संविधानाच्या असामान्य ताकदीमुळेच सामान्य कुटुंबातील मुलाला देशाचे नेतृत्व करण्याची संधी मिळाली: पंतप्रधान मोदी

Story by  आवाज़ मराठी | Published by  Mrudgandha Dixit • 17 m ago
संविधान दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी
संविधान दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी

 

नवी दिल्ली

भारतीय संविधान कोट्यवधी नागरिकांच्या आणि स्वतःच्या जीवनप्रवासाचा अविभाज्य भाग आहे. संविधानाच्या असामान्य भावनेमुळेच कोणत्याही विशेषाधिकाराशिवाय सामान्य कुटुंबात जन्मलेल्या मुलाला जगातील सर्वात मोठ्या लोकशाहीचे नेतृत्व करण्याची संधी मिळाली, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी संविधान दिनानिमित्त केले. विविध प्रमुख वर्तमानपत्रांत प्रसिद्ध झालेल्या विशेष लेखातून त्यांनी संविधानाप्रती कृतज्ञता व्यक्त केली. तसेच नाव न घेता काँग्रेसवर टीका करत त्यांच्या सत्ताकाळात संविधान कमकुवत करण्याचे प्रयत्न झाल्याचा आरोप त्यांनी केला. २०१९ मध्ये कलम ३७० आणि ३५-अ रद्द करून आपल्या सरकारने ऐतिहासिक चूक सुधारली आणि जम्मू-काश्मीरमध्ये संपूर्ण संविधान लागू केले, असेही मोदी यांनी नमूद केले.

भारतासारख्या विविध धर्म, भाषा, चालीरीती आणि विचारप्रवाह असलेल्या देशात संविधानाचा आवाज संसद आणि न्यायालयांच्या पलीकडे पोहोचणे गरजेचे आहे. या विचारातूनच एनडीए सरकारने दहा वर्षांहून अधिक काळापूर्वी २६ नोव्हेंबर हा दिवस "संविधान दिन" म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला. विशेषतः तरुणांच्या सामूहिक जाणिवांशी संविधान जोडणे आणि देशाच्या उज्ज्वल भविष्यासाठी एकतेची भावना बळकट करणे, हा सरकारचा प्रयत्न असल्याचे मोदी यांनी स्पष्ट केले.

आपल्या बालपणीच्या दिवसांची आणि संघर्षाची आठवण सांगताना पंतप्रधान मोदी म्हणाले, "माझ्या बालपणाकडे, मी वाढलेल्या सामान्य परिस्थितीकडे आणि दैनंदिन संघर्षाकडे मागे वळून पाहतो, त्या वेळी संविधानाबद्दल कृतज्ञतेची भावना दाटून येते. जन्मापासून कोणताही विशेषाधिकार नसलेल्या एका सामान्य कुटुंबातील मुलावर जगातील सर्वात मोठ्या लोकशाहीची सेवा करण्याची जबाबदारी सोपवली जाते, यातूनच आपल्या संविधानाचे असामान्य सामर्थ्य दिसून येते." संविधानाला अधिक बळकट करून आपण या ऋणातून उतराई होण्याचा नम्र प्रयत्न करत असल्याचेही त्यांनी सांगितले.

२६ नोव्हेंबर १९४९ रोजी संविधान सभेने भारतीय संविधानाचा स्वीकार केला. या निमित्ताने डॉ. राजेंद्र प्रसाद, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि संविधान सभेच्या सर्व सदस्यांचे स्मरण करताना मोदी यांनी आधुनिक संविधान घडवताना भारतीय परंपरा आणि सांस्कृतिक शहाणपणाचा घेतलेला आधार मोलाचा असल्याचे सांगितले. घटनातज्ज्ञ ग्रॅनव्हिल ऑस्टिन यांनी भारतीय संविधानाचे वर्णन "प्रथम आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे एक सामाजिक दस्तऐवज" असे केले होते, याचा संदर्भ देत सामाजिक आणि आर्थिक न्यायाचा ध्यास संविधानाच्या प्रत्येक धाग्यात विणला गेला असल्याचे मोदी यांनी लिहिले.

जागतिक बँकेच्या अलीकडील अहवालानुसार भारतातील सुमारे ५० कोटी नागरिक गरिबीतून बाहेर आले आहेत. पिढ्यान्पिढ्यांच्या वंचिततेतून मुक्त होऊन कोट्यवधी पालक आपल्या मुलांच्या उज्ज्वल भविष्याची स्वप्ने पाहत आहेत, असे मोदी म्हणाले. पंतप्रधान आवास योजनेतून झोपडीऐवजी पक्के घर मिळते, तेव्हा संविधानातील सन्मानाच्या आश्वासनाला खरा अर्थ प्राप्त होतो. उज्ज्वला योजनेमुळे मातांची धुराच्या चुलीतून सुटका होते आणि आयुष्मान भारत योजनेतून गरीब कुटुंबाला कर्जाच्या भीतीशिवाय दर्जेदार उपचार मिळतात, तेव्हा सामाजिक न्याय प्रत्यक्ष आयुष्यात उतरतो, असे त्यांनी नमूद केले. मुद्रा योजना, पीएम-स्वनिधी आणि यूपीआयसारख्या डिजिटल प्लॅटफॉर्मचा लाभ समाजातील सर्व घटकांना होत असल्याचेही त्यांनी सांगितले.

घटनादुरुस्त्यांचा उल्लेख करताना मोदी यांनी १०१ व्या घटनादुरुस्तीतून जीएसटी लागू झाल्याचे आणि १०२ व्या दुरुस्तीतून राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाला घटनात्मक दर्जा देऊन वंचित घटकांचे स्वप्न पूर्ण केल्याचे सांगितले. तसेच १०३ व्या घटनादुरुस्तीतून आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना (EWS) आरक्षण देऊन आरक्षणाच्या कक्षेबाहेरील गरीब कुटुंबांच्या आकांक्षा पूर्ण केल्याचे त्यांनी स्पष्ट केले. १९५० नंतर पहिल्यांदाच संविधानाची अद्ययावत प्रत आठव्या अनुसूचीतील सर्व २२ भाषांमध्ये उपलब्ध करून दिली असून यामुळे संविधान सामान्य जनतेच्या अधिक जवळ आले आहे. वसाहतवादी काळातील शिक्षेवर (दंड) भर देणाऱ्या कायद्यांऐवजी नागरिककेंद्रित न्यायाला प्राधान्य देणारी भारतीय न्याय संहिता लागू केल्याचेही त्यांनी नमूद केले.

दुसरीकडे, संविधानाचे रक्षण करण्याची जबाबदारी असलेल्यांनीच पाच दशकांच्या सत्ताकाळात संविधान कमकुवत केले, अशी टीका मोदी यांनी केली. १९५१ मधील पहिल्या घटनादुरुस्तीला यंदा ७५ वर्षे पूर्ण होत असून लोकनियुक्त नसलेल्या सरकारने हंगामी संसदेतील बहुमताचा वापर करून मूलभूत स्वातंत्र्यावर गदा आणली होती. देशाच्या पहिल्या सार्वत्रिक निवडणुकीपूर्वी काही महिने आधी केलेली ही दुरुस्ती निवडणूक प्रक्रियेवर प्रभाव टाकण्यासाठी आणि विरोधकांचा आवाज दाबण्यासाठी होती, असे त्यांनी लिहिले. आणीबाणीच्या काळात केलेल्या ४२ व्या घटनादुरुस्तीला ५० वर्षे पूर्ण होत असून त्यातून न्यायालयीन पुनरावलोकनाचे अधिकार कमी केले गेले आणि संस्थात्मक अधिकारांचा समतोल बिघडवला गेला. सत्तालोलुप आणि संविधानविरोधी नेतृत्व काय करू शकते हे समजून घेण्यासाठी तरुणांनी ३८ व्या आणि ३९ व्या घटनादुरुस्तीचा अभ्यास करावा, असे आवाहन त्यांनी केले.

निवडून आलेली राज्य सरकारे बरखास्त करण्यासाठी कलम ३५६ चा वारंवार गैरवापर करण्यात आल्याकडे लक्ष वेधत एका पक्षाच्या नावावर जवळपास शंभर वेळा हे कलम वापरण्याचा विक्रम असून एका माजी पंतप्रधानांनी या क्षेत्रात अर्धशतक झळकावले होते, असा टोला मोदी यांनी लगावला. सत्तर वर्षांहून अधिक काळ कलम ३७० आणि ३५-अ मुळे जम्मू-काश्मीरमध्ये संपूर्ण संविधान लागू होऊ शकले नाही आणि तिथल्या अनुसूचित जाती, जमाती, ओबीसी व महिलांच्या हक्कांवर गदा आली. २०१९ मध्ये ही ऐतिहासिक चूक सुधारली गेली. २०४७ पर्यंत "विकसित भारत" घडवताना विचारांत "भारत प्रथम" आणि कृतीत "कर्तव्य" ही दोन सूत्रे अंगीकारल्यास येणाऱ्या पिढ्यांचे भविष्य सुरक्षित राहील, असा विश्वास पंतप्रधान मोदी यांनी व्यक्त केला.



Latest News