लोकसभा ३० नोव्हेंबरला, तर राज्यसभा २ डिसेंबरला भरणार; ३ डिसेंबरपर्यंत चालणार विशेष कामकाज

Story by  आवाज़ मराठी | Published by  Mrudgandha Dixit • 22 m ago
प्रातिनिधिक इमेज
प्रातिनिधिक इमेज

 

नवी दिल्ली 

महिला आरक्षणाची अंमलबजावणी परिसीमनाशी (मतदारसंघ पुनर्रचना) जोडणारी घटनादुरुस्ती सरकार पुन्हा सादर करण्याची शक्यता असतानाच, 'अत्यावश्यक' सरकारी कामकाज पूर्ण करण्यासाठी ३० नोव्हेंबरपासून संसदेची विशेष बैठक बोलवण्यात आली आहे. या बैठकीत लोकसभेचे कामकाज ३० नोव्हेंबरपासून तर राज्यसभेचे कामकाज २ डिसेंबरपासून सुरू होणार असून ३ डिसेंबर २०२६ रोजी या बैठकांचे सूप वाजणार आहे.

लोकसभा अध्यक्ष आणि राज्यसभा सभापतींचे निर्देश संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी गुरुवारी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला आणि राज्यसभेचे सभापती सी. पी. राधाकृष्णन यांना दोन्ही सभागृहे पुन्हा बोलवण्याची विनंती केली होती. त्यानंतर दोन्ही सभागृहांच्या पीठासीन अधिकाऱ्यांनी स्वतंत्र निर्देश जारी केले. १३ ऑगस्ट रोजी संसदेचे पावसाळी अधिवेशन अनिश्चित काळासाठी तहकूब (sine die) करण्यात आले होते, मात्र सत्रसमाप्ती (prorogue) झाली नव्हती; त्यामुळे ही विशेष बैठक पावसाळी अधिवेशनाचाच विस्तार असणार आहे. या पार्श्वभूमीवर शुक्रवारी केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठकही बोलवण्यात आली असून त्यात परिसीमन आणि महिला आरक्षणावर चर्चा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

पंतप्रधान मोदींची प्रतिक्रिया आणि एप्रिलमधील पराभव गुरुवारी विविध वर्तमानपत्रांत प्रसिद्ध झालेल्या लेखात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एप्रिलमध्ये लोकसभेत पराभूत झालेल्या 'संविधान (१३१ वी सुधारणा) विधेयक, २०२६' वरून विरोधी पक्षावर जोरदार टीका केली. महिलांना विधिमंडळात ३३ टक्के आरक्षण देणारे हे विधेयक एका विरोधी पक्षाने संमत होऊ दिले नाही, असे म्हणत "भारताच्या 'नारी शक्ती'ला न्याय मिळवून देण्यापासून कोणतीही शक्ती आम्हाला रोखू शकत नाही," असा निर्धार मोदी यांनी व्यक्त केला.

संसदेतील बदललेले संख्याबळ आणि नवे सूत्र २०२९ च्या सार्वत्रिक निवडणुकांपूर्वी संसद आणि राज्य विधानसभांमध्ये ३३ टक्के महिला आरक्षण लागू करण्यासाठी लोकसभेची सदस्यसंख्या ५४३ वरून कमाल ८५० पर्यंत वाढवण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. एप्रिलमध्ये पुरेशा संख्याबळाअभावी विधेयक संमत होऊ शकले नव्हते. ५४३ सदस्यसंख्येच्या (सध्या तीन जागा रिक्त असल्याने ५४० सदस्य) लोकसभेत घटनादुरुस्ती विधेयकासाठी दोन-तृतीयांश बहुमत म्हणजेच ३६१ मतांची आवश्यकता असते. सत्ताधारी एनडीएकडे सुमारे ३२० सदस्य आहेत.

एप्रिलनंतर विरोधी गटातील २६ खासदार बाहेर पडल्याने राजकीय समीकरणे बदलली आहेत. तृणमूल काँग्रेसच्या २० बंडखोर खासदारांनी वेगळे होत 'नॅशनलिस्ट सिटिझन्स पार्टी ऑफ इंडिया'मध्ये (NCPI) विलीन होऊन एनडीएला पाठिंबा दिला आहे, तर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे सहा खासदार एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत सामील झाले आहेत. तरीही बहुमताचा आकडा गाठण्यासाठी सरकारला अतिरिक्त पाठिंब्याची गरज असून २२ खासदार असलेला द्रमुक (DMK) आणि आठ खासदार असलेला राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) या पक्षांची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे. दुसरीकडे, मतदार याद्यांच्या विशेष पुनरीक्षणाविरोधात (SIR) आणि मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीवरून विरोधक आक्रमक होण्याची शक्यता असल्याने अधिवेशन वादळी ठरू शकते. दरम्यान, दक्षिणेकडील राज्यांच्या चिंता दूर करण्यासाठी १९७१ च्या जनगणनेनुसार राज्यांचा जागांचा वाटा कायम ठेवत सर्व राज्यांत लोकसभेच्या जागा ५० टक्क्यांनी वाढवण्याच्या सूत्रावर सरकार विचार करत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.