"हिंदी महासागराने देशांना जोडले पाहिजे, विभागू नये", कोलंबो सिक्युरिटी कॉन्क्लेव्हमध्ये अजित डोवाल यांचे प्रतिपादन

Story by  आवाज़ मराठी | Published by  Mrudgandha Dixit • 42 m ago
मालदीवची राजधानी माले येथे आठव्या 'कोलंबो सिक्युरिटी कॉन्क्लेव्ह' (CSC) परिषदेत बोलताना भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल.
मालदीवची राजधानी माले येथे आठव्या 'कोलंबो सिक्युरिटी कॉन्क्लेव्ह' (CSC) परिषदेत बोलताना भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल.

 

माले

हिंदी महासागर क्षेत्रातील सागरी सीमा लाभलेल्या देशांमध्ये सामायिक सागरी आणि सांस्कृतिक संबंध आहेत. या समुद्राने देशांना विभागण्याऐवजी एकत्र जोडण्याचे काम केले पाहिजे, असे प्रतिपादन भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार (NSA) अजित डोवाल यांनी बुधवारी मालदीवची राजधानी माले येथे केले. आठव्या "कोलंबो सिक्युरिटी कॉन्क्लेव्ह" (CSC) मधील राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांच्या बैठकीत ते बोलत होते. सागरी सुरक्षा, प्रादेशिक स्थैर्य आणि आर्थिक समृद्धी सुनिश्चित करण्यासाठी या भागातील देशांनी सातत्याने सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले.

या परिषदेत बोलताना अजित डोवाल म्हणाले, "हिंदी महासागर क्षेत्रातील किनारपट्टीचे देश या नात्याने आपले सागरी क्षेत्र सामायिक आहे. दीर्घ इतिहासातून घडलेल्या सांस्कृतिक वारशाने आपण एकमेकांशी जोडलेले आहोत." आधीच्या पिढ्यांनी दिलेला वारसा आठवून त्यांनी भविष्याची दिशा स्पष्ट केली. "मालदीवच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांनी उल्लेख केल्याप्रमाणे, आपल्या आधीच्या पिढ्यांनी समुद्राने आपल्याला जोडले असल्याचा वारसा दिला आहे. आपणही आपल्या पुढच्या पिढीसाठी असाच वारसा आणि परंपरा सोडून जाऊया. या परंपरांतून हे समुद्र पुढच्या पिढ्यांना एकत्र बांधून ठेवतील आणि त्यांच्यात फूट पाडणार नाहीत," असे ते म्हणाले.

या संघटनेच्या प्रवासाचा आढावा घेताना डोवाल यांनी नोव्हेंबर २०२० मधील स्थापनेची आठवण सांगितली. हिंदी महासागर क्षेत्रातील सुरक्षा आणि स्थैर्य जपण्याच्या सामूहिक दृष्टिकोनातून कोलंबो सिक्युरिटी कॉन्क्लेव्ह आकारास आली. या व्यासपीठाने आतापर्यंत प्रगती केली असली तरी अजून पल्ला गाठायचा आहे, असे त्यांनी नमूद केले. भारताचे "नेबरहूड फर्स्ट" म्हणजेच शेजारी प्रथम हे धोरण आणि व्यापक "महासागर" (MAHASAGAR - Mutual and Holistic Advancement for Security and Growth Across Regions) दृष्टिकोन यांचा संगम या मंचावर दिसून येतो. या भागातील बदलत्या आणि गंभीर सुरक्षा आव्हानांना सामोरे जाण्यासाठी आणि सामूहिक क्षमता वाढवण्यासाठी सदस्य देशांसोबत मिळून काम करण्यास भारत कटिबद्ध असल्याची ग्वाही त्यांनी दिली.

कोलंबो सिक्युरिटी कॉन्क्लेव्हची संकल्पना मांडणाऱ्या देशांपैकी एक या नात्याने भारत सर्व आवश्यक मदत आणि सहकार्य करेल, असे आश्वासन डोवाल यांनी दिले. ते म्हणाले, "या परिषदेत सहभागी होणे आणि मालदीव सरकारच्या आदरातिथ्याचा आनंद घेणे हा माझ्यासाठी अभिमानाचा क्षण आहे. या परिषदेची उत्कृष्ट व्यवस्था केल्याबद्दल आणि आम्हाला आमचे विचार मांडण्याची संधी दिल्याबद्दल मी मालदीवच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांचा आभारी आहे." हिंदी महासागर केवळ राष्ट्रीय सुरक्षा आणि आर्थिक प्रगतीसाठीच महत्त्वाचा नाही; या प्रदेशात राहणाऱ्या सामान्य नागरिकांचे हित आणि कल्याण जपण्यासाठीही त्याचे महत्त्व अनन्यसाधारण आहे, असे ते म्हणाले.

सुरुवातीला एका साध्या कल्पनेतून सुरू झालेला हा मंच आता एका सुव्यवस्थित प्रादेशिक संस्थेत रूपांतरित झाला आहे. सदस्य देशांच्या सहकार्यामुळे आज या संघटनेचे स्वतःचे सचिवालय आणि महासचिव कार्यरत आहेत. येत्या काही महिन्यांत हे काम अधिक वेगाने पुढे जाईल, असा विश्वास डोवाल यांनी व्यक्त केला. या सचिवालयाच्या नेतृत्वाशी जोडलेले भारताचे माजी नौदल उपप्रमुख ॲडमिरल घोरमडे यांच्या कार्यक्षमतेचे डोवाल यांनी कौतुक केले. आपल्या कारकिर्दीत पाहिलेल्या सर्वोत्तम व्यावसायिक अधिकाऱ्यांपैकी ते एक असल्याचे डोवाल यांनी आवर्जून सांगितले.

कोलंबो सिक्युरिटी कॉन्क्लेव्हचा इतिहास आणि विस्तार हा हिंदी महासागरातील सहकार्याचा प्रवास दाखवतो. २०११ मध्ये भारत, श्रीलंका आणि मालदीव या तीन देशांनी सागरी सुरक्षेसाठी त्रिपक्षीय यंत्रणा सुरू केली होती. २०२० मध्ये या व्यासपीठाचे नाव बदलून "कोलंबो सिक्युरिटी कॉन्क्लेव्ह" ठेवण्यात आले. त्यानंतर मॉरिशस आणि बांगलादेश पूर्णवेळ सदस्य बनले, तर सेशेल्सने निरीक्षक देश म्हणून सहभाग घेतला. ३० ऑगस्ट २०२४ रोजी श्रीलंकेची राजधानी कोलंबो येथे सदस्य देशांनी सीएससी सनद (Charter) आणि सचिवालय स्थापनेच्या सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या केल्या होत्या. त्या वेळी भारताकडून अजित डोवाल, मालदीवकडून राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार इब्राहिम लतीफ, मॉरिशसचे श्रीलंकेतील उच्चायुक्त हेमंडोयल डिलम आणि श्रीलंकेचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार सागला रत्नायके यांनी करारावर स्वाक्षऱ्या केल्या होत्या.

मालदीवमध्ये २४ ते २६ नोव्हेंबर २०२६ दरम्यान ही आठवी परिषद आयोजित करण्यात आली आहे. यामध्ये भारत, बांगलादेश, मालदीव, मॉरिशस, श्रीलंका आणि सेशेल्स या देशांचे प्रतिनिधी सहभागी झाले आहेत. या बैठकीत २० नोव्हेंबर २०२५ रोजी नवी दिल्लीत झालेल्या सातव्या परिषदेतील निर्णयांचा आणि २०२५-२०२६ च्या कृती आराखड्याचा आढावा घेण्यात आला. सागरी सुरक्षा, दहशतवाद आणि कट्टरतावादाला आळा घालणे, तस्करी व आंतरराष्ट्रीय संघटित गुन्हेगारी रोखणे, सायबर सुरक्षा व महत्त्वाच्या पायाभूत सुविधांचे संरक्षण करणे आणि मानवतावादी मदत व आपत्ती निवारण या पाच प्रमुख स्तंभांवर ही संघटना काम करते. या पाचही क्षेत्रांत प्रशिक्षण आणि क्षमता बांधणीचे कार्यक्रम राबवण्यात आले आहेत.

या परिषदेच्या निमित्ताने २४ नोव्हेंबर रोजी अजित डोवाल यांनी मालदीवचे संरक्षण आणि राष्ट्रीय सेवा मंत्री हसन रशीद यांचीही स्वतंत्र भेट घेतली. दोन्ही देशांतील दीर्घकालीन भागीदारी आणि द्विपक्षीय संरक्षण सहकार्य अधिक बळकट करण्यावर या बैठकीत सविस्तर चर्चा झाली. हिंदी महासागर हा जगातील व्यापाराचा आणि ऊर्जा वाहतुकीचा प्रमुख मार्ग आहे. त्यामुळे या प्रदेशातील शांतता, सागरी चाचेगिरी रोखणे, अमली पदार्थांची तस्करी थांबवणे आणि नैसर्गिक आपत्तीत एकमेकांना मदत करणे यांसाठी या देशांची एकजूट निर्णायक ठरत आहे.



Latest News