नवी दिल्ली
भारत आणि युरोपियन युनियनने (EU) शुक्रवारी नवी दिल्ली येथे परराष्ट्र धोरण आणि सुरक्षाविषयक महत्त्वाच्या बैठकीत सीमापार दहशतवादासह सर्व प्रकारच्या दहशतवादाचा आणि हिंसक अतिरेकी कारवायांचा एकमुखी व तीव्र शब्दांत निषेध केला. तसेच आंतरराष्ट्रीय कायदा आणि संयुक्त राष्ट्रांच्या सनदेतील (UN Charter) तत्त्वांनुसार युक्रेनमध्ये सर्वसमावेशक, न्याय्य आणि चिरस्थायी शांतता प्रस्थापित करण्याची गरज दोन्ही बाजूंनी अधोरेखित केली.
काळ्या समुद्रातील नौवहन स्वातंत्र्य आणि इंडो-पॅसिफिक सहकार्य नवी दिल्लीत पार पडलेल्या भारत-युरोपियन युनियन परराष्ट्र धोरण आणि सुरक्षा सल्लामसलत (FPSC) बैठकीच्या १२ व्या फेरीत जागतिक अन्नसुरक्षेवरील नकारात्मक परिणाम कमी करण्यासाठी काळ्या समुद्रातील (Black Sea) नौवहन स्वातंत्र्य पुन्हा प्रस्थापित करण्याच्या गरजेवर दोन्ही बाजूंनी विचारविनिमय केला. परराष्ट्र मंत्रालयाचे सचिव (पश्चिम) सिबी जॉर्ज आणि युरोपियन बाह्य कृती सेवेचे (EEAS) राजकीय व्यवहार उपमहासचिव ओलोफ स्कूग यांनी या बैठकीचे सह-अध्यक्षपद भूषवले.
सध्याच्या भू-राजकीय परिस्थितीत बहुपक्षीयता आणि आंतरराष्ट्रीय कायद्यासमोर आव्हाने उभी असताना, संयुक्त राष्ट्रांची सनद आणि सार्वभौमत्व व प्रादेशिक अखंडतेच्या नियमांचे पालन करण्याच्या आपल्या ठाम वचनबद्धतेचा दोन्ही बाजूंनी पुनरुच्चार केला. तसेच आंतरराष्ट्रीय कायदा आणि वादांचे शांततापूर्ण निराकरण यावर आधारित मुक्त, खुले, शांततापूर्ण आणि समृद्ध इंडो-पॅसिफिक क्षेत्रासाठी अधिक जवळून समन्वय साधण्याचे महत्त्व त्यांनी अधोरेखित केले.
संरक्षण भागीदारी आणि 'टुवर्ड्स २०३०' धोरणात्मक अजेंडा जानेवारीमध्ये १६ व्या भारत-युरोपियन युनियन शिखर परिषदेत स्वीकारलेल्या 'टुवर्ड्स २०३०: संयुक्त भारत-युरोपियन युनियन सर्वसमावेशक धोरणात्मक अजेंडा'च्या अनुषंगाने द्विपक्षीय संबंधांतील मजबूत गतीचा आढावा घेण्यात आला. या अंतर्गत सागरी सुरक्षा, संरक्षण उद्योग व तंत्रज्ञान, सायबर आणि हायब्रिड धोके, अंतराळ आणि दहशतवादविरोधी सहकार्यावर सविस्तर चर्चा झाली.
मार्च महिन्यात नवी दिल्ली येथे झालेल्या पहिल्या सुरक्षा आणि संरक्षण संवादाचे दोन्ही बाजूंनी स्वागत केले असून 'भारत-ईयू माहिती सुरक्षा करारा'ला (Security of Information Agreement) अंतिम रूप देण्याच्या प्रगतीची नोंद घेतली. पुढील वर्षी या सुरक्षा आणि संरक्षण संवादाची दुसरी आवृत्ती आयोजित करण्याचे तसेच नेत्यांच्या स्तरावरील आगामी बैठकांच्या तयारीचा आढावा घेत पुढील एफपीएससी (FPSC) बैठक ब्रुसेल्स येथे घेण्याचे या बैठकीत निश्चित करण्यात आले.