आयसीसी कसोटी क्रमवारीत पंत आणि गिलची आगेकूच, तर यशस्वी जैस्वालची अव्वल दहामध्ये एन्ट्री

Story by  आवाज़ मराठी | Published by  Mrudgandha Dixit • 34 m ago
प्रातिनिधिक इमेज
प्रातिनिधिक इमेज

 

दुबई 

न्यूझीलंडविरुद्धच्या अनिर्णित राहिलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात भारतीय फलंदाजांनी केलेल्या बहारदार कामगिरीचा मोठा फायदा बुधवारी जाहीर झालेल्या आयसीसी पुरुष कसोटी खेळाडूंच्या क्रमवारीत झाला आहे. या ताज्या क्रमवारीत ऋषभ पंत, शुभमन गिल आणि यशस्वी जैस्वाल या तिन्ही भारतीय फलंदाजांनी अव्वल १० मध्ये स्थान पटकावले आहे.

भारतीय फलंदाजांची आणि बुमराहची मोठी झेप वेलिंग्टन कसोटीत १२८ धावांची आकर्षक खेळी करणारा ऋषभ पंत एका स्थानाच्या सुधारणेसह सहाव्या क्रमांकावर पोहोचला असून तो भारताचा सर्वोच्च मानांकित फलंदाज कायम राहिला आहे. कसोटी कर्णधार शुभमन गिलने ९८ धावांच्या खेळीच्या जोरावर तीन स्थानांची प्रगती करत सातवे स्थान गाठले, तर डावखुरा सलामीवीर यशस्वी जैस्वाल ८५ धावांच्या खेळीमुळे पाच स्थानांनी वर सरकत नवव्या क्रमांकावर आला आहे.

भारताच्या ७ बाद ७२० घोषित या विशाल धावसंख्येत सर्वाधिक १३६ धावा करणारा सलामीवीर केएल राहुल चार स्थानांनी पुढे सरकून २५ व्या क्रमांकावर, तर ८० धावा करणारा देवदत्त पडिक्कल १५ स्थानांची झेप घेत ३९ व्या स्थानावर पोहोचला आहे. गोलंदाजांच्या क्रमवारीत वेलिंग्टन कसोटीत पाच बळी घेणारा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह तीन स्थानांच्या सुधारणेसह संयुक्तपणे दुसऱ्या क्रमांकावर विराजमान झाला आहे.

इतर संघांतील खेळाडूंची कामगिरी न्यूझीलंडकडून सामनावीर ठरलेला हेन्री निकोल्स (नाबाद १७५ आणि ३१ धावा) १० स्थानांनी वर येऊन ३० व्या क्रमांकावर, तर ग्लेन फिलिप्स (११८ आणि नाबाद २६ धावा) १३ स्थानांची झेप घेत कारकिर्दीतील सर्वोत्तम १७ व्या स्थानावर पोहोचला आहे.

दक्षिण आफ्रिका आणि बांगलादेश यांच्यातील पहिल्या कसोटीचा तसेच पाकिस्तान आणि श्रीलंका यांच्यातील दुसऱ्या कसोटीचाही यात समावेश आहे. बांगलादेशच्या तौहीद हृदोयने पहिल्या डावात १३७ धावा केल्याने तो २८ स्थानांनी वर चढून ३३ व्या स्थानी, तर लिटन दास १२० धावांच्या जोरावर नऊ स्थानांची प्रगती करत २४ व्या क्रमांकावर आला आहे. दक्षिण आफ्रिकेचा रायन रिकेल्टन कारकिर्दीतील सर्वोत्तम संयुक्त १५ व्या स्थानी पोहोचला असून मार्क्स अकरमन ६० व्या क्रमांकावर आहे. जोहान्सबर्ग कसोटीत आठ बळी घेणारा दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज कागिसो रबाडा दोन स्थानांनी वर सरकून सहाव्या क्रमांकावर आला आहे, तर रावळपिंडी कसोटीतील सामनावीर पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज मोहम्मद अब्बास दोन स्थानांच्या प्रगतीसह १२ व्या क्रमांकावर पोहोचला आहे.



Latest News