पेपरफुटीला चाप लावण्यासाठी १० वर्षे तुरुंगवास आणि १० कोटींचा दंड: महाराष्ट्र परीक्षा सुधारणा समितीच्या शिफारशी

Story by  आवाज़ मराठी | Published by  Mrudgandha Dixit • 15 m ago
प्रातिनिधिक इमेज
प्रातिनिधिक इमेज

 

मुंबई 

राज्यातील भरती परीक्षा प्रणालीचा आढावा घेण्यासाठी नेमलेल्या महाराष्ट्र सरकारच्या परीक्षा सुधारणा समितीने प्रश्नपत्रिका फुटण्याचे प्रकार रोखण्यासाठी सात ते १० वर्षांपर्यंतचा तुरुंगवास, किमान १० कोटी रुपयांचा दंड, मालमत्ता जप्ती आणि जलदगती न्यायालयांची स्थापना करण्याची शिफारस केली आहे. वरिष्ठ आयएएस अधिकारी व्ही. राधा यांच्या अध्यक्षतेखालील समितीने राज्य सरकारला आपला दुसरा अहवाल सादर केला आहे.

विशेष कृती दल आणि परीक्षा शुल्क परताव्याची शिफारस पेपरफुटीच्या प्रकरणांचा तपास करण्यासाठी स्वतंत्र 'विशेष कृती दल' (STF) स्थापन करण्याचा आणि महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) उमेदवारांना परीक्षा शुल्काचा संपूर्ण परतावा देण्याचा प्रस्तावही समितीने मांडला आहे. तसेच, उत्तरतालिकेवर (आन्सर की) घेतलेला आक्षेप योग्य ठरल्यास त्यासाठी भरलेले शुल्क परत करण्याची शिफारसही अहवालात करण्यात आली आहे.

परीक्षा प्रक्रियेत पारदर्शकता आणण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांवर महत्त्वाची जबाबदारी सोपवणे आणि परीक्षा केंद्रांचा स्वतंत्र डेटाबेस म्हणजेच 'व्हेन्यू बँक' तयार करणे आवश्यक असल्याचे समितीने म्हटले आहे. यापूर्वी याच महिन्यात समितीने भरती प्रक्रिया अधिक पारदर्शक, सुरक्षित आणि विश्वासार्ह बनवण्यासाठी अंतरिम अहवाल सादर केला होता.

एमपीएससी जागावाढ आणि वयोमर्यादेत सवलत कठोर शिक्षेच्या तरतुदींसोबतच एमपीएससीच्या गट-क संयुक्त पूर्व परीक्षा २०२६ मधील रिक्त पदांची संख्या १६ हजारांहून अधिक करण्याचे आणि सर्व भरती परीक्षांसाठी कमाल वयोमर्यादेत एक वेळची बाब म्हणून एक वर्षाची सवलत देण्याचे आवाहनही समितीने केले आहे. एमपीएससी परीक्षांमधील गैरप्रकारांचे आरोप आणि विद्यार्थ्यांच्या आंदोलनानंतर ४ सप्टेंबर रोजी या समितीची स्थापना करण्यात आली होती.

हिवाळी अधिवेशनात कायदा आणणार : मुख्यमंत्री फडणवीस दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की, परीक्षा प्रणाली अधिक पारदर्शक बनवणे, परीक्षा केंद्रांची रचना आणि कायदा अधिक कठोर करणे याबाबत समितीने शिफारशी केल्या आहेत. "आगामी हिवाळी अधिवेशनात हा कायदा आणण्याचा आणि विधेयक मंजूर करून घेण्याचा आम्ही प्रयत्न करू," असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केले.