मुंबईत बुरख्यावरून वाद: कूपर रुग्णालयात दोन महिलांना प्रवेश नाकारल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल

Story by  आवाज़ मराठी | Published by  Mrudgandha Dixit • 1 Months ago
मुंबईच्या कूपर रुग्णालयात बुरखा परिधान केलेल्या दोन महिलांना प्रवेश नाकारल्याच्या घटनेचा व्हायरल झालेला व्हिडिओ
मुंबईच्या कूपर रुग्णालयात बुरखा परिधान केलेल्या दोन महिलांना प्रवेश नाकारल्याच्या घटनेचा व्हायरल झालेला व्हिडिओ

 

मुंबई 

मुंबई महानगरपालिका संचलित (BMC) कूपर रुग्णालयात बुरखा परिधान केलेल्या दोन महिलांना प्रवेश नाकारण्यात आल्याचा प्रकार समोर आल्याने मोठी चर्चा सुरू झाली आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका व्हिडिओमध्ये सुरक्षारक्षकांनी महिलांना बुरखा काढून रुग्णालयात प्रवेश करण्यास सांगितल्याचा दावा केला जात असून, यामुळे एका नवीन वादाला तोंड फुटले आहे.

सोमवारी सोशल मीडियावर समोर आलेल्या या व्हिडिओनुसार, वकील झहरा शेख आणि त्यांची मैत्रीण एका नातेवाईकाला भेटण्यासाठी कूपर रुग्णालयात गेल्या असताना त्यांना प्रवेशद्वारावर रोखण्यात आले. व्हिडिओमध्ये झहरा शेख या बुरखा काढण्याच्या मागणीवर तीव्र आक्षेप घेताना दिसत आहेत. हा प्रकार त्यांच्या स्वाभिमानाचे, गोपनीयतेचे आणि धार्मिक स्वातंत्र्याच्या संवैधानिक अधिकाराचे उल्लंघन असल्याचे त्यांनी युक्तिवादात म्हटले आहे. त्यांच्यासोबत असलेल्या एका व्यक्तीने हा संपूर्ण प्रकार मोबाईलमध्ये रेकॉर्ड केला, जो नंतर सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला.

सुरक्षेची कारणे आणि सोशल मीडियावरील प्रतिक्रिया

रुग्णालयाच्या प्रवेशद्वारावर अभ्यागतांची ओळख पटवण्यासाठी आणि सुरक्षेच्या तसेच बालकांच्या चोरीच्या घटना रोखण्याच्या उद्देशाने ही खबरदारी घेण्यात आल्याचे सुरक्षारक्षकांकडून सांगण्यात आल्याची चर्चा आहे. दरम्यान, या घटनेबाबत किंवा बुरखा काढण्याच्या मागणीमागील नेमक्या परिस्थितीबाबत रुग्णालयाकडून तात्काळ कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही. तसेच या प्रकरणी अद्याप कोणतीही पोलीस तक्रार नोंदवण्यात आलेली नाही. मात्र, रुग्णालयांमध्ये विशिष्ट पोषाख किंवा धर्म पाहून अभ्यागतांवर निर्बंध लादले जावेत का, यावर सोशल मीडियावर विविध प्रतिक्रिया उमटत आहेत.



Latest News