कार्तिगई दीपम वाद: तामिळनाडूचे मुख्य सचिव, डीजीपी आणि मदुराई जिल्हाधिकाऱ्यांना सर्वोच्च न्यायालयाची अवमान नोटीस

Story by  आवाज़ मराठी | Published by  Mrudgandha Dixit • 14 m ago
एआय निर्मित इमेज
एआय निर्मित इमेज

 

नवी दिल्ली

तामिळनाडूतील कार्यकारी अधिकाऱ्यांनी आपल्या राजकीय नेत्यांच्या इशाऱ्यावरून कृती केल्याचे ताशेरे ओढत सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी २० नोव्हेंबरच्या कार्तिगई दीपम आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी तामिळनाडूचे मुख्य सचिव, पोलीस महासंचालक (DGP), मदुराईचे जिल्हाधिकारी आणि इतरांना अवमान नोटीस बजावली आहे. तसेच अरुल्मिगु सुब्रमण्यस्वामी मंदिराचे विश्वस्त मंडळ निलंबित करून उच्चैपिल्लैयार मंडपम येथे प्रज्वलित केलेल्या ज्योतीचा वापर करून शनिवारी तिरुप्परंकुंद्रम दीपथून येथे दिवा लावण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.

मुख्य सचिवांना वैयक्तिक हजेरीचे आणि प्रतिज्ञापत्राचे निर्देश न्यायमूर्ती अरविंद कुमार आणि न्यायमूर्ती विपुल एम. पांचोली यांच्या खंडपीठाने तामिळनाडूच्या मुख्य सचिवांना न्यायालयात वैयक्तिकरीत्या हजर राहण्याचे निर्देश दिले असून अधिकाऱ्यांमध्ये झालेले ईमेल्स, फोन कॉल्स आणि संदेशांचा सविस्तर तपशील प्रतिज्ञापत्राद्वारे सादर करण्यास सांगितले आहे. "न्यायालयाच्या आदेशांचे जाणीवपूर्वक उल्लंघन करणे, विशेषतः कार्यकारी अधिकाऱ्यांकडून होणे दुर्लक्षित केले जाऊ शकत नाही आणि ते कठोर हाताने हाताळले पाहिजे," असे खंडपीठाने स्पष्ट केले.

मंदिर आणि टेकडीची सुरक्षा सीआरपीएफकडे आपल्या आदेशाची अंमलबजावणी करण्यात तामिळनाडू पोलीस अपयशी ठरल्याचे नमूद करत सर्वोच्च न्यायालयाने अरुल्मिगु सुब्रमण्यस्वामी मंदिर आणि तिरुप्परंकुंद्रम टेकडीची सुरक्षा केंद्रीय राखीव पोलीस दलाकडे (CRPF) सोपवली आहे. आपल्या आदेशाचे पालन होत नसेल तर न्यायालय गप्प बसू शकत नाही; न्यायालयाचा आदेश म्हणजे वाटाघाटींचे निमंत्रण नसून तो राज्य सरकार, अधिकारी आणि प्रत्येक धार्मिक संस्थेवर बंधनकारक आहे, असे न्यायालयाने सुनावले. कितीही उच्चपदस्थ व्यक्ती असली तरी न्यायप्रवाहात अडथळा आणण्याचा कोणताही प्रयत्न खपवून घेतला जाणार नाही, असा इशाराही खंडपीठाने दिला.

प्रशासकीय गोंधळावर न्यायालयाचे ताशेरे अधिकाऱ्यांचे वर्तन प्रथमदर्शनी तामिळनाडूमध्ये प्रशासकीय गोंधळाची स्थिती असल्याचे दर्शवते, असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले. रेकॉर्डवरून दिसून येणारे वर्तन हे न्यायालयाच्या आदेशाची उघड आणि जाणीवपूर्वक अवज्ञा असून उच्च न्यायालयासमोर दिलेल्या हमीचा भंग करणारे आहे, असे खंडपीठाने नमूद केले.

यापूर्वी बुधवारी तामिळनाडू सरकारने दीपथून येथे पारंपरिक दिवा न लावल्याबद्दल सर्वोच्च न्यायालयाची माफी मागितली होती आणि त्यासाठी अरुल्मिगु सुब्रमण्यस्वामी मंदिर प्रशासनाला जबाबदार धरले होते. सर्वोच्च न्यायालयाची परवानगी असूनही २४ नोव्हेंबर रोजी तिरुप्परंकुंद्रम येथील पारंपरिक उच्चिपिल्लैयार मंडपम येथेच कार्तिगई दीपम लावण्यात आला होता, मात्र दीपथून येथे दिवा लावण्यात आला नव्हता.



Latest News