तरुणांना भडकावणे आणि शस्त्रास्त्रे पुरवणे; सीमेपलीकडून दहशतवाद पुन्हा सक्रिय करण्याचा कट उघड

Story by  आवाज़ मराठी | Published by  Mrudgandha Dixit • 8 m ago
जम्मू-काश्मीरचे पोलीस महासंचालक नलिन प्रभात
जम्मू-काश्मीरचे पोलीस महासंचालक नलिन प्रभात

 

जम्मू

जम्मू-काश्मीरच्या रियासी जिल्ह्यातील १९९१ ते २००३ दरम्यान बेपत्ता झालेले ३० दहशतवादी पाकिस्तानात पसार झाले असून ते दहशतवादी संघटनेसाठी काम करत आहेत. जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद पुन्हा सक्रिय करण्यासाठी ते शस्त्रास्त्रे, दारूगोळा आणि पैसा पुरवत असल्याची माहिती पोलीस महासंचालक (DGP) नलिन प्रभात यांनी बुधवारी दिली.

हिजबुल मुजाहिदीनसाठी काम आणि तरुणांना चिथावणी रियासी जिल्ह्यातील महोर आणि चस्साना परिसरातील हे ३० दहशतवादी शस्त्रास्त्र प्रशिक्षणासाठी पाकिस्तानात गेल्याची खात्रीलायक माहिती महोर पोलीस ठाण्याला मिळाली आहे. पोलीस महासंचालकांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'एक्स'वर सांगितले की, हे सर्व जण सध्या पाकिस्तानात 'हिजबुल मुजाहिदीन' (HM) या दहशतवादी संघटनेसाठी कार्यरत आहेत. जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवादाला चालना देण्यासाठी शस्त्रास्त्रे व निधी पुरवण्यासोबतच स्थानिक तरुणांना भडकावणे आणि दहशतवादी कारवायांत सहभागी करून घेण्याचे काम ते करत आहेत.

या ३० दहशतवाद्यांची ओळख पटली असून त्यामध्ये शडोलचा मोहम्मद कय्यूम, शजरूचा मोहम्मद सबदार, खौर येथील समदूचे पुत्र गुलाम मोहम्मद व गुलाम कादिर, मुश्ताक अहमद आणि दादा येथील खुशाल हुसेन यांचा समावेश आहे. तसेच कर्मकथा येथील अब्दुल मजीद, मोहम्मद रफिक उर्फ शबीर, शबीर अहमद व मंजूर अहमद; शजरूचे मखना, अलफ दीन व गुलाम मोहम्मद उर्फ गम्मा; लारचा अब्दुल मजीद; सिल्धारचा मुश्ताक अहमद व जमाल दीन; शडूलचा मोहम्मद युसूफ खाकमत उर्फ बिलाल; चकरासचे मोहम्मद इक्बाल व मोहम्मद अश्रफ; लाढचा गुलाम मोहम्मद; शिब्रासचा अब्दुल हमीद नजार उर्फ महमदू; चिकलासचा तालिब हुसेन; लार्हचे मोहम्मद रफिक व गामी गुज्जर; तुल्लीचा मोहम्मद रफिक; कुंदरधनचा मोहम्मद कासिम व मोहम्मद रफिक; बलमटकोटचा अब्दुल हमीद; बगोदासचा शबीर अहमद आणि हस्सोटचा मोहम्मद अली अशी यांची नावे आहेत.

गुन्हा दाखल आणि २७ कनालहून अधिक जमीन जप्त २०२४ मध्ये महोर पोलिसांनी या दहशतवाद्यांविरोधात भारतीय न्याय संहिता (BNS), स्फोटक पदार्थ नियंत्रण तरतुदी आणि बेकायदेशीर कारवाया प्रतिबंधक कायद्यांतर्गत (UAPA) गुन्हा दाखल केला होता. तपासादरम्यान पोलिसांनी साक्षीदारांचे जबाब नोंदवून पाच दहशतवाद्यांची ओळख पटवली, जे पाकिस्तानात प्रशिक्षण घेऊन सीमेपलीकडून दहशतवादाला आर्थिक बळ देण्यासाठी स्वतःच्या जमिनी विकत होते.

यामध्ये महोर तहसीलमधील शडोलचा मोहम्मद कय्यूम उर्फ अब्दुल कय्यूम, बिड्डरचा बशीर अहमद उर्फ मासूम, अर्नास तहसीलमधील हुंडरचा शौकत अली, थुरू तहसीलमधील खांटीचा मंजूर अहमद उर्फ मंजूर हुसेन आणि थुरूचा इम्तियाज अहमद यांचा समावेश आहे. पोलिसांनी रियासीतील या पाच दहशतवाद्यांची २७ कनालहून अधिक जमीन जप्त केली आहे.



Latest News