कुर्ला मारहाण प्रकरणाविरोधात मुस्लिम लोकप्रतिनिधींची कठोर भूमिका

Story by  Bhakti Chalak | Published by  Bhakti Chalak • 28 m ago
मुस्लिम लोकप्रतिनिधी
मुस्लिम लोकप्रतिनिधी

 

भक्ती चाळक

मुंबईमध्ये विविध धर्मांचे, जातींचे आणि भाषांचे लोक एकत्र राहतात. इथल्या सार्वजनिक जागा सगळ्यांसाठी खुल्या आहेत. अशाच एका सार्वजनिक उद्यानात छायाचित्रे काढणाऱ्या तरुण जोडप्याला काही अल्पवयीन मुलांकडून बेदम मारहाण झाली. काही वेळातच या घटनेचा व्हिडिओ समाजमाध्यमांवर व्हायरल झाला. 

मारहाण करणारी मुलं मुस्लीम असल्याने घटनेला धार्मिक रंग देण्यात आला. मदरशाचाही या प्रकरणाशी संबंध जोडण्याचा प्रयत्न झाला. या सगळ्या घडामोडींदरम्यान मुस्लीम लोकप्रतिनिधींनी कोणाचीही पाठराखण न करता आपली भूमिका स्पष्ट केली. घटनेला धार्मिक रंग देण्याऐवजी निष्पक्ष तपास करून दोषींवर कठोर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली आहे.

नेमकी घटना काय घडली?
सातारा जिल्ह्यातील २१ वर्षीय तरुण १९ नोव्हेंबरला आपल्या मैत्रिणीला भेटण्यासाठी नवी मुंबईत आला होता. दुसऱ्या दिवशी दोघेही कुर्ला पश्चिम येथील फिनिक्स मार्केटसिटीमध्ये खरेदीसाठी गेले. खरेदी आणि अल्पोपाहार झाल्यानंतर दुपारी चारच्या सुमारास ते जवळच्या प्रमोद महाजन उद्यानात गेले. तिथे दोघे छायाचित्रे काढत असताना काही अल्पवयीन मुलांनी त्यांच्याशी वाद घालण्यास सुरुवात केली. मुलांनी शिवीगाळ केल्याचाही आरोप आहे.

वाद वाढत गेल्यानंतर एका मुलाने तरुणाच्या पाठीवर हॉकी स्टिकने प्रहार केला. त्यानंतर इतर मुलांनी लाकडी दांडक्यांनी त्याला मारहाण केली. तरुणीने मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला असता तिलाही मारहाणीला सामोरं जावं लागल्याचं समोर आलं. या घटनेचा व्हिडीओ समाजमाध्यमांवर प्रसारित झाल्यानंतर पोलिसांनी दखल घेतली. घाटकोपर पोलिसांनी पीडित जोडप्याशी संपर्क साधून त्यांची तक्रार नोंदवली. दोघांनाही राजावाडी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. 

पोलिसांनी संबंधित मुलांची ओळख पटवली आणि आठ अल्पवयीन मुलांविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम १८९ (२), १८९ (४), १९०, ११८ (१), ३५२ आणि ३५१ (२) अन्वये गुन्हा दाखल केला. यातील सहा मुलांना ताब्यात घेऊन बाल न्याय मंडळासमोर हजर करण्यात आले. मंडळाने त्यांना ४ डिसेंबरपर्यंत बालनिरीक्षणगृहात ठेवण्याचे आदेश दिले.

गुन्हेगारांना कायद्यात सवलत नको - अबू आझमी 
या घटनेनंतर महाराष्ट्र समाजवादी पार्टीचे अध्यक्ष अबू आझमी यांनी आरोपी अल्पवयीन मुलांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली. गंभीर गुन्ह्यांमध्ये अल्पवयीन असल्याचा आधार घेऊन सवलत मिळू नये, असे त्यांचे म्हणणे आहे. त्यासाठी अल्पवयीन मुलांच्या कायद्यातील वयोमर्यादा १८ वरून १५ वर्षांपर्यंत आणण्याची मागणी त्यांनी केली.

अबू आझमी म्हणाले की, “अल्पवयीन मुलांच्या गुन्ह्यांबाबत कायद्याचा पुन्हा विचार करण्याची गरज आहे. १८ वर्षांऐवजी वयोमर्यादा १५ वर्षांपर्यंत आणली पाहिजे. १८ वर्षांखालील मुलांनी हत्या, लूटमार किंवा छेडछाड यांसारखे गंभीर गुन्हे केले, तर त्यांना अल्पवयीन असल्याचा फायदा मिळू नये. मात्र या घटनेला धार्मिक रंग देऊ नये. कायद्याने कोणताही भेदभाव न करता कारवाई केली पाहिजे.”

पीडितांवर अन्याय होऊ नये - सना मलिक
राष्ट्रवादी काँग्रेसच्या (अजित पवार गट) आमदार सना मलिक यांनीही या घटनेचा निषेध केला. मुंबईसारख्या शहरात अशा प्रकारची घटना घडणे दुर्दैवी असल्याचे सांगत त्यांनी आरोपी मुलांवर कठोर कारवाईची मागणी केली. त्याचवेळी अल्पवयीन मुलांच्या बाबतीत बाल न्याय कायद्याचा आदर राखला गेला पाहिजे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

सना मलिक म्हणाल्या की, “मुंबईसारख्या शहरात अशा प्रकारची घटना घडणे अत्यंत दुर्दैवी आहे. या प्रकरणात कठोर कारवाई झाली पाहिजे आणि पोलिसांनी योग्य पद्धतीने तपास करून नेमके सत्य समोर आणले पाहिजे. आणि आरोपी मुले अल्पवयीन असल्याने बाल न्याय कायद्याचाही आदर केला पाहिजे.”

अल्पवयीन कायद्यामुळे काही प्रकरणांत पीडितांवर अन्याय होण्याची शक्यता असल्याचे सांगत सना मलिक यांनी या कायद्याचा फेरविचार करण्याची भूमिका मांडली. त्या म्हणाल्या की, “अशा प्रकारच्या घटना अल्पवयीन मुलांकडून घडल्याच्या बातम्या वारंवार समोर येत आहेत. कायद्याचा आदर राखून कारवाई होत असताना काही वेळा पीडितांवर अन्याय होतो. त्यामुळे सध्याच्या परिस्थितीचा विचार करून या कायद्याकडे पुन्हा एकदा पाहण्याची गरज आहे. जग वेगाने बदलत आहे. त्यानुसार कायद्यातील तरतुदींचाही विचार व्हायला हवा.”

तपासाच्या निष्पक्षतेवर भर देताना त्यांनी स्पष्ट केले की, “चुकीला चूक म्हणणे गरजेचे आहे. या घटनेत जे दिसत आहे, ते चुकीचेच आहे. त्यामुळे आम्ही त्याचा निषेध करतो. पोलिसांनी निष्पक्ष तपास केला पाहिजे. कायदा आणि सुव्यवस्थेची यंत्रणा कोणाच्याही बाजूने उभी राहून तपास करत नाही, असा आमचा विश्वास आहे.”

या घटनेला धार्मिक वळण देण्याच्या प्रयत्नांनाही त्यांनी विरोध केला. सना मलिक म्हणाल्या की, “मुंबई हे सर्व धर्म, जाती, प्रांत आणि भाषा बोलणाऱ्या लोकांचे शहर आहे. येथे सर्वजण एकोप्याने राहतात. एखादी घटना घडली म्हणून संपूर्ण समाजाला त्याच्याशी जोडणे योग्य नाही. या प्रकरणाचा तपास निष्पक्ष झाला पाहिजे आणि सत्य लोकांसमोर आले पाहिजे.”

दोषींना कायद्याने शिक्षा झालीच पाहिजे - वारिस पठाण
ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन (AIMIM) पक्षाचे नेते वारिस पठाण यांनीही या घटनेचा तीव्र शब्दांत निषेध केला. मारहाण करणारी मुले अल्पवयीन असली तरी त्यांना कायद्यानुसार कठोर शिक्षा झाली पाहिजे, अशी भूमिका त्यांनी मांडली. त्याचबरोबर घटनेला धार्मिक रंग देण्याचा प्रयत्न थांबवण्याचे आवाहन केले.

वारिस पठाण म्हणाले की, “या जोडप्याला ज्यांनी मारहाण केली, त्या सर्वांचा आम्ही कठोर शब्दांत निषेध करतो. ही घटना निषेधार्ह आहे. या मुलांना बाल न्याय मंडळासमोर हजर करण्यात आले आहे. त्यांच्यावर कठोरात कठोर कायदेशीर कारवाई झाली पाहिजे.”

अल्पवयीन मुलांच्या वयोमर्यादेचा मुद्दा उपस्थित करत त्यांनी पुढे सांगितले की, “अल्पवयीन असल्याचा आधार घेऊन काही मुले गुन्हा करून बाहेर येत असतील, तर या कायद्यातील वयोमर्यादा कमी करण्याचा विचार झाला पाहिजे. कायदा सर्वांना समान लागू झाला पाहिजे. मात्र, या घटनेला धार्मिक रंग देऊ नका. या मुलांचे समर्थन कोणताही मुस्लीम करतो आहे का, हे मला सांगा. सर्वजण या घटनेचा निषेधच करत आहेत.”

सार्वजनिक ठिकाणी सुरक्षेच्या व्यवस्थेवरही त्यांनी प्रश्न उपस्थित केले. वारिस पठाण म्हणाले की, “ही घटना सार्वजनिक उद्यानात घडली. अशा ठिकाणी किती सीसीटीव्ही कॅमेरे होते? पोलिसांचा बंदोबस्त होता का? सुरक्षा व्यवस्था होती का? सार्वजनिक ठिकाणी अशा घटना घडू नयेत, यासाठी महापालिका आणि संबंधित यंत्रणांनी जबाबदारी घेतली पाहिजे. उद्यानात लोक येतात, त्यांना सुरक्षित वाटले पाहिजे. अशा घटना रोखण्यासाठी आवश्यक व्यवस्था असणे गरजेचे आहे.”

या प्रकरणात मदरशाचा संबंध जोडला जात असल्याच्या चर्चेवरही त्यांनी नाराजी व्यक्त केली. मदरशांच्या इतिहासाचा उल्लेख करत वारिस पठाण म्हणाले की, “मदरशांचा इतिहास काय आहे, हे आधी समजून घेतले पाहिजे. स्वातंत्र्यलढ्यात मदरशांमधून शिक्षण घेतलेल्या अनेकांनी सहभाग घेतला आणि देशासाठी बलिदान दिले. अशा संस्थांना एखाद्या गुन्ह्याशी जोडणे चुकीचे आहे. गुन्हेगारी घटना कोणत्याही धर्माशी जोडू नये. ज्यांनी गुन्हा केला आहे, त्यांना कायद्यानुसार शिक्षा झाली पाहिजे. मात्र, त्यासाठी संपूर्ण धर्म किंवा संस्थांना लक्ष्य करणे चुकीचे आहे.”

मदरशाचा घटनेशी संबंध नाही - मोहम्मद मोईन शेख
दरम्यान, या घटनेनंतर घाटकोपरमधील एका मदरशाचा संबंध मारहाण करणाऱ्या मुलांशी जोडला जात असल्याची चर्चा सुरू झाली. मदरशाला मुंबई महापालिकेकडून नोटीस मिळाल्याचेही व्यवस्थापनाकडून सांगण्यात आले. मात्र, या घटनेशी मदरशाचा कोणताही संबंध नसल्याचा दावा व्यवस्थापनाने केला आहे.

मदरसा व्यवस्थापनाचे प्रतिनिधी मोहम्मद मोईन शेख यांनी सांगितले की, “आम्हाला बीएमसीकडून मदरशासंदर्भात नोटीस आली आहे. मात्र उद्यानात घडलेल्या घटनेचा आणि मदरशाचा काहीही संबंध नाही. मदरशाच्या आत आणि बाहेर सीसीटीव्ही कॅमेरे लावलेले आहेत. तुम्हाला पाहायचे असतील, तर तेही आम्ही दाखवू शकतो.”

या घटनेतील मुले मदरशाच्या परिसरातील नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. ते म्हणाले की, “ही मुले आमच्या परिसरातील नाहीत. ती वेगळ्या मोहल्ल्यातील आहेत. मग त्यांचा संबंध आमच्याशी कसा जोडला जात आहे? हा मदरसा महिलांसाठी आहे. येथे पुरुषांना प्रवेश दिला जात नाही. त्यामुळे मदरशाचा या घटनेशी संबंध जोडणे चुकीचे आहे.”

महापालिकेने केवळ मदरशालाच नव्हे, तर परिसरातील अन्य घरांनाही नोटीस दिल्याचे त्यांनी सांगितले. मोहम्मद मोईन शेख म्हणाले की, “आमच्या मागच्या बाजूला असलेल्या साधारण १० ते १५ घरांनाही नोटीस देण्यात आली आहे. नेमकी घटना काय घडली आहे आणि त्यासाठी परिसरातील घरे व मदरशाला नोटीस दिली जात आहे. या घटनेचा धर्माशी कोणताही संबंध नाही. अशा प्रकारे मदरशाला या प्रकरणाशी जोडून ते समाजमाध्यमांवर प्रसारित करणे चुकीचे आहे.”

धार्मिक वळण देण्याची गरज नाही - झिशान सिद्दिकी
राष्ट्रवादी काँग्रेसच्या (अजित पवार गट) मुंबई अध्यक्ष झिशान सिद्दिकी यांनीही या घटनेवर प्रतिक्रिया देताना हिंसाचाराचा निषेध केला. कोणत्याही घटनेला विनाकारण धार्मिक रंग देण्याची गरज नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

झिशान सिद्दिकी म्हणाले की, “कोणत्याही प्रकारचा हिंसाचार चुकीचाच आहे. मात्र प्रत्येक घटनेला धार्मिक वळण देण्याची गरज नाही. या प्रकरणात कायदा आपले काम करेल आणि योग्य ती कारवाई होईल.”

गुन्ह्याला गुन्हा म्हणूनच पाहण्याची गरज
कुर्ल्यातील या घटनेने सार्वजनिक ठिकाणांवरील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आणला आहे. तसेच या प्रकरणात आरोपी मुलांची धार्मिक ओळख चर्चेत आली असली, तरी घटनेचा तपास आणि दोषींवरील कारवाई यांना धार्मिक वादाचे स्वरूप मिळू नये, अशी भूमिका मुस्लीम लोकप्रतिनिधींनी मांडली आहे. 

आरोपींचे वय, त्यांच्यावरील आरोप आणि बाल न्याय कायद्यातील तरतुदी यांचा विचार करून कायदेशीर प्रक्रिया पूर्ण होणे आवश्यक आहे. त्यासोबतच सार्वजनिक उद्यानांमध्ये सीसीटीव्ही, सुरक्षा व्यवस्था आणि पोलिसांची उपस्थिती याबाबतही संबंधित यंत्रणांनी गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे.

एखाद्या व्यक्तीने गुन्हा केला, तर त्याची जबाबदारी त्याच व्यक्तीची असते. त्या गुन्ह्याच्या आधारे संपूर्ण समाजाला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करणे चुकीचे आहे. या घटनेतील दोषींवर कायद्यानुसार कारवाई व्हावी, पीडितांना न्याय मिळावा अशी भूमिका समाजातून घेतली जात आहे.

'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा  -

Awaz Marathi WhatsApp Group 
Awaz Marathi Facebook Page

Awaz Marathi Twitter



Latest News