कटकमधील 'बाली जात्रा'चे राष्ट्रपती मुर्मू यांच्या हस्ते उद्घाटन

Story by  आवाज़ मराठी | Published by  Mrudgandha Dixit • 16 m ago
ओडिशाच्या 'बाली जात्रा'ला युनेस्कोचा दर्जा मिळणारच: राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
ओडिशाच्या 'बाली जात्रा'ला युनेस्कोचा दर्जा मिळणारच: राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

 

कटक (ओडिशा)

ओडिशातील कटक येथे साजरी होणारी ऐतिहासिक 'बाली जात्रा' ही सागरी इतिहासावर आधारित देशातील एकमेव उत्सव परंपरा असून, तिला युनेस्कोच्या अमूर्त सांस्कृतिक वारसा यादीत (Intangible Cultural Heritage list) नक्कीच स्थान मिळेल, असा विश्वास राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी व्यक्त केला आहे. मंगळवारी सायंकाळी कटक येथे वार्षिक 'बाली जात्रा' व्यापार मेळ्याचे उद्घाटन केल्यानंतर त्या बोलत होत्या. कटकच्या बाली जात्राचे उद्घाटन करणाऱ्या त्या देशातील पहिल्या राष्ट्रपती ठरल्या आहेत. या सोहळ्याला राज्यपाल ब्रज मोहन राम, मुख्यमंत्री मोहन चरण माझी आणि इंडोनेशियाचे राजनयिक शिष्टमंडळ उपस्थित होते.

सागरी व्यापाराचा गौरवशाली वारसा आणि भारत-इंडोनेशिया संबंध राष्ट्रपती मुर्मू म्हणाल्या की, देशात वर्षभर धर्म, संस्कृती किंवा शेतीवर आधारित अनेक सण साजरे केले जातात; मात्र ओडिशाची बाली जात्रा ही ऐतिहासिक घटनेवर आधारित उत्सव म्हणून साजरी होणारी एकमेव परंपरा आहे. या उत्सवाचा समावेश भारताच्या राष्ट्रीय अमूर्त सांस्कृतिक वारसा यादीत झालेला असून, युनेस्कोचा दर्जा मिळवण्यासाठी मुख्यमंत्री मोहन चरण माझी यांनी पुढाकार घेतला आहे.

प्राचीन काळी ओडिशातील व्यापाऱ्यांनी दूरवरच्या प्रदेशांत प्रवास करून नवे सागरी मार्ग शोधले आणि आंतरराष्ट्रीय व सांस्कृतिक देवाणघेवाणीला चालना दिली, असे राष्ट्रपतींनी नमूद केले. ओडिशा आणि बाली यांच्यातील ऐतिहासिक संबंधांचे रूपांतर आधुनिक व्यावसायिक आणि सांस्कृतिक सहकार्यात होऊ शकते, असे सांगत त्यांनी या महोत्सवात इंडोनेशियाच्या सांस्कृतिक पथकांच्या सहभागाबद्दल आनंद व्यक्त केला. तसेच बालीमध्येही दोन दिवसांचा ओडिशा महोत्सव साजरा केला जात असून त्यात ओडिशाचे नृत्य, संगीत, हातमाग, हस्तकला आणि पारंपरिक खाद्यपदार्थ सादर केले जात आहेत.

विकसित भारत, औद्योगिक प्रगती आणि ६० लाख भाविकांची अपेक्षा जागतिक स्तरावर अशांतता आणि आर्थिक अस्थिरता असतानाही भारताची अर्थव्यवस्था मजबूत राहिली असून हे 'विकसित भारत'च्या दिशेने पडणारे सकारात्मक पाऊल असल्याचे राष्ट्रपती म्हणाल्या. ओडिशा वेगाने औद्योगिक केंद्र म्हणून उदयास येत असून उद्योजक, कारागीर, विणकर आणि तरुण पिढी राज्याच्या अर्थव्यवस्थेला बळकटी देत असल्याचे त्यांनी सांगितले.

तत्पूर्वी कटकमध्ये पोहोचल्यावर राष्ट्रपती मुर्मू यांनी महानदीतून सजवलेल्या बोटीने कार्यक्रमस्थळापर्यंत प्रवास केला, विविध स्टॉल्सना भेट दिली आणि महिला बचत गटांच्या सदस्यांशी संवाद साधला. कटक जिल्हा प्रशासनातर्फे २४ नोव्हेंबर ते १ डिसेंबर दरम्यान आयोजित या व्यापार मेळ्यात सुमारे १,५०० स्टॉल्स उभारण्यात आले असून यंदा ६० लाखांपर्यंत भाविक आणि पर्यटक येण्याची अपेक्षा आहे.



Latest News