आसामच्या अलमारा बारभुईयाचा पारंपरिक आसामी कपड्यांचा ब्रँड झाला इंटरनॅशनल

Story by  आवाज़ मराठी | Published by  Mrudgandha Dixit • 9 h ago
आसामच्या अलमारा बारभुईया
आसामच्या अलमारा बारभुईया

 

मुन्नी बेगम / गुवाहाटी

कपड्यांबद्दल असलेली साधी आवड एका महिलेला आर्थिकदृष्ट्या किती भक्कम बनवू शकते, याचे उत्तम उदाहरण म्हणजे नागावच्या आलमारा बारभुईया! २००८ साली अवघ्या पाच हजार रुपयांची गुंतवणूक करून त्यांनी 'मेखेला-चादर' (Mekhela-chadar - आसामी महिलांचा पारंपारिक पोशाख) विक्रीचा छोटासा व्यवसाय सुरू केला होता. आज त्यांचा हा व्यवसाय इतका वाढला आहे की त्या महिन्याला सुमारे एक लाख रुपये कमवत आहेत. विशेष म्हणजे, त्यांनी इतर आठ महिलांनाही रोजगार मिळवून दिला आहे. आपल्या 'AB Assamese Ethnic' या ब्रँडच्या माध्यमातून त्या पारंपारिक आसामी पोशाख देशभरात आणि विदेशातही पोहोचवत आहेत.

छोट्याशा सुरुवातीतून मोठी झेप

दोन मुलींची आई असलेल्या आलमारा यांनी जेव्हा हा व्यवसाय सुरू केला, तेव्हा त्यांच्याकडे कोणतीही ठोस योजना नव्हती. स्वतःसाठी कपडे खरेदी करण्याची त्यांची आवड आणि मेखेला-चादरबद्दलचे आकर्षण त्यांना या व्यवसायाकडे घेऊन गेले. स्वतःसाठी घेतलेले कपडे मैत्रिणींनाही आवडू लागले आणि बघता बघता याच आवडीचे रूपांतर व्यवसायात झाले.

"सुरुवातीला मी मित्र-मंडळी आणि नातेवाईक यांच्यापुरताच माझा व्यवसाय मर्यादित ठेवला होता. त्यांच्याकडून येणारा पैसा मी पुन्हा व्यवसायातच गुंतवत होते. मी पहिली खरेदी फक्त पाच हजार रुपयांची केली होती. पण तेव्हा मला बाजाराचा आणि किमतींचा अजिबात अनुभव नव्हता. त्यामुळे सुरुवातीला मी अनेक वस्तूंसाठी जास्त पैसे मोजले. पण जसजसा वेळ गेला, तसतसा मला बाजाराचा आणि मालाच्या दर्जाचा अनुभव येत गेला," असे आलमारा सांगतात.

नंतरच्या काळात आलमारा यांनी ऑनलाइन विक्रीकडे मोर्चा वळवला. त्यांनी मीशो (Meesho), फ्लिपकार्ट आणि अॅमेझॉनवरून आपल्या उत्पादनांची विक्री सुरू केली. मीशोवरून त्यांनी तब्बल २१ लाख रुपयांची कमाई केली. मात्र, काही कटू अनुभवांनंतर त्यांनी आता केवळ अॅमेझॉनवरूनच (Amazon) व्यवसाय करणे पसंत केले आहे.

सातासमुद्रापार पोहोचला 'AB Assamese Ethnic' ब्रँड

आपल्या नावातील 'AB' (Alamara Barbhuiya) आणि आसामी पारंपारिक वेशभूषा यांची सांगड घालत त्यांनी 'AB Assamese Ethnic' हा ब्रँड तयार केला. अॅमेझॉनवर हा ब्रँड लोकप्रिय झाल्यानंतर त्यांना चक्क परदेशातूनही चौकशी होऊ लागली.

"जेव्हा मी यूएई (UAE) आणि ब्रिटनमधील (UK) ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर माझे नाव, फोटो आणि माझ्या कपड्यांची यादी पाहिली, तेव्हा मला आश्चर्याचा धक्काच बसला. माझी उत्पादने इतर देशांमधील ऑनलाइन बाजारपेठांमध्येही पोहोचली आहेत, हे मला तेव्हा समजले. त्यानंतर मी लगेचच माझ्या ब्रँडचे ट्रेडमार्क मिळवण्यासाठी अर्ज केला. जीएसटी आणि इतर कायदेशीर औपचारिकताही पूर्ण केल्या. आज माझ्याकडे आयात-निर्यात (Import-Export) परवानाही आहे," असे त्यांनी अभिमानाने सांगितले.

आता परदेशातील ग्राहकांसोबतच महाराष्ट्रात (विशेषतः मुंबईत), पश्चिम बंगाल, हरियाणा, उत्तर प्रदेश, झारखंड आणि ओडिशामध्येही त्यांचे ग्राहक आहेत. विविध धर्मांचे आणि संस्कृतींचे लोक आता आसामी मेखेला-चादर आवडीने खरेदी करू लागले आहेत. हिंदू ग्राहक सण आणि उत्सवांसाठी त्यांच्याकडून आसामी पोशाख घेतात. एका ग्राहकाने तर आलमारा यांच्यावर चक्क एक कविता करून त्यांना भेट दिली आहे!

पारंपारिक नक्षीकामाला आधुनिक टच

आलमारा स्वतः कपडे विणत नाहीत. पण डिझाईन, रंगसंगती आणि पारंपारिक आसामी डिझाईन्स नव्या स्वरूपात सादर करण्यावर त्यांचा विशेष भर असतो. त्यांच्याकडे सध्या सात हातमाग (Looms) आहेत. त्यांच्या कलेक्शनमध्ये सिल्क, मुगा सिल्क, टसर सिल्क, मलबेरी सिल्क आणि सुती कपड्यांचा समावेश आहे. त्यांच्या उत्पादनांच्या किमती दीड हजारांपासून ते तीस हजार रुपयांपर्यंत आहेत.

त्यांच्या डिझाइन्समध्ये 'गछ-बुटा' आणि 'किंगखाप' या डिझाइन्सना ग्राहकांची विशेष पसंती असते. पण 'जुनबिरी' (Jonbiri) डिझाईन ही त्यांची सर्वात लोकप्रिय डिझाईन आहे. त्यांनी पट्ट्यांच्या डिझाईनसोबत जुनबिरीचे सोनेरी आणि चंदेरी रंगातील एक खास कॉम्बिनेशन बनवले होते, ज्याला ग्राहकांचा तुफान प्रतिसाद मिळाला. एका ग्राहकाने तर या कपड्यापासून आपल्या मुलीच्या लग्नासाठी चक्क एक लेहेंगा शिवून घेतला!

सध्या आलमारा टसर सिल्कवर जास्त लक्ष केंद्रित करत आहेत. आगामी पूजा उत्सवांसाठी त्यांनी खास जुनबिरी आणि लहान बुटा डिझाईन असलेले कपडे बाजारात आणले आहेत. ग्राहकांची क्रयशक्ती लक्षात घेऊन त्यांनी याच डिझाइन्सचे कपडे कमी किमतीतही उपलब्ध करून दिले आहेत.

गुणवत्तेशी तडजोड नाहीच!

आलमारा उत्पादनांच्या गुणवत्तेबाबत अत्यंत आग्रही आहेत. "ग्राहकांना अस्सल टसर सिल्कचेच कपडे मिळावेत यासाठी मी फक्त प्रयोगशाळेतून प्रमाणित (Lab-tested) केलेलीच उत्पादने विकते. जर माझे एखादे उत्पादन बनावट सिद्ध झाले, तर मी १०० टक्के पैसे परत करण्याची गॅरंटी देते. मी गुवाहाटी आणि सुआलकुची येथून उच्च दर्जाचा माल खरेदी करते. आज मी या व्यवसायातून महिन्याला सुमारे एक लाख रुपये कमवत आहे," असे त्या म्हणतात.

आलमारा यांच्या व्यवसायात सध्या सुमारे आठ महिला काम करत आहेत. त्या अॅमेझॉनच्या ऑर्डर पॅकिंगपासून ते शिवणकाम, दुकान सांभाळणे आणि मॉडेलिंगपर्यंतची सर्व कामे करतात. यातली एक महिला तर त्यांच्यासोबत गेली सात वर्षे काम करत आहे.

लोकांचे टोमणे आणि नवऱ्याची साथ

आलमारा यांचा हा यशाचा मार्ग अजिबात सोपा नव्हता. एक महिला म्हणून स्वतःचा व्यवसाय चालवताना त्यांना अनेकदा लोकांच्या टोमण्यांचा सामना करावा लागला. 'तुझा नवरा एवढे पैसे कमवतो, मग तुला काम करण्याची काय गरज आहे?' असा प्रश्न लोक त्यांना विचारत असत. एक मुस्लिम महिला आसामी कपडे विकते, यावरूनही त्यांना सोशल मीडियावर अनेकदा ट्रोल केले गेले.

पण अशा कमेंट्सना आलमारा अतिशय सडेतोड उत्तर देतात. "माझा जन्म आसाममध्ये झालाय. माझे शिक्षण आसामी माध्यमात झालेय. माझी जीवनशैली, माझे जेवण आणि माझी संस्कृती ही पूर्णपणे आसामी आहे. मी इस्लाम धर्माचे पालन करते, म्हणजे मी आसामी होऊ शकत नाही का? मला माझ्या ओळखीचा सार्थ अभिमान आहे," असे त्या ठामपणे सांगतात.

या संपूर्ण प्रवासात त्यांच्या नवऱ्याची त्यांना अत्यंत भक्कम साथ मिळाली. त्यांचे पती स्वतः एक व्यावसायिक आहेत. प्रत्येक कठीण प्रसंगात त्यांनी आलमारा यांना प्रोत्साहन दिले. "लोकांच्या बोलण्याकडे लक्ष देऊ नकोस. मी तुझ्या पाठीशी उभा आहे. तू फक्त तुझे काम करत राहा," असे त्यांचे पती त्यांना नेहमी सांगत असत.

आलमारा यांना स्वयंपाकाची आणि हस्तकलेचीही मोठी आवड आहे. पिझ्झा, वेगवेगळ्या प्रकारचे ब्रेड आणि केक बनवण्याचा त्यांना चांगला अनुभव आहे. शिवणकामाचे कोणतेही औपचारिक शिक्षण न घेता त्यांनी केवळ यूट्यूब व्हिडिओ (YouTube Videos) पाहून कटिंग आणि शिलाईकाम शिकून घेतले.

"ज्या माणसाच्या हातात कौशल्य आहे, तो कधीच गरीब राहू शकत नाही. महिलांनी आपली कला ओळखली पाहिजे आणि तिला उत्पन्नाचे साधन बनवले पाहिजे. आजच्या या डिजिटल युगात, आपली कला जगापर्यंत पोहोचवण्यासाठी एक मोबाईल आणि सोशल मीडिया पुरेसा आहे," असा मोलाचा सल्ला त्या सर्व महिलांना देतात.

अवघ्या पाच हजारांतून सुरू झालेला हा व्यवसाय आज महिन्याला लाखो रुपये मिळवून देत आहे. आलमारा बारभुईया यांनी आपल्या जिद्द, मेहनत आणि आत्मविश्वासाच्या जोरावर पारंपारिक आसामी कपड्यांच्या व्यवसायात आपली एक वेगळी ओळख तर निर्माण केलीच आहे, पण इतर महिलांसमोर एक अत्यंत सकारात्मक आणि प्रेरणादायी आदर्शही ठेवला आहे!