भक्ती चाळक
जन्म अबूधाबीमध्ये झाला, बालपण दुबईत गेलं आणि शिक्षणासाठी मुंबईत वास्तव्य केलं. आज पुन्हा परदेशात राहत असताना अमारा चौगुले यांच्या बोलण्यात मात्र कोकण, तिथली माणसं आणि आपल्या देशातील आपुलकीचा उल्लेख वारंवार येतो. डिजिटल मार्केटिंगपासून कंटेंट क्रिएशनपर्यंत या कोकणी मुलीने दुबईत आपली ओळख निर्माण केलीय. परदेशातील आधुनिक जीवनशैली अनुभवताना भारताशी असलेलं नातं जपणाऱ्या अम्मारा यांच्याशी ‘आवाज-द-व्हॉईस’ने संवाद साधला.
जन्म अबूधाबीमध्ये, पण संस्कार कोकणचेच
घरात आई-वडील कोकणीत बोलायचे. त्यामुळे अबूधाबीमध्ये जन्मलेल्या आणि दुबईत वाढलेल्या अम्मारा चौगुले यांची पहिली भाषा कोकणीच झाली. आजूबाजूला वेगवेगळ्या देशांतील लोक, वेगवेगळ्या भाषा आणि संस्कृती असल्या, तरी घरात मात्र कोकणीच बोलली जायची. हिंदी, उर्दू किंवा इंग्रजी बोलण्याचं प्रमाणही फारसं नव्हतं. परदेशात राहूनही आपल्या भाषेची आणि संस्कृतीची ओळख घरातूनच जपली गेली.
अमारा यांचे वडील रत्नागिरी जिल्ह्यातील खेडचे, तर आई गुहागर तालुक्यातील. आई-वडिलांचं लग्न मुंबईत झालं. त्यानंतर वडील कामानिमित्त आईला दुबईला घेऊन गेले. पुढे अम्मारा यांचा जन्म अबूधाबीमध्ये झाला आणि त्यांचं बालपण तिथेच गेलं. त्यांना एक भाऊ आणि एक बहीण आहे. भाऊ मुंबईत नोकरी करतो, तर बहीण सध्या शिक्षण घेत आहे.
अमारा यांचं शालेय शिक्षण दुबईत झालं. पुढील शिक्षणासाठी त्या भारतात आल्या. हायस्कूल आणि महाविद्यालयीन शिक्षण मुंबईत पूर्ण केलं. लग्नानंतर त्या पुन्हा अबूधाबीला गेल्या. त्यांचे पती अदनान मोमिन हे मूळचे गुहागर तालुक्यातील साखरी गावचे. ते इन्फोसिसमध्ये नोकरी करतात. अम्मारा आणि अदनान यांना सहा वर्षांचा मुलगा आणि तीन वर्षांची मुलगी आहे.
भारतीय संस्कृतीशी जोडलेली नाळ
दुबई आणि भारतातील जीवनशैलीचा अनुभव घेताना अमारा यांना दोन्ही ठिकाणांतील वेगळेपण प्रकर्षाने जाणवतं. दुबईमध्ये अनेक देशांतील लोक एकत्र राहतात. आधुनिक सुविधा, उत्तम व्यवस्था आणि जागतिक स्तरावरील जीवनशैली तिथे अनुभवायला मिळते. मात्र, प्रत्येकजण आपापल्या कामात आणि आयुष्यात व्यस्त असतो. एकमेकांच्या वैयक्तिक आयुष्यात फारसा हस्तक्षेप नसतो.
भारतामध्ये मात्र आपल्या माणसांना भेटण्याचा आनंद वेगळाच असतो. कुणी विचारपूस करणं, अडचणीच्या वेळी मदतीला धावून येणं किंवा सहज गप्पा मारणं, अशा छोट्या गोष्टींमधून आपुलकी अनुभवायला मिळते. परदेशात राहताना याच गोष्टींची उणीव जाणवते.
अमारा भारतात आल्यावर वेगवेगळ्या ठिकाणी फिरतात. भारतातील हिरवाई, निसर्ग, वेगवेगळ्या संस्कृती आणि माणसांशी होणारा संवाद त्यांना आवडतो. विशेषतः दुचाकीवरून फिरण्याचा अनुभव त्यांना दुबईत घेता येत नाही. भारतात फिरताना मिळणारा मोकळेपणा तिथे त्यांना अनुभवता येत नाही.
महिलांसाठी सामाजिक बंधने
भारत आणि परदेशातील अनुभव सांगताना अम्मारा यांनी महिलांच्या स्वातंत्र्याचा मुद्दाही मांडला. त्यांच्या मते, महिलांना घराबाहेर पडताना अनेकदा सामाजिक बंधनांचा सामना करावा लागतो. सुरक्षिततेची चिंता आणि लोक काय म्हणतील, हा विचारही महिलांच्या निर्णयांवर परिणाम करतो.
हा प्रश्न केवळ एका धर्मापुरता मर्यादित नसल्याचं म्हटलं. अनेक सर्वसामान्य कुटुंबांमध्ये महिलांच्या वावरावर वेगवेगळ्या प्रकारची बंधनं दिसतात. दुबईमध्ये मात्र विविध देशांतील लोक एकत्र राहत असल्याने वेगवेगळ्या वेशभूषा आणि धार्मिक ओळखी सहज स्वीकारल्या जातात. हिजाब घालणाऱ्या महिलांनाही सार्वजनिक ठिकाणी वावरताना वेगळ्या नजरेने पाहिलं जात नाही, असा त्यांचा अनुभव आहे.
याबाबत अमारा सांगतात, “महिलांच्या बाबतीत आपल्या समाजात अजूनही काही बंधनं आहेत. मुलींनी किती वाजता बाहेर पडावं, कधी परत यावं, याबद्दल अनेक प्रश्न विचारले जातात. हा प्रश्न फक्त एका धर्माचा नाही. कोणत्याही धर्माच्या कुटुंबात असं घडू शकतं.”
मात्र, प्रत्येक ठिकाणी काही ना काही अडचणी असतात, असंही त्या मानतात. संघर्ष हा आयुष्याचा भाग असून त्यातूनच माणूस शिकत जातो. “संघर्ष प्रत्येक ठिकाणी असतो. संघर्षाशिवाय आयुष्य जगण्यातली मजाही येत नाही,” असं त्या सांगतात.
डिजिटल क्षेत्रातील वाटचाल
अम्मारा यांनी बीबीएचं शिक्षण घेतलं आहे. त्यांनतर त्यांनी डिजिटल मार्केटिंग आणि सर्च इंजिन ऑप्टिमायझेशन (SEO) या विषयांत डिप्लोमा केला. पुढे सोशल मीडिया क्षेत्रात विशेष प्रशिक्षण घेतलं. फोटोग्राफी आणि व्हिडिओग्राफीची आवड असल्याने सिनेमॅटोग्राफी आणि व्हिडिओ एडिटिंगचे अभ्यासक्रमही पूर्ण केले.
भारतामध्ये त्यांनी लग्नाआधी आणि लग्नानंतर काही काळ नोकरी केली. सध्या मात्र त्या स्वतंत्रपणे फ्रीलान्सिंग आणि कंटेंट क्रिएशनचे काम करतात. डिजिटल मार्केटिंग, फोटोग्राफी, व्हिडिओग्राफी, सिनेमॅटोग्राफी आणि एडिटिंग अशी अनेक कामे करतात.
कंटेंट क्रिएशन क्षेत्रात अनेक महिला काम करत आहेत. मात्र, एखाद्या कंटेंटची कल्पना तयार करण्यापासून चित्रीकरण, सिनेमॅटोग्राफी आणि एडिटिंगपर्यंतची कामं स्वतः करणाऱ्या महिला मुस्लीम समाजात तुलनेने कमी असल्याचं त्या सांगतात.
अमारा यांनी साधारण चार वर्षांपूर्वी सोशल मीडियावर कंटेंट तयार करण्यास सुरुवात केली होती. सुरुवातीला त्या चेहरा न दाखवता व्हिडिओ तयार करत होत्या. त्यासाठी त्यांचं स्वतंत्र पेज होतं. या व्हिडिओंना चांगला प्रतिसाद मिळू लागला होता. मात्र, दुसऱ्यांदा गर्भवती राहिल्यानंतर त्यांनी काही काळ हे काम थांबवलं. त्यावेळी त्यांना एक मुलगा होता. पुढे मुलगी झाल्यानंतर भारतात आल्यावर त्यांनी पुन्हा कंटेंट क्रिएशन सुरू केलं.
दुबईत कोकणी लग्नाचा माहोल
परदेशात राहणाऱ्या कोकणी कुटुंबांना गावाकडच्या लग्नांची, सणांची आणि एकत्र येण्याची आठवण नेहमीच येते. गावातील लग्नघरातली लगबग, पारंपरिक पद्धती, नातेवाईकांची गर्दी आणि आनंदाचं वातावरण पुन्हा अनुभवता यावं, या उद्देशाने दुबईमध्ये एक खास कार्यक्रम आयोजित करण्यात येतो.
या कार्यक्रमात जवळपास १०० कोकणी महिला सहभागी झाल्या होत्या. हा प्रत्यक्ष विवाह नव्हता, तर लग्नासारखं वातावरण तयार करून कोकणी लग्नातील विविध पद्धती अनुभवण्याचा एक सोहळा होता. गावाकडच्या लग्नाची आठवण व्हावी आणि परदेशात राहणाऱ्या महिलांना आपल्या संस्कृतीशी पुन्हा जोडता यावं, हा त्यामागचा हेतू होता.
या कार्यक्रमात अमारा यांनी फोटोग्राफी आणि व्हिडिओग्राफीचं काम स्वतःच्या खर्चाने करण्याची जबाबदारी घेतली. कार्यक्रमाचं चित्रीकरण, व्हिडिओ एडिटिंग आणि रील्स तयार करण्याचं कामही त्यांनी केलं. ‘कोकणी कनेक्ट’ या पेजवर या कार्यक्रमाचे फोटो आणि व्हिडिओ पाहता येतात.
या उपक्रमातून अमारा यांनी आपल्या व्यावसायिक कौशल्यांचा उपयोग कोकणी महिलांसाठी केला. त्याचबरोबर परदेशात राहणाऱ्या महिलांना एकत्र येऊन आपल्या संस्कृतीचा आनंद घेण्याची संधीही मिळाली.
लग्नानंतरही स्वतःची स्वप्नं जपावीत!
लग्नानंतर अनेक महिलांच्या आयुष्यात मोठे बदल होतात. घर, मुलं आणि कुटुंबाच्या जबाबदाऱ्यांमध्ये स्वतःच्या आवडींसाठी वेळ काढणं कठीण होतं. काही महिला आपल्या आयुष्यात समाधानी असतात, तर काहींच्या मनात स्वतःचं काहीतरी करण्याची इच्छा कायम असते. अशा महत्त्वाकांक्षी महिलांसाठी अमारा यांचा संदेश महत्त्वाचा आहे.
त्यांच्या मते, लग्न झालं किंवा पदवीचं शिक्षण पूर्ण झालं म्हणजे स्वतःला घडवण्याची प्रक्रियापूर्ण होते असे नाही. एखादी गोष्ट शिकल्याचा लगेच उपयोग झाला नाही, तरी त्यातून मिळणारं ज्ञान पुढे कधीही कामी येऊ शकतं. त्यामुळे शिकण्याची तयारी कायम ठेवली पाहिजे.
या विचाराबद्दल अमारा सांगतात, “काही महिला लग्नानंतर आपल्या आयुष्यात समाधानी असतात, तेही ठीक आहे. पण काही मुलींच्या मनात लग्नाआधीपासून काहीतरी करण्याची इच्छा असते. स्वतःसाठी काहीतरी साध्य करायचं असतं. अशा मुलींनी कधीही शिकणं थांबवू नये. स्वतःला घडवत राहावं.”
अमारा कुटुंबाची जबाबदारी सांभाळतानाच अम्मारा स्वतःच्या आवडीच्या क्षेत्रात काम करत आहेत. नव्या गोष्टी शिकण्याची तयारी, स्वतःच्या कौशल्यांवर काम करण्याची वृत्ती आणि आपल्या माणसांशी जोडलेलं राहण्याची इच्छा, अमारा यांच्या बोलण्यातून स्पष्ट जाणवते.