नवी दिल्ली
उत्तर प्रदेशातील प्राचीन मंदिर नगरी वाराणसी येथे साजरी झालेल्या देव दिवाळीच्या सोहळ्यात अद्भुत दिव्यता आणि अलौकिक छटा पाहायला मिळाल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी सांगितले. पंतप्रधान मोदी यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'एक्स'वर वाराणसीतील प्रकाशमय गंगा घाट, उजळलेले मातीचे दिवे आणि संध्याकाळच्या गंगा आरतीची आठ छायाचित्रे शेअर केली आहेत.

पंतप्रधान मोदी यांनी हिंदीतून केलेल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, "बाबा विश्वनाथ यांच्या नगरीत आज सर्वत्र देव दिवाळीची अद्भुत दिव्यता आणि अलौकिक छटा पसरली आहे."

कार्तिक पौर्णिमेच्या निमित्ताने मंगळवारी वाराणसीच्या अर्धचंद्राकृती गंगा घाटांवर भाविकांचा महासागर लोटला होता. या वेळी 'हर हर महादेव' आणि 'हर हर गंगे'च्या जयघोषाने संपूर्ण परिसर दुमदुमून गेला. वृत्तांनुसार, गंगा नदीकाठच्या ऐतिहासिक घाटांवर ११ लाखांहून अधिक मातीचे दिवे प्रज्वलित करण्यात आले होते.