हिंदी महासागरातील सुरक्षा आव्हानांना तोंड देण्यासाठी प्रादेशिक सहकार्य वाढवा: अजित डोवाल यांचे आवाहन

Story by  आवाज़ मराठी | Published by  Mrudgandha Dixit • 10 m ago
मालदीवची राजधानी माले येथे आठव्या 'कोलंबो सिक्युरिटी कॉन्क्लेव्ह' (CSC) परिषदेत राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल
मालदीवची राजधानी माले येथे आठव्या 'कोलंबो सिक्युरिटी कॉन्क्लेव्ह' (CSC) परिषदेत राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल

 

माले 

हिंदी महासागर क्षेत्रातील बदलत्या आणि गंभीर सुरक्षा आव्हानांना सामोरे जाण्यासाठी प्रमुख प्रादेशिक देशांची सामूहिक क्षमता वाढवण्याकरिता भारत जवळून काम करण्यास कटिबद्ध आहे, असे प्रतिपादन भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार (NSA) अजित डोवाल यांनी बुधवारी मालदीवची राजधानी माले येथे केले. आठव्या 'कोलंबो सिक्युरिटी कॉन्क्लेव्ह' (CSC) परिषदेत ते बोलत होते. या भागातील तातडीच्या आव्हानांचा उल्लेख करत त्यांनी अधिक सखोल धोरणात्मक सहकार्याचे आवाहन केले.

'नेबरहूड फर्स्ट' आणि 'महासागर' दृष्टिकोनाचा संगम भारत, श्रीलंका, मालदीव, मॉरिशस, बांगलादेश आणि सेशेल्स या हिंदी महासागरातील किनारपट्टीच्या देशांची ही संघटना सागरी सुरक्षा, दहशतवादविरोधी कारवाई आणि आंतरराष्ट्रीय सुरक्षा सहकार्यावर प्रामुख्याने भर देते. या परिषदेत बोलताना डोवाल म्हणाले, "कोलंबो सिक्युरिटी कॉन्क्लेव्ह हे आमच्या 'नेबरहूड फर्स्ट' धोरणाचे आणि 'महासागर' (MAHASAGAR - Mutual and Holistic Advancement for Security and Growth Across Regions) दृष्टिकोनाचे प्रतीक आहे. बदलत्या गंभीर सुरक्षा आव्हानांचा मुकाबला करण्यासाठी सामूहिक क्षमता वाढवण्याकरिता आम्ही सीएससी देशांसोबत एकत्र काम करण्यास कटिबद्ध आहोत."

गेल्या वर्षी मार्च महिन्यात मॉरिशस दौऱ्यादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ग्लोबल साउथसोबतच्या सहभागासाठी 'महासागर' हा दृष्टिकोन जाहीर केला होता.

सर्वतोपरी मदतीची ग्वाही आणि पाच प्रमुख स्तंभ हिंदी महासागर क्षेत्रात सामूहिक सुरक्षा प्रदान करण्यासाठी आणि समान हितांचे रक्षण करण्यासाठी सीएससी हे एक प्रभावी माध्यम बनेल, असा विश्वास डोवाल यांनी व्यक्त केला. ते पुढे म्हणाले, "भारत श्रीलंका, मालदीव आणि इतर देशांसोबत अत्यंत जवळून काम करत असून हे सहकार्य आणखी विस्तारण्याची आमची इच्छा आहे. सीएससीची संकल्पना मांडणाऱ्या देशांपैकी एक या नात्याने भारत सर्व आवश्यक मदत आणि सहकार्य देईल, अशी मी ग्वाही देतो."

भारत, श्रीलंका आणि मालदीव यांनी सागरी सहकार्यावरील त्रिपक्षीय बैठकीची व्याप्ती आणि सदस्यत्व वाढवण्याचा निर्णय घेतल्यानंतर २०२० मध्ये कोलंबो सिक्युरिटी कॉन्क्लेव्हची स्थापना झाली. सागरी सुरक्षा आणि संरक्षण, दहशतवाद व कट्टरतावादाला आळा घालणे, तस्करी व आंतरराष्ट्रीय संघटित गुन्हेगारी रोखणे, सायबर सुरक्षा व महत्त्वाच्या पायाभूत सुविधांचे संरक्षण आणि मानवतावादी मदत व आपत्ती निवारण या पाच प्रमुख स्तंभांवर सीएससी अंतर्गत सहकार्य केंद्रित आहे.



Latest News