडी, चिकन आणि व्हे प्रोटीनचा समावेश असतो. लांबच्या सरावादरम्यान इलेक्ट्रोलाइट्सचा वापर केला जातो. साई (SAI TOPS) योजनेच्या पाठिंब्यामुळे त्याच्या विशेष आहाराच्या आणि सप्लीमेंट्सच्या गरजा पूर्ण होण्यास मदत झाली आहे.
खडतर बालपणाने दिलेली शिकवण
लहानपणी सोसलेल्या संघर्षाने मानसिक ताकद दिल्याचे सलमान सांगतो. वयाच्या १८ व्या वर्षी घराची जबाबदारी पेलल्यामुळे खेळातील दडपण त्याला फार मोठे वाटत नाही.
शर्यतीदरम्यान तो स्वतःच्या रणनीतीवर लक्ष केंद्रित करतो. शेजारच्या ट्रॅकवर काय चाललेय याचा विचार न करता टप्प्याटप्प्याने आपली कामगिरी पूर्ण करण्याचा त्याचा प्रयत्न असतो. भारताची जर्सी अंगावर चढवणे हा त्याच्यासाठी एक वेगळाच अनुभव असतो. एका सामान्य गावातून येऊन देशाचे प्रतिनिधित्व करणे ही मोठी जबाबदारी असल्याचे तो मानतो.
एशियन गेम्स ते ऑलिम्पिकचा प्रवास
एशियन गेम्सनंतर ऑलिम्पिकवर निशाणा साधण्याचा सलमानचा विचार आहे. वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये खेळून ऑलिम्पिकचा कोटा मिळवणे आणि देशासाठी ऑलिम्पिक पदक जिंकणे हे त्याचे स्वप्न आहे.
त्याच्या प्रवासाचा आणखी एक महत्त्वाचा पैलू म्हणजे सामान्य आर्थिक आणि सामाजिक पार्श्वभूमीतून येणाऱ्या तरुणांनी त्याच्या गोष्टीवरून प्रेरणा घ्यावी. कष्टाने अन् शिस्तीने आयुष्याची दिशा बदलता येते, हा विश्वास त्याला तरुणांमध्ये जगायचा आहे.
उबर टॅक्सीच्या स्टिअरिंगपासून सुरू झालेला सलमान खानचा हा प्रवास अजून थांबलेला नाही. कुटुंबाच्या जबाबदारीमुळे खेळाचे जग एकेकाळी दूर वाटत होते, पण रोइंगने त्याला थेट भारतीय संघात आणून बसवले. आता जपानच्या पाण्यावर, फक्त बोट वेगाने पळवणे एवढाच त्याचा हेतू नाही. चार खेळाडूंची ताकद, रणनीती आणि सामूहिक प्रयत्नांची पराकाष्ठा करत भारतीय तिरंगा उंचावत ठेवणे हेच त्याचे एकमेव ध्येय आहे.