भक्ती चाळक
इंग्रजी माध्यमात शिकल्याशिवाय उत्तम इंग्रजी बोलता किंवा लिहिता येत नाही, असा सर्वसामान्य समज असतो. पण या सगळ्या समजुतींना केराची टोपली दाखवत अवघ्या चौदा वर्षांच्या शबिहत खान या उर्दू शाळेच्या विद्यार्थिनीने मोठा पराक्रम केलाय.
पुस्तकं वाचताना त्यातल्या व्यक्तिरेखा, प्रसंग आणि कल्पनाविश्वात रमणाऱ्या शबिहतच्या मनात एक दिवस सहज विचार आला, आपण इतकी पुस्तकं वाचतो, मग स्वतःचं पुस्तक का लिहू नये? हा विचार तिने थेट कागदावर उतरवायला सुरुवात केली. पुढची दोन वर्षं तिच्या कल्पनाशक्तीला शब्दांचं रूप देण्यात गेली आणि त्यातून जन्माला आलं ‘Beneath A Lie’ हे पुस्तक.
मुंबईच्या मदनपुरा परिसरातील बीआयटी चाळीत राहणाऱ्या शबिहतने वयाच्या अवघ्या १४ व्या वर्षी इंग्रजी भाषेत पुस्तक लिहिलंय. विशेष म्हणजे, तिचं संपूर्ण शिक्षण उर्दू माध्यमातून झालं आहे. कोणत्याही खासगी शिकवण्यांचा आधार न घेता केवळ उपलब्ध साधनांचा योग्य वापर करत तिने इंग्रजी भाषेवर प्रभुत्व मिळवलं. तिच्या या प्रवासाची दखल घेत ‘आवाज-द-व्हॉईस’ने शबिहत खानशी संवाद साधला.
पुस्तकांच्या दुनियेतली राजकुमारी
शबिहत ही घरातील सर्वांत मोठी मुलगी. तिचे वडील लतीफ खान वाहनचालक म्हणून काम करतात, तर आई फरजाना खान गृहिणी आहेत. पूर्वी त्या शिक्षिका म्हणून कार्यरत होत्या. शबिहतच्या पाठीवर एक लहान भाऊ आणि एक छोटी बहीण आहे. घरची परिस्थिती साधी असली तरी मुलांच्या शिक्षणाला आणि आवडींना प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न कुटुंबाकडून नेहमीच झाला.
शबिहतला लहानपणापासून पुस्तकं वाचण्याची आवड होती. शाळेतील ग्रंथालयातून पुस्तकं आणून वाचणं हा तिच्या दिनक्रमाचा भाग होता. सुरुवातीला परीकथा, काल्पनिक गोष्टी, थरारकथा आणि पौराणिक कल्पनांवर आधारित पुस्तकं तिच्या विशेष आवडीची होती. ‘पर्सी जॅक्सन’सारख्या पुस्तकांनी तिच्या कल्पनाविश्वाला आणखी बळ दिलं. वाचनातून नवनवीन गोष्टी समजत गेल्या आणि त्याच वेळी स्वतःचं काहीतरी लिहिण्याची इच्छा मनात निर्माण झाली.
आपल्या लेखनाची सुरुवात कशी झाली, हे सांगताना शबिहत म्हणते, “मला लहानपणापासून पुस्तकं वाचायला खूप आवडायचं. सातवीत असताना शाळेच्या ग्रंथालयातून पुस्तकं आणून वाचायचे. एक दिवस मनात विचार आला, मी इतकी पुस्तकं वाचते, मग स्वतःचं पुस्तक का लिहू शकत नाही? तिथूनच लिहायला सुरुवात केली.”
तिने सुरुवातीला पेन्सिलने पुस्तकाचा मसुदा तयार केला. लिहिताना अनेक चुका झाल्या, काही गोष्टी समजल्या नाहीत. मात्र, त्यावर थांबण्याऐवजी तिने प्रत्येक चुकीचा शोध घेतला, आवश्यक ते संशोधन केलं आणि मजकूर पुन्हा सुधारला. वाचलेल्या पुस्तकांमधून, पाहिलेल्या नाटक-चित्रपटांमधून आणि स्वतःच्या कल्पनाशक्तीतून तिने कथेला आकार दिला. अशा प्रकारे सातवी-आठवीच्या वयात सुरू झालेलं लेखन दोन वर्षांच्या मेहनतीनंतर पुस्तकाच्या रूपात तयार झालं.
उर्दू माध्यमात शिकून इंग्रजीत पुस्तक!
शहरातले अनेक पालक मुलांना इंग्रजी माध्यमातून शिक्षण देण्याला प्राधान्य देतात. मात्र, शबिहतच्या कुटुंबाने तिचं शिक्षण उर्दू माध्यमातून सुरू ठेवलं. ती मदनपुरा येथील अंजुमन खैरुल इस्लाम मोहम्मद अली मिठा हायस्कूलमध्ये शिकते. सध्या नववीत वर्गात शिकणाऱ्या शबिहतने उर्दू माध्यमातून शिक्षण घेत असतानाच इंग्रजी भाषेची आवड जोपासली.
आई फरजाना या शिक्षिका असल्याने त्यांना इंग्रजी भाषेचं महत्त्व माहीत होतं. त्यामुळे मुलीला उर्दू माध्यमातून शिकवताना इंग्रजीचीही ओळख व्हावी, यासाठी त्यांनी विशेष प्रयत्न केले. शबिहतला इंग्रजी शिकण्यासाठी सुरुवातीला थोडा संघर्ष करावा लागला. मात्र, आईकडून मिळालेलं मार्गदर्शन, पुस्तकांचं वाचन आणि स्वतःची मेहनत यामुळे तिचा आत्मविश्वास वाढत गेला.
विशेष म्हणजे, शबिहत कधीही खासगी शिकवणीला गेली नाही. आईनेच घरी तिचा अभ्यास घेतला. इंग्रजी शिकण्यासाठी आईने तिला पुस्तकं आणून दिली. तिने शाळेच्या ग्रंथालयाचा मोठा वापर करून घेतला. इंग्रजी पुस्तकं, वर्तमानपत्रं आणि चित्रपटांच्या माध्यमातून भाषेशी तिची जवळीक वाढत गेली.
आपल्या इंग्रजी शिकण्याच्या प्रवासाबद्दल शबिहत सांगते, “मी लहानपणापासून उर्दू माध्यमातून शिकते. इंग्रजी शिकताना सुरुवातीला थोडा त्रास झाला, पण मी मेहनत घेतली. मला काहीतरी वेगळं करायचं होतं. आईने घरीच अभ्यास करून घेतला. वाचन करत करत इंग्रजी समजायला लागलं आणि मग त्याच भाषेत लिहिण्याची हिंमत आली.”
एका काल्पनिक राज्याची कहाणी
शबिहतच्या पुस्तकाचं नाव आहे ‘Beneath A Lie’. सुमारे १०० पानांच्या या पुस्तकात २० प्रकरणं आहेत. फँटसी आणि मिथिक अर्थात पौराणिक कल्पनाविश्वावर आधारित कथानकात दोन बहिणींची गोष्ट मांडण्यात आली आहे. एका काल्पनिक राज्याची पार्श्वभूमी, प्रेम, कुटुंब आणि नाट्यमय घडामोडी यांचा या कथेत समावेश आहे.
कथा लिहिताना शबिहतने आपल्या कल्पनाशक्तीचा आधार घेतला. अनेकदा आपण मनात एखाद्या चित्रपटाची कल्पना करतो, तशीच एक संपूर्ण कथा तिने आधी मनात तयार केली. त्यानंतर ती कागदावर उतरवली. वाचलेल्या पुस्तकांचा आणि पाहिलेल्या कथांचा प्रभाव असला तरी कथेला स्वतःची दिशा देण्याचा प्रयत्न तिने केला.
आपल्या पुस्तकाच्या कल्पनेविषयी बोलताना ती सांगते, “कधी कधी आपण मनात एखादा चित्रपट तयार करतो ना, तसंच माझ्या डोक्यात एक वेगळी दुनिया तयार झाली. त्या कल्पनेतून मी कथा लिहायला सुरुवात केली.”
या पुस्तकाचं लेखन पूर्ण झाल्यानंतर शबिहतने ते ऑनलाइन व्यासपीठावरही उपलब्ध करून दिलं. वॉटपॅडसारख्या माध्यमातून लेखकांना वाचकांपर्यंत पोहोचण्याची संधी मिळते. पुस्तक विकत घेणं शक्य नसलेल्या वाचकांनाही कथा मोफत वाचता यावी, यासाठी तिने हा प्रयत्न केला. ऑनलाइन पुस्तकाला शेकडो वाचकांनी भेट दिली. वाचकांकडून मिळालेल्या प्रतिसादामुळे तिचा उत्साह वाढला. सध्या ती या कथेचे पुढील भाग दर आठवड्याला प्रसिद्ध करत आहे.
ऑनलाइन लेखनापासून पुढे जात तिने Kindle Direct Publishing या माध्यमातून पुस्तकाचं स्वयंप्रकाशन केलं आहे. पुस्तकाच्या काही छापील प्रतीही लवकरच उपलब्ध होणार आहेत. पहिलं पुस्तक पूर्ण झालं असलं तरी तिची लेखनयात्रा इथे थांबलेली नाही. या मालिकेतील दुसऱ्या पुस्तकाची तयारी तिने आतापासूनच सुरू केली आहे.
लेखनाचे प्रेरणास्थान
प्रत्येक लेखकाच्या लेखनप्रवासात काही पुस्तकं आणि लेखकांचा प्रभाव असतो. शबिहतही याला अपवाद नाही. सुरुवातीला पर्सी जॅक्सन, परीकथा, फँटसी आणि थरारकथा वाचणाऱ्या शबिहतला आता ‘ट्वायलाइट’सारख्या लोकप्रिय पुस्तकांचीही आवड आहे. परदेशी लेखिका लॉरेन रॉबर्ट्स तिच्या आवडत्या लेखिकांपैकी एक आहे. त्याचबरोबर जेन ऑस्टिन यांच्या साहित्याची ओळख करून घेण्याचाही ती प्रयत्न करत आहे. त्यांच्या पुस्तकांसोबतच त्यावर आधारित चित्रपटही ती पाहते.
आईच्या मार्गदर्शनाखाली इंग्रजीचे धडे
शबिहतच्या या प्रवासात तिच्या आईची भूमिका महत्त्वाची आहे. मुलीला स्वतःहून वाचनाची आणि लेखनाची आवड निर्माण झाली, तेव्हा फरजाना यांनी शबिहतला आवश्यक ती साधनसामग्री मिळवून दिली. इंग्रजी शिकण्यासाठी मदत केली, पुस्तकं उपलब्ध करून दिली आणि तिच्या आवडीला प्रोत्साहन दिलं.
मुलीच्या लेखनाविषयी सुरुवातीला त्यांना माहिती नव्हती. शबिहत पुस्तक लिहित असल्याचं तिने सांगितल्यानंतर त्यांनी तिचं लिखाण पाहिलं आणि पुढे जाण्यासाठी प्रोत्साहन दिलं. त्यांनी मुलीमधील कौशल्य विकसित व्हावं यासाठी प्रयत्न घेतले. मुलांच्या आवडी-निवडींना घरातून मिळणारं प्रोत्साहन त्यांच्या व्यक्तिमत्त्वाला आकार देतं. शबिहतच्या बाबतीतही आईने हाच विश्वास दाखवला आहे.
फरजाना खान सांगतात, “माझं एवढंच आहे की तिला एखादी गोष्ट करायची असेल, तर मी तिला अडवत नाही. तिला जे आवडतं, ते करू द्यावं. थोडं करायचं असेल किंवा जास्त करायचं असेल, तिच्या मनाप्रमाणे करू द्यावं. तिची आवड लक्षात घेऊन मी तिला पुस्तकं आणून दिली, इंग्रजी शिकवलं. आता ती स्वतः पुस्तक लिहिते. आपल्याला मुलांमधलं कौशल्य ओळखता यायला हवं.”
शबिहतच्या यशात तिच्या शाळेनेही महत्त्वाची भूमिका बजावली आहे. शाळेच्या मुख्याध्यापिका कैसर जहाँ मोमीन यांनी तिच्या लेखनाचं कौतुक केलं आहे. संपूर्ण पुस्तक तिने स्वतःच्या हाताने लिहिलं असून, तिने लेखनासाठी एआयचा वापर केलेला नसल्याचं त्यांनी सांगितलं.
शबिहतला व्हायचंय फॅशन डिझायनर
वयाच्या चौदाव्या वर्षी पुस्तक प्रकाशित करणाऱ्या शबिहतला भविष्यात फॅशन डिझायनर व्हायचंय. लेखन ही तिची आवड असली तरी तिचे ध्येय वेगळे आहे. त्यादृष्टीने ती पुढील वाटचाल करत आहे. त्यामुळे अभ्यासाकडेही तितकंच लक्ष देण्याचा तिचा निर्धार आहे. दुसऱ्या पुस्तकाची तयारी सुरू असली तरी शिक्षणाला प्राधान्य देण्याचं तिने ठरवलं आहे.
भविष्यात कोणत्या क्षेत्रात पुढे जायचं, याबाबत तिच्या आई-वडिलांचा पूर्ण पाठिंबा आहे. स्वतःची आवड जपत शिक्षण आणि भविष्यातील ध्येय यांचा समतोल साधण्याचा प्रयत्न शबिहत करत आहे.
‘आवडती गोष्ट करण्यासाठी मागे हटू नका’
इंग्रजी भाषेची सुरुवातीची अडचण, लेखनातील चुका, संशोधनासाठी घ्यावा लागलेला वेळ आणि पुस्तक पूर्ण करण्यासाठी केलेली मेहनत या सगळ्या टप्प्यांत तिने सातत्य ठेवलं. तिच्या मते, एखादी गोष्ट मनापासून आवडत असेल तर तिच्यासाठी प्रयत्न करण्याची तयारी ठेवली पाहिजे.
आजच्या मुलांना स्वतःच्या आवडीच्या क्षेत्रात पुढे जाण्यासाठी तिने संदेश देते. शबिहत म्हणते, “तुम्हाला एखादी गोष्ट आवडत असेल, तर ती करण्यापासून कधीही मागे हटू नका. लोक काय म्हणतील याचा जास्त विचार करू नका. प्रयत्न सुरू ठेवा.”