उस्मान शरीफ : समाजसेवेचा वसा घेतलेला युवक

Story by  आवाज़ मराठी | Published by  Bhakti Chalak • 2 h ago
उस्मान शरीफ
उस्मान शरीफ

 

सानिया अंजुम

उस्मान शरीफ यांच्यासाठी श्रद्धा म्हणजे फक्त प्रार्थनास्थळापुरती मर्यादित राहिलेली गोष्ट नाही. माणसे एकमेकांशी कसे वागतात, गरजूंना समाज कसा आधार देतो आणि एकमेकांना समजून घेण्यासाठी परिचित चौकटी ओलांडून पुढे येण्याची तयारी किती असते, यातून ती दिसून येते. विविध संस्कृती आणि समाजघटकांनी घडलेल्या बंगळुरू शहरात शरीफ यांनी एकता, समाजसेवा आणि आंतरधर्मीय सामंजस्य दैनंदिन सामाजिक जीवनाचा भाग बनवण्यासाठी अनेक वर्षे काम केले आहे.

मिलाद-उन-नबीच्या उत्सवांमधून त्यांच्या कार्याला ठळक रूप मिळाले आहे, पण हा सोहळा त्यांच्या दृष्टीने धार्मिक मेळाव्यापलीकडचा आहे. सुन्नी जमीयतुल उलेमा कर्नाटक आणि मस्जिद कादिरिया यांच्या माध्यमातून ते विविध धर्मांतील लोकांना एकत्र आणणाऱ्या उपक्रमांत सक्रिय राहिले आहेत; सोबतच समाजसेवा आणि तरुणांच्या सहभागालाही ते चालना देतात. बंगळुरूमध्ये झालेल्या मोठ्या मिलाद सोहळ्याकडे मागे वळून पाहताना विविध संस्था एकत्र आल्याचे आणि त्यातून व्यापक संदेश देण्याची संधी मिळाल्याचे शरीफ आवर्जून सांगतात.

"त्या कार्यक्रमात अनेक लोक सहभागी झाले होते, त्यांना संबोधित करण्यात आले आणि त्यातून एकता व सलोख्याचा संदेश खूप चांगल्या प्रकारे दिला गेला," असे ते म्हणाले.

 
सलोख्याचे संवाद आणि वर्षभर चालणारी समाजसेवा
लोकांना एकत्र आणण्याचा हा आग्रह त्यांच्या संस्थेशी निगडित वार्षिक मिलाद सभांमध्येही प्रकर्षाने दिसून येतो. या कार्यक्रमांत धर्मगुरू आणि समाजातील नेत्यांसोबत हिंदू आणि ख्रिश्चन प्रतिनिधींसह इतर धर्मांचे पाहुणेही सहभागी होतात. आधीच्या सभांमध्ये एका हिंदू धर्मगुरूंनी आणि एका ख्रिश्चन बिशप यांनी हजेरी लावून प्रेषित मुहम्मद यांच्या जीवनकार्याबद्दल आणि व्यक्तिमत्त्वाबद्दल विचार मांडल्याची आठवण शरीफ सांगतात.

समजून घेण्याची सुरुवात मनापासून ऐकून घेण्यापासून होते, त्यामुळे असे क्षण महत्त्वाचे ठरतात. धार्मिक ओळख ही भिंत बनू न देता या भेटींमधून लोकांना एकमेकांशी थेट संवाद साधण्याची संधी मिळते.

मिलादशी जोडलेल्या समाजसेवेच्या उपक्रमांतही हीच भूमिका दिसून येते. रक्तदान शिबिरे, रेशन वाटप आणि इतर कल्याणकारी कामे या व्यापक कार्यक्रमाचा भाग बनली आहेत. हे प्रयत्न एका धार्मिक सणापुरते मर्यादित नाहीत, यावर शरीफ विशेष भर देतात.

"आम्ही आमचे उपक्रम वर्षभरात विभागून ठेवले आहेत. एक दिवस मिलाद साजरा करायचा आणि नंतर इतर कामांत गुंतून जायचे, असे आमचे काम नाही," असे त्यांनी स्पष्ट केले.

मस्जिद कादिरियाची खुली दारे आणि फुलांची भेट
वर्षभर सेवा देण्याच्या या विश्वासाने मस्जिद कादिरियातील उपक्रमांनाही आकार दिला आहे. या मशिदीने शाळा-महाविद्यालयांतील विद्यार्थी, ख्रिश्चन संस्थांचे प्रतिनिधी आणि जगाच्या विविध भागांतून आलेल्या पाहुण्यांचे स्वागत केले आहे. मशिदीचा जवळून अनुभव न घेतलेल्यांसाठी दारे उघडणे म्हणजे गैरसमजांची जागा समजुतीने घेण्याची संधी असते, असे शरीफ मानतात.

येणाऱ्या पाहुण्यांना मशिदीत प्रवेश करण्याच्या पद्धती, वुझू (स्वच्छता विधी) आणि नमाज अदा करण्याबद्दल माहिती दिली जाते. धार्मिक कृती पाहण्यापुरत्या मर्यादित न ठेवता त्यामागील अर्थ समजावून सांगितला जातो; त्यामुळे पाहुण्यांना प्रश्न विचारता येतात आणि पाहिल्या गोष्टींचा उलगडा होतो. भेटीच्या शेवटी पाहुण्यांना आदरातिथ्याची छोटी भेट म्हणून फुलांचे रोपटे असलेली कुंडीही दिली जाते.

या साध्या कृतीतून चिरकाल टिकणारी आठवण तयार होते, असे शरीफ यांना वाटते. पाहुणे घरी त्या फुलांची निगा राखतील तेव्हा त्यांना ती मशीद, तिथे भेटलेली माणसे आणि आलेला अनुभव नक्कीच आठवेल, अशी आशा ते व्यक्त करतात.
 

तरुणाईशी संवाद आणि अनुभवाचा समतोल
आजची तरुण पिढी बऱ्याचदा डिजिटल माध्यमांतून धर्माकडे पाहते, अशा काळात हा दृष्टिकोन अधिकच महत्त्वाचा ठरतो. तरुणांवर असलेला सोशल मीडियाचा प्रभाव शरीफ ओळखून आहेत; त्यांच्या ऑनलाइन सवयींवर टीका करून पिढ्यांमधली दरी मिटणार नाही, असे त्यांचे मत आहे.

"आज आपल्याकडे असलेली तरुणाई हेच देशाचे भविष्य आहे," असे ते म्हणाले. तरुणांची विचार करण्याची आणि संवादाची पद्धत समजून घेण्यावर त्यांचा भर असतो. ऑनलाइन दिसणारी प्रत्येक गोष्ट डोळे झाकून स्वीकारण्याऐवजी तरुण आता प्रश्न विचारू लागले आहेत. या कुतूहलाला संयम, ज्ञान आणि अर्थपूर्ण संवादातून उत्तर मिळाले पाहिजे, असे ते मानतात.

"तुम्हाला त्यांच्या जागी स्वतःला ठेवून पाहावे लागेल, तरच ते तुमच्याशी कसा संवाद साधतील आणि कसे जोडले जातील हे समजेल," असे ते म्हणाले. याच विचारातून तरुण धर्मगुरूंनाही समाजसंपर्काच्या कामात सहभागी करून घेतले जात आहे. ज्येष्ठ धर्मगुरूंचा अनुभव आणि तरुण धर्मगुरूंची ऊर्जा यांचा मेळ घालून प्रश्न विचारणाऱ्या आणि ऑनलाइन माहिती शोधणाऱ्या पिढीपर्यंत योग्य मार्गदर्शन पोहोचवण्याचा त्यांचा प्रयत्न आहे.

"ज्येष्ठ उलेमांचे कौशल्य आणि त्याच वेळी तरुण उलेमांची ऊर्जा एकत्र आणून आम्ही समतोल साधू आणि इन्शा अल्लाह उत्तम सेवा देण्याचा प्रयत्न करू," असे त्यांनी सांगितले.

मिरवणुकांमध्ये दिसणारे सहजीवनाचे दर्शन
मोठ्या समाजघटकांना एकत्र आणताना येणाऱ्या व्यावहारिक आव्हानांवरही शरीफ काम करतात. बंगळुरूमध्ये अनेकदा विविध धर्मांचे उत्सव एकाच काळात येतात, त्यामुळे समन्वय आणि सहकार्य अत्यंत गरजेचे ठरते. स्वयंसेवक पोलिसांसोबत मिळून गर्दीचे नियोजन, पार्किंग, जेवणाची व्यवस्था आणि व्यासपीठ व्यवस्थापन अशा जबाबदाऱ्या आपापसांत वाटून घेतात.

"आम्ही जबाबदाऱ्या वाटून घेतो आणि त्या मिळून पार पाडतो," असे ते म्हणाले. या सहकार्याचे सर्वात संस्मरणीय उदाहरण धार्मिक मिरवणुकांच्या वेळी पाहायला मिळते. इतर समाजांच्या मिरवणुका निघतात तेव्हा स्वयंसेवक सहभागी नागरिकांना पाणी, ज्यूस आणि बिस्किटे वाटतात; तर मिलादची मिरवणूक त्याच भागातून जाते तेव्हा तसाच आदरभाव समोरूनही दाखवला जातो. आदरातिथ्याची ही छोटीशी कृती सहजीवनाचे जिवंत रूप बनते.

गैरसमज दूर करणारा प्रामाणिक संवाद
इस्लामबद्दल असलेले गैरसमज दूर करण्याच्या इच्छेलाही त्यांच्या सलोख्याच्या कार्यात मोठे स्थान आहे. सोशल मीडियावर धर्माचे अपूर्ण किंवा दिशाभूल करणारे अर्थ पसरवले जाऊ शकतात, हे शरीफ मान्य करतात. यावर उपाय म्हणून ते पाहुण्यांना मोकळेपणाने प्रश्न विचारण्यास प्रोत्साहित करतात आणि धर्मगुरूंकडून कुराण व हदीसच्या आधारे योग्य शिकवण समजावून सांगतात.

पाहुण्यांना सांगितल्या जाणाऱ्या संदेशांमध्ये मानवी जीवनाच्या पवित्रतेची इस्लामिक शिकवण महत्त्वाची असते. एका निरपराध माणसाचा जीव वाचवणे म्हणजे संपूर्ण मानवतेला वाचवण्यासारखे आहे, तर एका निरपराध माणसाचा जीव घेणे म्हणजे संपूर्ण मानवतेची हत्या करण्याइतके गंभीर कृत्य आहे, हे पाहुण्यांना समजावून सांगितले जाते. गैरसमज आपोआप दूर होत नाहीत; त्यासाठी माणसांनी भेटणे, प्रामाणिकपणे बोलणे आणि अनुत्तरित प्रश्नांसाठी संधी निर्माण करणे गरजेचे असते.

वेगवेगळ्या समाजांच्या प्रार्थनास्थळांना भेट देणाऱ्या तरुणांबद्दल बोलताना त्यांच्या विचारांतील मानवी ओलावा स्पष्ट दिसतो. परिचित चौकटीबाहेर जाऊन जग समजून घेण्यासाठी मुलांना प्रोत्साहन देणाऱ्या पालकांचे ते विशेष कौतुक करतात.

"ज्या पालकांनी आपल्या मुलांना असे प्रोत्साहन दिले त्यांचे मला कौतुक करायचे आहे," असे मशिदी, मंदिरे आणि चर्चला भेट देणाऱ्या तरुणांच्या कुटुंबांबद्दल बोलताना ते म्हणाले. मोठमोठ्या घोषणा देण्यापेक्षा भीती किंवा पूर्वग्रह न बाळगता माणसांना एकत्र येण्याच्या संधी निर्माण करणे, हेच शरीफ यांच्या कामाचे सार आहे. रक्तदान शिबीर, मशिदीतील संवाद, मिरवणुकीत दिलेला पाण्याचा पेला किंवा पाहुण्याला दिलेली फुलांची कुंडी या कृती स्वतंत्रपणे लहान वाटू शकतात, पण एकत्रितपणे त्यातून समाजजोडणीचे मोठे तत्त्वज्ञान उभे राहते.

बंगळुरूसारख्या वैविध्यपूर्ण शहरात हे तत्त्वज्ञान एक साधा संदेश देते—एकतेसाठी सर्वांच्या श्रद्धा सारख्याच असण्याची गरज नसते, तर वेगळ्या श्रद्धा असलेल्यांना समजून घेण्याची तयारी असावी लागते. उस्मान शरीफ यांच्यासाठी श्रद्धा जेव्हा मशिदीच्या भिंती ओलांडून सेवा, आदरातिथ्य, संवाद आणि माणुसकीचे रूप घेते, तेव्हाच ती खऱ्या अर्थाने बहरते.
 

'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा  -

Awaz Marathi WhatsApp Group 
Awaz Marathi Facebook Page

Awaz Marathi Twitter



Latest News