दलाई लामा यांना लुटियन्स दिल्लीत शासकीय बंगला मंजूर; परराष्ट्र मंत्रालयाच्या विनंतीवरून निर्णय

Story by  आवाज़ मराठी | Published by  Mrudgandha Dixit • 38 m ago
प्रातिनिधिक इमेज
प्रातिनिधिक इमेज

 

नवी दिल्ली 

केंद्र सरकारने तिबेटी आध्यात्मिक नेते दलाई लामा यांना लुटियन्स दिल्लीतील पंडित रविशंकर शुक्ला लेन येथे एक शासकीय बंगला मंजूर केला असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. यासंदर्भात केंद्रीय गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालयाकडून अद्याप अधिकृत निवेदन आलेले नसले, तरी मंगळवारी या वाटपाबाबत माहिती समोर आली आहे.

परराष्ट्र मंत्रालयाच्या विनंतीवरून वाटप सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, परराष्ट्र मंत्रालयाने केलेल्या विनंतीनंतर दलाई लामा यांचे कार्यालय असलेल्या 'गादेन फोड्रंग ट्रस्ट'ला (Gaden Phodrang Trust) हा बंगला देण्यात आला आहे. असे शासकीय निवासस्थान सामान्यतः तीन वर्षांसाठी हस्तांतरित केले जाते आणि त्यामध्ये मुदतवाढ देण्याची तरतूद असते.

'गादेन फोड्रंग ट्रस्ट'चे कार्य गादेन फोड्रंग ट्रस्टच्या वेबसाइटनुसार, हा ट्रस्ट दलाई लामा यांची संस्था आणि त्यांचे आध्यात्मिक कार्य जपण्यासाठी तसेच त्यांचा मानवतावादी दृष्टिकोन पुढे नेण्यासाठी समर्पित आहे. मानवी मूल्यांचा प्रचार करणे, आंतरधर्मीय सलोखा वाढवणे, तिबेटी संस्कृती व ओळख जपणे, पर्यावरणाचे रक्षण करणे आणि प्राचीन भारतीय ज्ञानाचा सखोल आदर वाढवणे या दलाई लामा यांच्या प्रमुख उद्दिष्टांना ट्रस्ट पाठबळ देतो.