मुंबई
"नवऱ्याने दुसऱ्या लग्नाचा हक्क गाजवू नये म्हणून मिळणारे कायदेशीर संरक्षण महिला कोणत्या धर्मात जन्माला आली यावरून ठरावे का?" असा थेट आणि बोचरा सवाल बहुपत्नीत्वाला बळी पडलेल्या एका मुस्लिम महिलेने विचारला. मुंबई मराठी पत्रकार संघात "भारतीय मुस्लिम महिला आंदोलनातर्फे" (BMMA) नुकत्याच आयोजित जनसुनावणीत हा प्रश्न उपस्थित करण्यात आला.
नवऱ्याने दुसरे किंवा तिसरे लग्न केल्यावर वाट्याला आलेली फसवणूक, एकाकीपणा आणि मुलांच्या संगोपनाची एकटीची जबाबदारी यांविषयी पीडित महिलांनी या मंचावर आपले अनुभव मांडले. या जनसुनावणीत महाराष्ट्र, कर्नाटक, पश्चिम बंगाल, गुजरात आणि ओडिशा या राज्यांतील महिला प्रत्यक्ष सहभागी झाल्या होत्या. दिल्ली आणि तामिळनाडूतील काही महिलांनी व्हिडिओ रेकॉर्डिंगच्या माध्यमातून आपली कैफियत मांडली.
चार भिंतींच्या आत गप्प राहून अन्याय सहन करणाऱ्या महिलांना आवाज देण्यासाठी या जनसुनावणीचे आयोजन केले होते. भारतीय न्याय संहितेचे (BNS) कलम ८२, म्हणजेच द्विभार्या प्रतिबंधक कायद्याची तरतूद मुस्लिम समाजालाही समानतेने लागू करावी, अशी एकमुखी मागणी या पीडित महिलांनी केली. बहुपत्नीत्वाची प्रथा अमानुष आणि असह्य असल्याचे सांगत या महिलांनी तिच्यावर कायदेशीर बंदी घालण्याची गरज व्यक्त केली. नवऱ्याच्या दुसऱ्या लग्नानंतर मानसिक आघात तर होतोच; शिवाय आर्थिक ओढाताण, आत्मसन्मान आणि मानवी प्रतिष्ठेलाही धक्का बसतो, असे पीडितांनी सांगितले. शिक्षण आणि आर्थिक स्वावलंबनाच्या अभावामुळे अन्यायाविरुद्ध आवाज उठवणे व न्याय्य वागणूक मागणे कठीण होऊन बसते, अशी भावनाही त्यांनी व्यक्त केली.
या जनसुनावणीत विविध क्षेत्रांतील मान्यवरांचे पथक उपस्थित होते. यामध्ये महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या सदस्य सचिव नंदिनी आवडे, मुंबईचे मुख्य काझी आणि वकील मेहताब हुसेनी, ज्येष्ठ पत्रकार ज्योती पुनवानी, मुस्लिम सत्यशोधक मंडळाचे अध्यक्ष शमसुद्दीन तांबोळी, इंडियन मुस्लिम्स फॉर सेक्युलर डेमोक्रसीचे राष्ट्रीय सह-संयोजक फिरोज मिठीबोरवाला, विस्डम फाउंडेशनच्या अध्यक्षा आणि इस्लामिक अभ्यासक डॉ. झीनत शौकत अली आणि अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष अविनाश पाटील यांचा समावेश होता.
बहुपत्नीत्वाच्या मुद्द्यावर धार्मिक ग्रंथांचा सोयीस्कर अर्थ लावला जातो याकडे डॉ. झीनत शौकत अली यांनी लक्ष वेधले. प्रचलित समजुतीच्या उलट इस्लाम धर्माने बहुपत्नीत्वावर कठोर निर्बंध घातले आहेत, असे त्यांनी स्पष्ट केले. पितृसत्ताक मानसिकतेच्या धर्मगुरूंनी कुराणमधील न्यायाच्या मूळ तत्त्वाकडे दुर्लक्ष केले आहे. कुराणमधील "सूरा अन-निसा" (४:३) मध्ये स्पष्ट म्हटले आहे, "तुम्हाला न्याय राखता येणार नाही अशी भीती वाटत असेल, तर एकाच स्त्रीशी विवाह करा." तसेच पुढील ओळीत (४:१२९) सर्व पत्नींमध्ये पूर्ण न्याय राखणे माणसाच्या क्षमतेपलीकडचे असल्याचेही कुराणने मान्य केले आहे. यातून एकपत्नीत्वाचाच पाया अधोरेखित होतो, असे डॉ. अली यांनी सांगितले. तुर्कीने १९२६ मध्ये आणि ट्युनिशियाने १९५६ मध्येच बहुपत्नीत्वावर बंदी घालून जगासमोर आदर्श ठेवला आहे.
भारतीय मुस्लिम महिला आंदोलनाच्या सह-संस्थापक झकिया सोमन यांनी या प्रथेची ऐतिहासिक पार्श्वभूमी आणि आजची गरज स्पष्ट केली. "आवाज मराठी"शी बोलताना त्या म्हणाल्या, "चौदाशे वर्षांपूर्वीच्या सामाजिक आणि राजकीय परिस्थितीत कठोर अटींवर बहुपत्नीत्वाला परवानगी दिली गेली होती. ती कधीही मुक्तपणे दिली गेलेली सवलत नव्हती आणि तिला प्रोत्साहनही दिले गेले नव्हते. आजच्या काळात बहुपत्नीत्व अजिबात स्वीकारार्ह नाही. आजच्या स्त्रीला आनंदासाठी आणि कल्याणासाठी नवऱ्याची गरज उरलेली नाही; एकटी राहणारी स्त्रीदेखील आनंदी राहू शकते. आमच्या अभ्यासात पहिल्या आणि दुसऱ्या अशा दोन्ही पत्नींना तीव्र मानसिक धक्का बसल्याचे दिसून आले. त्यांना आर्थिक आणि सामाजिक त्रास सहन करावा लागतो. त्यामुळे बहुपत्नीत्वावर बंदी घालून ते बेकायदेशीर ठरवलेच पाहिजे."
गेल्या दोन दशकांत भारतीय मुस्लिम महिलांमध्ये झालेल्या बदलांवरही झकिया सोमन यांनी प्रकाश टाकला. "गेल्या वीस वर्षांत भारतात एक नवी मुस्लिम स्त्री घडताना आपण पाहत आहोत. भारताची नागरिक म्हणून आपले हक्क आणि मुस्लिम म्हणून समानता यांबाबत ती सजग आहे. तिहेरी तलाकविरोधातील आणि सीएए-एनआरसीविरोधातील महिलांच्या नेतृत्वाखालील आंदोलने याची उदाहरणे आहेत. सामाजिक भान जपतानाच मुस्लिम महिला विविध व्यावसायिक क्षेत्रांत चमकदार कामगिरी करत आहेत. आता रूढीवादी पुरुष तिच्या वतीने बोलतील आणि तिचे भविष्य ठरवतील ते दिवस संपले आहेत; दुय्यम दर्जाची वागणूक स्वीकारण्यास ती नकार देत आहे," असे त्या म्हणाल्या.

भारतीय मुस्लिम महिला आंदोलन २००७ पासून संहिताबद्ध मुस्लिम कौटुंबिक कायद्यासाठी लढा देत आहे. देशाच्या स्वातंत्र्यानंतर आठ दशके उलटूनही विवाह आणि कुटुंबव्यवस्थेत भारतीय मुस्लिम महिलांना न्याय आणि समानतेपासून वंचित राहावे लागत आहे. व्यापक कायद्याची प्रतीक्षा करतानाच टप्प्याटप्प्याने कायदे व्हावेत यासाठी संघटनेने प्रयत्न केले आणि त्यातूनच २०१९ मध्ये तिहेरी तलाकविरोधी कायदा अस्तित्वात आला.
संस्थेच्या सह-संस्थापक नूरजहाँ सफिया नियाझ यांनी या कायद्याची निकड अधोरेखित केली. त्या म्हणाल्या, "२०३७ पर्यंत आपल्याला संहिताबद्ध मुस्लिम कौटुंबिक कायदा मिळाला नाही, तर मुस्लिम समाजाला कुटुंबव्यवस्थेत कायदेशीर संरक्षण नसण्याला शंभर वर्षे पूर्ण होतील. सरकारने आता मुस्लिम महिलांप्रती असलेले आपले घटनात्मक कर्तव्य पार पाडण्याची वेळ आली आहे." विवाह, घटस्फोट, पोटगी, मुलांचा ताबा, पालकत्व आणि वारसा हक्क यांबाबत स्पष्ट अधिकार व उपाययोजना असलेला कायदा गरजेचा असल्याचे त्यांनी नमूद केले.
संस्थेची ही मागणी कोणत्याही राजकीय संबंधातून आलेली नसून ती सखोल संशोधनावर आधारित आहे. गेल्या वर्षी संस्थेने "ब्रेकिंग द सायलेन्स: लिव्ह्ड रिॲलिटी ऑफ २५०० इंडियन मुस्लिम वुमन इन पॉलीगॅमस मॅरेजेस" हा अभ्यास अहवाल प्रसिद्ध केला. बहुपत्नीत्व असलेल्या कुटुंबांतील २,५०० मुस्लिम महिलांच्या अनुभवांवर हा अभ्यास आधारित आहे.
या अभ्यासानुसार ८५ टक्के महिलांनी बहुपत्नीत्व कायदेशीररीत्या अवैध ठरवण्याची मागणी केली. तसेच जवळपास निम्म्या महिलांकडे उत्पन्नाचे कोणतेही साधन नव्हते आणि सुमारे दोन तृतीयांश महिलांचे मासिक उत्पन्न पाच हजार रुपयांपेक्षा कमी होते. गरजू महिलांना आधार देण्यासाठी बहुपत्नीत्व आवश्यक असल्याचा दावा या आकडेवारीने खोटा ठरवला आहे. याशिवाय २०२६ या वर्षभरात संस्थेने जनजागृती, स्वाक्षरी मोहीम आणि जाहीर सभांच्या माध्यमातून बहुपत्नीत्व रद्द करण्याची मागणी लावून धरली. तसेच मुस्लिम समाजातील बहुपत्नीत्व रद्द करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात जनहित याचिकाही दाखल केली आहे.
सध्याच्या राजकीय वातावरणात तिहेरी तलाक किंवा बहुपत्नीत्वाचा मुद्दा पुढे आणू नये आणि या प्रकरणांची संख्या कमी आहे, असा युक्तिवाद अनेकदा केला जातो. मात्र गेल्या पंधरा वर्षांपासून पीडित महिलांसोबत काम करणाऱ्या आणि "झरिया" या महिला आघाडीच्या सह-संस्थापक मारिया सलीम यांनी या युक्तिवादावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. समाजाच्या हितासाठी महिलांनी आपल्या हक्कांचा त्याग करावा असे नेहमीच सांगितले जाते; मात्र महिलांचे हक्क आणि समाजाचे हक्क सोबत का चालू शकत नाहीत, असा सवाल त्यांनी विचारला.
बहुपत्नीत्वाविरुद्धचा लढा हा धर्माच्या विरोधात नसून इतर नागरिकांप्रमाणेच मुस्लिम महिलांनाही समान कायदेशीर संरक्षण मिळावे यासाठीचा लढा आहे. समाज आणि सरकारने या मागणीची दखल घेऊन मुस्लिम कौटुंबिक कायद्यात सर्वसमावेशक सुधारणा करावी, अशी अपेक्षा या जनसुनावणीतून व्यक्त करण्यात आली.