श्रीनगरच्या डल लेकमध्ये महिलांची बोट रेस; १४० महिलांनी शिकार्‍यात दाखवले साहसी कौशल्य

Story by  आवाज़ मराठी | Published by  Mrudgandha Dixit • 5 h ago
श्रीनगरच्या प्रसिद्ध डल लेकमध्ये आयोजित बोट रेसमध्ये पारंपरिक शिकार्‍यात सहभाग घेणाऱ्या काश्मिरी महिला.
श्रीनगरच्या प्रसिद्ध डल लेकमध्ये आयोजित बोट रेसमध्ये पारंपरिक शिकार्‍यात सहभाग घेणाऱ्या काश्मिरी महिला.

 

श्रीनगर / बासित जरगर

शरद ऋतूतल्या ढगाळ आभाळाखाली श्रीनगरच्या दल सरोवरात वार्षिक नौकायन शर्यत रंगली. काश्मीरच्या विविध भागांतून आलेल्या सर्व वयोगटांतील एकूण १४० महिला या स्पर्धेत उतरल्या. काश्मिरी महिलांच्या दैनंदिन जीवनातील पारंपरिक भूमिकेचा गौरव करणे आणि जलक्रीडा प्रकारांमध्ये त्यांचा सहभाग वाढवणे, हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश होता.

या स्पर्धेत ७० पारंपरिक काश्मिरी शिकारे सहभागी झाले होते. या शिकाऱ्यांमुळे दल सरोवराचे पाणी एका चैतन्यमय क्रीडांगणात बदलून गेले. महिलांनी ताकद, जिद्द आणि सांघिक भावनेचे दर्शन घडवत आपले शिकारे वल्हवले. सरोवराच्या काठावर जमलेल्या प्रेक्षकांनी या स्पर्धकांचा उत्साह वाढवला. पाण्यावरून वेगाने धावणाऱ्या रंगीबेरंगी शिकाऱ्यांकडे पाहत प्रेक्षकांनी टाळ्या आणि घोषणा देत त्यांना दाद दिली.


काश्मीरची पारंपरिक नौकायन संस्कृती जपणे आणि दल सरोवराला जलक्रीडा व पर्यटनाचे केंद्र म्हणून पुढे आणणे, हेदेखील या स्पर्धेचे उद्दिष्ट होते. प्रसिद्ध काश्मिरी क्रीडापटू बिल्किस मीर यांनी या स्पर्धेच्या मुख्य आयोजक म्हणून स्वयंस्फूर्तीने पुढाकार घेतला. पॅरिस ऑलिम्पिकमध्ये जलक्रीडा प्रकारासाठी भारताच्या पहिल्या महिला ज्युरी सदस्य म्हणून मीर यांनी काम पाहिले आहे.

जम्मू आणि काश्मीर वॉटरस्पोर्ट्स अँड कायाकिंग/कॅनोइंग असोसिएशनमधील आपल्या टीमसोबत मीर यांनी या स्पर्धेचे नियोजन केले. त्यांच्या या एकत्रित प्रयत्नांमुळे संपूर्ण स्पर्धा सुरळीत पार पडली. या प्रसंगी बोलताना मीर यांनी या उपक्रमामागची भूमिका स्पष्ट केली. महिलांनी पुढे येऊन खेळांमध्ये सहभागी व्हावे आणि काश्मीरच्या पारंपरिक जलसंस्कृतीशी पुन्हा जोडले जावे, यासाठी हा उपक्रम राबवल्याचे त्यांनी सांगितले.

बिल्किस मीर म्हणाल्या, "काश्मीरच्या जलस्रोतांशी महिलांचे नेहमीच जवळचे नाते राहिले आहे. या उपक्रमातून आम्हाला त्यांना त्यांचे कौशल्य, आत्मविश्वास आणि खिलाडूवृत्ती दाखवण्यासाठी हक्काचे व्यासपीठ द्यायचे आहे." सुमारे ७० शिकाऱ्यांमधून १४० महिलांना एकत्र आणणे हे जलक्रीडेत महिलांचा सहभाग वाढवण्याच्या दिशेने टाकलेले महत्त्वाचे पाऊल आहे, असेही त्यांनी नमूद केले.

या उपक्रमाचा व्यापक हेतू सांगताना मीर पुढे म्हणाल्या, "केवळ एक शर्यत आयोजित करणे हा आमचा हेतू नाही. आम्हाला महिलांसाठी नव्या संधी निर्माण करायच्या आहेत, त्यांना क्रीडा उपक्रमांमध्ये सहभागी होण्यासाठी प्रोत्साहन द्यायचे आहे आणि तरुण पिढीला प्रेरणा द्यायची आहे." या अनोख्या स्पर्धेमुळे दल सरोवरात स्त्रीशक्तीचा आणि काश्मिरी जलसंस्कृतीचा नवा उत्साह पाहायला मिळाला.



Latest News