यूएईतील भीषण बस-ट्रक अपघातात १३ जणांचा मृत्यू; भारतीय महावाणिज्यदूतांनी घेतली पीडित कुटुंबीयांची भेट

Story by  आवाज़ मराठी | Published by  Mrudgandha Dixit • 11 m ago
यूएईतील भीषण बस-ट्रक अपघाताचे दृश्य
यूएईतील भीषण बस-ट्रक अपघाताचे दृश्य

 

दुबई

संयुक्त अरब अमिरातीतील (UAE) रास अल खैमाह येथे झालेल्या भीषण बस-ट्रक अपघातातील पीडित कुटुंबीयांची दुबईतील भारताच्या महावाणिज्यदूतांनी बुधवारी भेट घेऊन सांत्वन केले. मंगळवारी झालेल्या या अपघातात १३ जणांचा मृत्यू झाला असून त्यामध्ये काही भारतीय नागरिकांचाही समावेश आहे.

अपघाताची माहिती आणि महावाणिज्यदूतांची भेट स्थानिक माध्यमांच्या वृत्तानुसार, ४१ प्रवाशांना घेऊन जाणारी प्रवासी बस तांत्रिक बिघाडामुळे रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या ट्रकला धडकल्याने हा अपघात घडला. या दुर्घटनेत १४ जण जखमी झाले आहेत. दुबईतील भारतीय वाणिज्य दूतावासाने मृतांमध्ये काही भारतीय असल्याचे स्पष्ट केले असले, तरी नेमकी संख्या अद्याप जाहीर केलेली नाही.

दुबईतील भारताचे महावाणिज्यदूत ई. विष्णू वर्धन रेड्डी यांनी रास अल खैमाह येथे जाऊन काही पीडित कुटुंबीयांची भेट घेतली. त्यांनी कुटुंबीयांचे सांत्वन करत सर्वतोपरी मदत आणि पूर्ण सहकार्य करण्याची ग्वाही दिली. तसेच स्थानिक अधिकाऱ्यांचीही भेट घेऊन सर्व आवश्यक प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी सहकार्याची विनंती केली.

ओळख पटवण्याचे काम सुरू; २४ तास हेल्पलाइन उपलब्ध 'गल्फ न्यूज'च्या वृत्तानुसार, या अपघातात मृत्युमुखी पडलेल्या भारतीयांची एकूण संख्या आताच सांगणे घाईचे ठरेल, असे रेड्डी यांनी सांगितले. "आम्ही अद्याप सर्व तपशील तपासत असून स्थानिक प्रशासनाकडून अधिकृत पुष्टीची प्रतीक्षा करत आहोत," असे ते म्हणाले. तथापि, काही भारतीय मृतांची ओळख त्यांच्या कुटुंबीयांनी पटवली असल्याची माहिती त्यांनी दिली.

दरम्यान, पीडितांना आणि त्यांच्या नातेवाईकांना तातडीची मदत मिळावी यासाठी भारतीय वाणिज्य दूतावासाने २४ तास सुरू असलेला टोल-फ्री हेल्पलाइन क्रमांक (800-46342) जारी केला असून स्थानिक प्रशासनासोबत समन्वय साधून मदतकार्य सुरू आहे.



Latest News