नवी दिल्ली
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि जर्मनीचे चॅन्सेलर फ्रेडरिक मर्झ यांनी मंगळवारी दूरध्वनीवर संवाद साधून भारत-जर्मनी धोरणात्मक भागीदारीतील प्रगतीचा आढावा घेतला आणि द्विपक्षीय संबंधांतील सातत्यपूर्ण गतीबद्दल समाधान व्यक्त केले. डिसेंबरमध्ये नियोजित असलेल्या भारत-युरोपियन युनियन मुक्त व्यापार कराराच्या (FTA) स्वाक्षरीपूर्वी ही महत्त्वपूर्ण चर्चा पार पडली.
भारत-युरोपियन युनियन मुक्त व्यापार करार आणि व्यापार संधी पंतप्रधान कार्यालयाने (PMO) दिलेल्या माहितीनुसार, भारत-युरोपियन युनियन मुक्त व्यापार करारामुळे द्विपक्षीय व्यापार आणि गुंतवणूक वाढवण्याच्या अनेक नव्या संधी खुल्या होतील, असे दोन्ही नेत्यांनी नमूद केले. जानेवारीमध्ये भारत आणि २७ देशांच्या युरोपियन युनियनमधील या कराराची चर्चा पूर्ण झाली होती. या करारानुसार, भारतीय निर्यातीतील ९३ टक्के उत्पादनांना युरोपियन युनियनमध्ये शुल्कमुक्त प्रवेश मिळेल, तर युरोपमधून येणाऱ्या आलिशान गाड्या आणि वाईन स्वस्त होणार आहेत. भारत आणि युरोपियन युनियन एकत्रितपणे जागतिक जीडीपीच्या २५ टक्के आणि आंतरराष्ट्रीय व्यापाराच्या एक तृतीयांश (सुमारे ११ ट्रिलियन डॉलर) वाटा उचलतात.
संरक्षण, प्रगत तंत्रज्ञान आणि जागतिक शांतता भारत आणि जर्मनी यंदा आपल्या राजनैतिक संबंधांची ७५ वर्षे साजरी करत आहेत. या पार्श्वभूमीवर संरक्षण आणि प्रगत तंत्रज्ञानासह प्रमुख क्षेत्रांतील सहकार्य अधिक दृढ करण्याच्या वचनबद्धतेचा दोन्ही नेत्यांनी पुनरुच्चार केला. तसेच प्रादेशिक आणि जागतिक घडामोडींवर विचारांची देवाणघेवाण करत जागतिक शांतता, स्थैर्य आणि नियमाधारित आंतरराष्ट्रीय व्यवस्था टिकवून ठेवण्यासाठी एकत्र काम करण्याचे त्यांनी मान्य केले. बहुपक्षीय व्यासपीठांवरही परस्पर सहकार्य कायम ठेवण्यावर दोन्ही नेत्यांनी भर दिला.