श्रीनगर
केंद्रीय अल्पसंख्याक कार्य मंत्री किरेन रिजिजू यांनी मंगळवारी जम्मू-काश्मीर वक्फ बोर्डाच्या "उत्कृष्ट कार्याचे" कौतुक केले. हे कार्य संपूर्ण देशासाठी एक आदर्श आणि मानदंड ठरले असल्याचे त्यांनी सांगितले. उत्तर काश्मीरमधील तंगमर्ग परिसरातील प्रसिद्ध "बाबा रेशी" दर्ग्याला भेट दिल्यानंतर रिजिजू पत्रकारांशी बोलत होते. या दौऱ्यात त्यांनी बाबा रेशी दर्ग्याच्या आवारात नव्याने बांधण्यात आलेल्या अतिथीगृहाचे उद्घाटनही केले.
हजरत बाबा पयामुद्दीन रेशी म्हणजेच बाबा रेशी दर्ग्याबद्दल भावना व्यक्त करताना रिजिजू म्हणाले, "इथे येऊन मला आनंद झाला असून मी स्वतःला भाग्यवान समजतो. बाबा रेशी यांचा हा दर्गा प्रसिद्ध आणि आध्यात्मिकदृष्ट्या महत्त्वाचे स्थान आहे. जम्मू-काश्मीर वक्फ बोर्डाने हे संपूर्ण संकुल उभारले आहे. इथल्या मुख्य प्रार्थनास्थळाची आतून आणि बाहेरून केलेली बांधणी पाहून मला समाधान वाटले. वक्फ बोर्डाने कौतुकास्पद काम केले आहे."
बाबा रेशी दर्ग्यासोबतच श्रीनगरमधील प्रसिद्ध हजरतबल दर्ग्याचे नूतनीकरण, शिक्षण, आरोग्य आणि समाजसेवेच्या क्षेत्रात जम्मू-काश्मीर वक्फ बोर्डाने केलेल्या कामाची रिजिजू यांनी प्रशंसा केली. या संदर्भात बोलताना ते म्हणाले, "भारतातील इतर कोणत्याही वक्फ बोर्डाने इतके चांगले काम केलेले नाही. त्यामुळे देशातील सर्व वक्फ बोर्डांनी जम्मू-काश्मीर वक्फ बोर्डाच्या कामातून प्रेरणा घ्यावी आणि काहीतरी शिकावे."
केंद्रीय वक्फ परिषदेचे अध्यक्ष या नात्याने आपण सर्व राज्य वक्फ बोर्डांची बैठक बोलावणार असल्याचे रिजिजू यांनी स्पष्ट केले. देशातील सर्व वक्फ बोर्डांनी चांगले काम करावे, अशी आपली इच्छा असल्याचे त्यांनी सांगितले. ते पुढे म्हणाले, "जम्मू-काश्मीर वक्फ बोर्डाने माझ्या कल्पनेपलीकडचे आणि अपेक्षेपेक्षाही अधिक चांगले काम केले आहे." या कामगिरीबद्दल त्यांनी बोर्डाच्या अध्यक्षा डॉ. सय्यद दरख्शां अंद्राबी आणि त्यांच्या संपूर्ण टीमचे अभिनंदन केले. यापुढील काळातही केंद्र सरकारकडून सर्वतोपरी मदत आणि प्रोत्साहन दिले जाईल, अशी ग्वाही त्यांनी दिली.
वक्फ मालमत्ता आणि संसाधनांचे योग्य नियोजन करून त्यातून उत्पन्न मिळवणे आणि तो निधी सामान्य जनतेच्या कल्याणासाठी वापरणे, हे काम बोर्डाने उत्तमरीत्या केले असल्याचे रिजिजू यांनी नमूद केले. श्रीनगरमधील "बिबी हलीमा नर्सिंग कॉलेज"च्या प्रकल्पाचाही त्यांनी उल्लेख केला. आगामी काळात सामान्य नागरिकांसाठी रुग्णालय उभारण्याचे आणि काश्मिरी तरुणांना कौशल्य प्रशिक्षण देण्याचे वक्फ बोर्डाचे प्रकल्प मार्गी लावण्यासाठी सहकार्य केले जाईल, असेही त्यांनी सांगितले.
इतर सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे वक्फ बोर्डाच्या कर्मचाऱ्यांनाही हज यात्रेसाठी पाठवण्याचा विचार सुरू आहे का, असा प्रश्न पत्रकारांनी विचारला. यावर बोलताना रिजिजू म्हणाले, "आम्हाला वक्फमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनाही संधी द्यायची आहे. नुकताच मी सौदी अरेबियाचा दौरा करून आलो असून तिथल्या हज आणि उमरा मंत्र्यांशी माझी चर्चा झाली. भारताचा हज कोटा वाढवल्यास अधिक सोयीचे होईल, यावर आमचे बोलणे झाले. या कोट्यातून आरोग्य आणि सुरक्षेच्या कामासाठी काही कर्मचारी पाठवले जातात. भविष्यात वक्फ कर्मचाऱ्यांनाही या माध्यमातून हज यात्रेची संधी देण्याचा आमचा प्रयत्न राहील."