न्युयॉर्क
अमेरिकेतील इलिनॉय येथील एका हिंदू मंदिरावर गोळीबार करून मोठा नरसंहार घडवण्याचा कट सुरक्षा यंत्रणांनी उधळून लावला आहे. या घटनेनंतर अमेरिकेच्या शीर्षस्थानी असलेल्या अनेक खासदारांनी, नेत्यांनी आणि नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला असून, देशात वाढत चाललेल्या भारतविरोधी आणि हिंदूविरोधी पूर्वग्रहांचा मुकाबला करण्याचे आवाहन केले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पालाटिन येथील १९ वर्षीय अलेक्झांडर पापोराकिस याने ११ ऑक्टोबर रोजी ऑरोरा परिसरातील हिंदू मंदिरात हा हल्ला घडवण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, मंदिराबाहेर त्याच्या रायफलमध्ये तांत्रिक बिघाड झाल्यामुळे त्याचा हा कट फसला आणि त्याला माघारी जावे लागले. याप्रकरणी १४ ऑक्टोबर रोजी न्यायालयात सुनावणी झाली असून त्याच्यावर दहशतवादी धमकी देणे आणि बेकायदेशीर शस्त्र बाळगल्याप्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
इलियनॉयमधील भारतीय वंशाचे अमेरिकी खासदार राजा कृष्णमूर्ती यांनी सांगितले की, ज्यावेळी हा हल्ला करण्याचा प्रयत्न झाला, त्यावेळी ते आणि त्यांचे कुटुंब याच मंदिरात उपस्थित होते. व्हाईट सुप्रिमेसी आणि भारतविरोधी द्वेष किती धोकादायक बनला आहे, याची ही अत्यंत गंभीर साक्ष असल्याचे ते म्हणाले.
सिनेटचे डेमोक्रॅटिक नेते चक शूमर, खासदार ब्रॅड शर्मन, अमि बेरा, श्री थानेदार आणि इतर अनेक दिग्गजांनी या घटनेचा तीव्र निषेध केला आहे. अमेरिकेत कोणत्याही समुदायाविरोधातील धार्मिक व वांशिक द्वेषाला स्थान नसून नागरिकांना आपल्या श्रद्धेनुसार जगण्याचा पूर्ण अधिकार असल्याचे नेत्यांनी स्पष्ट केले. साऊथ आशियाई्स फॉर अमेरिका (SAFA) सह विविध संघटनांनीही या प्रकरणाची सखोल चौकशी करून दहशतवादी गुन्ह्यांतर्गत कारवाई करण्याची मागणी केली आहे.