मृदगंधा दीक्षित
सोलापूरच्या मातीत एक असा अवलिया तरुण कलाकार घडतोय, ज्याने अभिनयाच्या आणि आवाजाच्या दुनियेत स्वतःचा वेगळाच रस्ता तयार केलाय. त्याचं नाव आहे जैद हसन. वयाच्या अवघ्या विशी-पंचविशीत या पोराने जे काही मिळवलंय, ते थक्क करणारं आहे. नॅशनल लेव्हलचं गोल्ड मेडल, १५०० हून अधिक व्हॉइस-ओव्हर प्रोजेक्ट्स, स्वतःच्या संकल्पनेतून उभे केलेले 'साहीर' आणि 'रश्मिरथी'सारखे भव्य प्रयोग आणि आता साऊंड इंजिनिअरिंगच्या दिशेने टाकलेलं पाऊल... जैदच्या या प्रवासाविषयी..
'तुझ्या आईला'चा तो टर्निंग पॉईंट
जैद लहानपणी तसा खूप नाजूक. सतत आजारी पडायचा, त्यामुळे बरेचदा दवाखान्यात ॲडमिट असायचा. मुक्या मनाने तो पडून असायचा आणि मग त्याला जेवण जावं, तो रमावा म्हणून त्याची आई त्याला छान छान गोष्टी सांगायची. या गोष्टींनी त्याच्यात कल्पनाशक्तीची बीजे रोवली. सातवी-आठवीपर्यंत जैद भयंकर आत्मकेंद्रित होता. त्याला अभ्यासात फारसा रस नव्हता. शाळेत गणपतीच्या वगैरे कार्यक्रमात तो लोकांचे, प्राण्यांचे आवाज काढायचा, त्यातून त्याला काही मोजके मित्र मिळाले.
आठवीत असताना त्याच्या आयुष्यात टर्निंग पॉईंट आला. सुजय डहाके दिग्दर्शित 'तुझ्या आईला' या सिनेमात त्याला 'चांद' नावाची मध्यवर्ती भूमिका मिळाली. सोलापूरच्या या लाजाळू मुलाला सलग पाच महिने आई-वडिलांशिवाय पुण्यात शूटिंगसाठी राहावं लागलं. वडील व्यवसाय सोडून येऊ शकत नव्हते आणि आईला दोन मुलींची जबाबदारी होती. जैदने धाडस केलं आणि तो एकटा राहिला. ते पाच महिने त्याच्यासाठी कठीण होते, पण तिथूनच तो खऱ्या अर्थाने फुलला, मोकळ्या स्वभावाचा झाला.
दहावीला ५६ टक्के ते राष्ट्रीय स्तरावरचं 'गोल्ड मेडल'
सिनेमाच्या शूटिंगमुळे अभ्यासाला फटका बसला. दहावीत त्याला जेमतेम ५६ टक्के मिळाले. घरचे काळजीत पडले, पण इथेही त्याला गणेश मूडेगांवकर या शिक्षकांनी आधार दिला. त्यांनी त्याला कॉमर्सला ॲडमिशन मिळवून दिलं, पण अट एकच ठेवली, "कॉलेजचं नाव मोठं करायचं!"
ॲडमिशनच्या पहिल्याच आठवड्यात महाराष्ट्र शासनाच्या 'पु. ल. देशपांडे स्टँडअप कॉमेडी स्पर्धेत' त्याने भाग घेतला, तो जिल्ह्यात पहिला आला आणि त्याला २० हजार रुपयांचं पहिलं मोठं बक्षीस मिळालं. इथून पुढे बक्षिसांची जी रांग लागली ती थांबलीच नाही. जैदने एकांकिका आणि मिमिक्रीमध्ये 'AIU नॅशनल युथ फेस्टिव्हल'मध्ये राष्ट्रीय स्तरावरचं सुवर्णपदक पटकावलं. सोलापूर विद्यापीठाच्या इतिहासात एकांकिकेत नॅशनल गोल्ड आणणारा तो पहिलाच. विद्यापीठाने त्याला ‘गोल्डन बॉय’ म्हणून गौरवलं.
वेगळी वाट निवडण्याची जिद्द
जैदच्या घरातच थोडंफार कलेचं बाळकडू होतं. त्याचे वडील स्वतः एकेकाळी नाटक करायचे. त्यांनी सोलापुरातला पहिला कॉम्प्युटराइज्ड स्टुडिओ सुरू केला होता. मोठे कलाकार तिथे यायचे, त्यांच्या रेकॉर्डिंग्ज ऐकून, त्यांना ऑब्झर्व्ह करून जैद खूप काही शिकला. पुढे साहिर नदाफ सरांकडून तो नाटकाला म्युझिक द्यायला शिकला. दहावीत असताना 'भूमिका' या नाटकाला पहिल्यांदा एकट्याने म्युझिक देण्याची वेळ आली तेव्हा जैद घाबरला होता. तेव्हा सरांनी त्याला दिलेला कानमंत्र तो आजही विसरलेला नाही. सर म्हणाले होते, "समंदर में गिरे बगैर तैरने आता है या नहीं, समझ नही पाओगे. उतरो!" आणि जैद खऱ्या अर्थाने या समुद्रात उतरला. आजवर २०० हून अधिक नाटकांच्या प्रयोगांना त्याने म्युझिक दिलंय.

मिमिक्री करतानाही तो इतर कलाकारांसारखी फक्त दादा कोंडके किंवा निळूभाऊंची मिमिक्री करत नाही. गर्दीचा भाग न होता स्वतःची वेगळी वाट निवडण्याबद्दल तो एका शेरातून आपली भूमिका मांडतो, "जहां जाते हैं सब वहां जाना अच्छा नहीं लगता, मुझे पामाल रास्तों का सफर अच्छा नहीं लगता।" (पामाल रस्ते म्हणजे रुळलेले रस्ते). याच विचारातून तो प्राणी, पक्षी, निसर्गाचे आवाज, वेदर, साऊंड इफेक्ट्स आणि वेगवेगळ्या वाद्यांचे आवाज काढतो. त्याच्या याच आवाजाच्या जादूमुळे त्याने आजवर १५०० हून अधिक व्हॉइस-ओव्हर प्रोजेक्ट्स आणि दोन सिनेमांचं डबिंग केलंय.
उर्दूची गोडी आणि 'साहीर', 'रश्मिरथी'चे अफलातून प्रयोग
लॉकडाऊनच्या काळात जैदने उर्दू शिकायचं ठरवलं. मीर अफझल मीर या शायराकडून तो उर्दू रसमुल्खत लिहायला-वाचायला शिकला. तिथेच त्याची ओळख साहीर लुधियानवीच्या लेखणीशी झाली. यावर अभ्यास करून जैदने 'साहिराना शायरी' नावाचा तीन तासांचा अप्रतिम कार्यक्रम बसवला.
त्यानंतर रामधारी सिंह दिनकर यांच्या 'रश्मिरथी' या महाकाव्यावर त्याने दोन तासांचा लाईव्ह कार्यक्रम बसवला. त्यात लाईव्ह कथ्थक, पखावज, व्हायोलिन अशा वाद्यांचा आणि नाट्यमय सादरीकरणाचा संगम आहे. जैद स्वतः उत्तम कविता लिहितो. त्याच्या 'लहू की पुकार' या हिंदी आणि 'बा पाऊसा' या मराठी कवितेला राज्यस्तरीय काव्यसंमेलनांमध्ये प्रथम क्रमांक मिळाले आहेत. नांदी १०० व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनातही त्याने युवा कवी म्हणून आपली कविता सादर केली. 'नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा' (NSD) ची प्राथमिक फेरी आणि इंटरव्ह्यू त्याने क्लिअर केला होता, पण अवघ्या काही पॉईंट्सनी त्याची संधी हुकली, पण त्याचा त्याला खेद नाही.
प्रोग्रेसिव्ह विचार, धर्म आणि माणुसकी
जैदच्या या सगळ्या जडणघडणीत त्याच्या कुटुंबाचा मोठा वाटा आहे. एका ऑर्थोडॉक्स मुस्लिम वातावरणातून येऊनही त्याच्या वडिलांनी मुलांवर कसलीही बंधनं लादली नाहीत. त्याला आणि त्याच्या बहिणींना ज्ञानप्रबोधिनीसारख्या शाळेत घातलं. करिअरमध्ये हवं ते करू दिलं. “माझे वडील माझे मित्रच आहेत”, असं जैद कौतुकाने सांगतो.
२००२ च्या सोलापूर दंगलीची एक आठवण त्याने वडिलांकडून ऐकली आहे. त्यावेळी दंगलखोर जेव्हा त्यांच्या स्टुडिओकडे आले, तेव्हा आजूबाजूला राहणाऱ्या हिंदू समाजाने स्टुडिओभोवती मानवी साखळी करून तो स्टुडिओ वाचवला होता. असल्या वातावरणात वाढल्यामुळे जैद धर्माच्या भिंती मानत नाही. सुफीझम, कबीर, मीरा आणि खुसरो यांच्या विचारांचा त्याच्यावर बराच प्रभाव आहे. धर्मापलीकडची माणुसकी जपणारा जैद म्हणतो, "हम गझल वाले मोहब्बत है हमारा मजहब, हमसे ये धर्म के नाम पे खून खराबा नही देखा जाता।"
आपल्या विचारांबद्दल तो अत्यंत स्पष्टपणे सांगतो की, "कलाकाराला धर्माच्या भिंती नसतात." कुराणविषयी बोलतानाही तो म्हणतो, "कुराणमधली पहिली आयत आहे 'इकरा'. इकरा म्हणजे 'पढो' (वाचा). त्याचा खरा अर्थ आहे जगभराचं ज्ञान घ्या. तुमच्या डोळ्यांवरची पट्टी काढा."
पुढे काय करणार?
अभिनय क्षेत्रात सध्या ऑडिशन्सपेक्षा ओळखी-पाळखीवर चालणारं राजकारण आणि त्यातली अनिश्चितता जैदने जवळून पाहिली आहे. म्हणूनच तो साऊंड इंजिनिअरिंगचा एक वर्षाचा व्यावसायिक अभ्यासक्रम मुंबईतून करणार आहे. आपल्या या निर्णयाविषयी बोलताना तो म्हणतो, "अभिनय क्षेत्रात आता खूप वणवा आहे. मला वाटतं की या सगळ्या वणव्यात टेक्निकल साईड अशी मजबूत असेल तर ती माझ्या दिव्याभोवतीच्या काचेचं काम करेल, म्हणजे कितीही वारा आला तरी तो दिवा विझू देणार नाही."
वयाच्या २५ व्या वर्षापर्यंत स्वतःचा कवितासंग्रह काढायचा आणि २८-२९ व्या वर्षापर्यंत स्वतःचा एक सिनेमा दिग्दर्शित करायचा, असं त्याचं ध्येय आहे. त्याने 'विठू माऊलीच्या दारी' या महाराष्ट्र शासनाच्या कार्यक्रमाचं दिग्दर्शन (११० कलाकारांचं नेतृत्व) केलंय आणि 'श्यामची आई'सारख्या चित्रपटात सहाय्यक दिग्दर्शक म्हणूनही काम पाहिलं आहे.
आजची पिढी व्यक्त होणं विसरत चालली आहे हे ओळखून जैद सोलापुरात 'Theatre and Expressive Arts' च्या कार्यशाळा घेतो. तरुणाईच्या या घुसमटीबद्दल तो म्हणतो, "एक्सप्रेस होणं आजच्या पिढीने सोडून दिलंय. जीवघेण्या स्पर्धेमुळे सगळेजण एकमेकांची झेरॉक्स कॉपी बनतायेत. पण आपली कला आपल्याला एक कलरफुल पेपर बनायची संधी देते, त्यामुळे स्वतःला एक्सप्रेस करणं खूप महत्त्वाचं आहे."
एकाच वेळी अभिनय, दिग्दर्शन, व्हॉइस-ओव्हर, मिमिक्री, लेखन आणि साऊंड इंजिनिअरिंग अशा अनेक आघाड्यांवर ताकदीने मुसंडी मारणारा हा तरुण खऱ्या अर्थाने नवतरुणाईचा एक आश्वासक चेहरा आहे, असंच म्हणावं लागेल.